सुश्री सुलभा तेरणीकर
इंद्रधनुष्य
☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर ☆
“ठकी”- कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली !
पूर्वी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असत. भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील विटी दांडू आणि चेंडू, सुमारे ५००० वर्षांपूर्वी मोहेंजोदारो मध्ये सापडलेली मातीची खेळणी, एका इटालियन बेटावर ४००० वर्षांपूर्वी सापडलेली दगडी बाहुली, ग्रीस – चीन – रोममध्ये सापडलेली खेळणी ही माणसाच्या या अशा क्रीडा प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडवितात.
आपल्याकडे पूर्वी प्रत्येक घरातील स्वयंपाक या विभागाचे प्रमुखपद हे नात्याने, वयाने ज्येष्ठ असलेल्या स्त्रीकडे आपोआपच यायचे. शालेय शिक्षणाचा प्रसार कमी होता. पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञान हे घरातूनच मिळायचे. मुलींना ते घरातील स्त्रियांबरोबर वावरतांना मिळत असे. खेळामध्ये मातीची भांडी, लाकडी बोळकी – बुडकुली असायची. या खेळण्यांच्या साहाय्याने घरातील मोठ्या स्त्रिया जशा वागतात तसे वागण्याचा प्रयत्न म्हणजे पूर्वीचा भातुकलीचा खेळ ! आपल्याकडे पूर्वी घरोघरी ठकी नावाची, लाकडाची एक ओबडधोबड बाहुली असायची. एका लाकडाच्या त्रिकोणी ठोकळ्यातून ही ठकी कोरली जात असे. अनेकदा ही ठकी ठसठशीत कुंकू लावलेली, लुगडे नेसलेली, नाकात नथ व डोक्यात फुलांची वेणी घातलेली असे. तरीही या बाहुलीला अंघोळ घालणे, कपडे घालणे, दूध पाजणे, भरविणे, झोपविणे हा त्यावेळच्या मुलींच्या खेळण्याचा भाग असे. कांही ठिकाणी ही ठकी रंगविलेली असायची. ठकी, ठेंगणी – ठुसकी, ठकूताई, ठमाबाई, ठेंगाबाई अशी मराठीतील ठ वरून सुरु होणारी नावे आणि विशेषणे या बाहुलीसाठी कायमची राखीव असत. ठकी ही फारशी स्मार्ट वगैरे न वाटता कांहीशी गावंढळ, मंद, ढ वाटत असे. त्या काळात शिक्षणामध्ये फारशी गती नसलेल्या मुलींचे लग्न लवकर उरकून टाकत असत. सर्वात महत्वाचे म्हणजे अस्सल मराठी बाहुलीचे रुप ल्यालेली ही ठकी बाहुली अशा मुलींचे एक प्रतीक ठरले होते. पुलंचे चितळे मास्तर हे त्यांच्या वर्गातल्या गोदी गुळवणीला गोदाक्का म्हणून हाक मारीत असत. तिचे वर्णन या ठकीला साजेलसे आहे. अशा ठक्या संसार मात्र चांगला करीत असत. ठकीची घराघरातील एकच बाहुली ही अनेक वर्षे लहान मुलींना खेळायला पुरत असे. पण ती फारच तुटकी फुटकी झाली तर तिचा उपयोग जात्याचा खुंटा ठोकणे, कुणाला तरी फेकून मारणे असल्या हलक्यासलक्या कामांसाठी केला जात असे. परंपरांच्या चाकोरीतच अडकलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून ठकीचे छायाचित्र अनेक पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर पाहायला मिळते. दूरदर्शनवरील वृत्त निवेदिका आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दिपाली केळकर यांनी ठकी, भातुकली, भातुकलीची विविध छोटी भांडी, खेळणी इत्यादींवर आधारित, ” खेळ मांडीयेला ” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.
भातुकली या खेळात केव्हांतरी एकदा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होत असे. फक्त मुलींच्या या खेळात मग अशा वेळी भटजी, वऱ्हाडी म्हणून मुलगेही सामील होत असत. या ठकीला नवरा म्हणून मग एक तितकाच ओबडधोबड बाहुला असायचा. त्याचे नावही देवजी घासाड्या, ठोंब्या, ठक्या असे काहीतरी असायचे.
आपली आई, आजी, आत्या, मावशी या दिसायला रूपवान असणे कधीच अपेक्षित नसते. तसेच या ठकीचे सुद्धा होते. ती भलेही सुंदर नसेल पण तिचे अस्तित्वच खूप सुंदर होते, भावपूर्ण होते. अनेक मुलींना तिने मोठे होताना पाहिलेले होते. ठकी ही केवळ एक बाहुली नसून ती अनेक पिढ्या, मुलींशी गुजगोष्टी केलेली एक संस्कृती होती.
अशा या ठकीची गरज आणि अस्तित्व जगभर होते, असे दिसते. भारतातच अनेक प्रांतांमध्ये अशा त्रिकोनी आकारात साकारलेल्या अनेक बाहुल्या आढळतात. (सोबतचे फोटो अवश्य पाहा). पण ठकीच्या तुलनेत त्या सौंदर्यवती दिसतात. रशियन बाहुली मातृष्का या नावाने ओळखली जाते. तर ९ मार्च १९५९ रोजी जन्माला आलेली अमेरिकन सुंदर बार्बी बाहुली आता ६७ वर्षांची होईल.
अशा सुंदर, रूपवान, फॅशनेबल आधुनिक बाहुल्यांपेक्षा ठकी म्हणजे मायेच्या आई, आजी, आत्या, मावशी यांच्यासारखी वाटते. पण तिची कायमची रवानगी आता पुरातन वस्तू संग्रहालयात झाली आहे.
लेखक : श्री मकरंद करंदीकर
प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈