सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)
(रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी ! ) इथून पुढे —-
निजामाने संयुक्त राष्ट्रसंघाकडे भारताच्या संभाव्य हस्तक्षेपाबद्दल तक्रार नोंदवली. परिस्थिती ओळखून 9 सप्टेंबर 1948 रोजी श्री. वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू यांनी सशस्त्र दलाच्या कारवाईचा निर्णय घेतला . रझाकारांची दहशत आणि जुलूम मोडून काढण्यासाठी ‘कबड्डी ‘, ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे चार वाजता जनरल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी ‘ पोलो ‘ नावाने सैनिकी अँक्शन सुरु केली. संस्थानच्या तिन्ही बाजूंनी सैन्याने प्रवेश सुरू केला. दोन तासात नळदुर्ग व तुळजापूर आणि संध्याकाळपर्यंत दौलताबाद काबीज केले. औरंगाबादकडून मेजर जनरल डी. एस. बार यांनी चढाई सुरू केली. तुंगभद्रेवरचा पूल ताब्यात घेतला. तेरणा नदीवरचा पूल उडवला. वरंगळ व बिदरच्या विमानतळावर बाँबफेक केली. 14 सप्टेंबरला जालना, उस्मानाबाद ,येरमाळा, कर्नूल येथील रझाकारांचा प्रतिकार मोडून काढला. हुमणाबाद आणि शहागडचा पूल ताब्यात घेतला. 15 सप्टेंबरला औरंगाबाद फत्ते झालं. निजामाचे सैनिक आणि रझाकार मिळून बाराशे जण मारले गेले. भारताचे दहा जवान धारातीर्थी पडले .निजाम सेनेचे प्रमुख अल इद्रिसने 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करली. कासिम रझवी पाकिस्तानात गेला. अटक टाळण्यासाठी निजाम उर्फ मीर उस्मान अली खान याने हैदराबाद रेडिओवरून शरणागती जाहीर केली. लगेच २० सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाकडे केलेली तक्रार मागे घेतली. ” निजामाच्या राजवटीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला तर लक्षावधी मुस्लीम प्रतिकारासाठी उतरतील ” अशी धमकी दिली होती. योगायोग असा की कारवाई झाली, त्याच दिवशी जिना यांचं निधन झालं. प्रत्यक्षात हैदराबादचं विलीनीकरण सहजपणे झालं. हैदराबादला तिरंगा मोठ्या डौलाने फडकायला लागला. लोक निजामाच्या जाचातून मुक्त झाले. हैद्राबाद संस्थान, देशाचा अविभाज्य भाग झाला. लोक आनंदोत्सव साजरा करू लागले. हैदराबाद मुक्त झालं तरी, अन्याय्य समाजव्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सशस्त्र मुक्ती-लढा चालू ठेवणं आवश्यक आहे, असं म्हणून कम्युनिस्टांनी 1951 पर्यंत आपला लढा चालू ठेवला. 21 ऑक्टोबर 1951 ला देशातील मोठा सशस्त्र लढा संपुष्टात आला. दोनशे वर्षांची इस्लामी राजवट संपुष्टात आली. संपूर्ण भारताचं स्वप्न साकार झालं.
रोज सूर्य उगवतच होता. पण 15 ऑगस्ट 1947 दिवशी उगवणारा सूर्य वेगळा होता. स्वातंत्र्याची एक रम्य पहाट घेऊन तो उगवला होता. कवी वसंत बापट यांना तेव्हा इतके छान शब्द सुचले होते—-
“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट.
नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट “
यावर्षी, भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्षी, म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी, सर्वांनी मिळून नव अरुणाची स्तुतिसुमने गाऊया. आणि पुढील शताब्दी महोत्सवापर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करू या.
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈