इंद्रधनुष्य
☆ “रामदासी झरे…” – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆
सगळ्यांना दासबोध आणि मनाच्या श्लोकांपुरतेच माहीत आहेत समर्थ रामदास !
पण त्यांची स्वराज्यासाठीची कामगिरी फारशी कोणाला माहीत नाही.
संन्यासी, एक भगवी छाटी, कमंडलू, काखेतील कुबडी आणि समर्थ लंगोट, एव्हढीच त्यांची संपत्ती..
स्नानाचे काय? झोपायचे कुठे? समर्थांनी हा प्रश्न सोडवतानाच महाराजांसाठी सैन्य तयार केले.
समर्थांनी गावोगाव मारुती मंदिरांची स्थापना केली. यातील बहुतेक मंदिरांमध्ये तळघरे आणि भुयारे आहेत. नाथमाधवांच्या कादंबऱ्यात याचे वर्णन आढळते.
प्रत्येक मंदिराला लागूनच एक व्यायाम शाळा. हनुमानाची उपासना म्हणजेच बलदंड शरीर, हा मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला.
गावोगाव तरुण पोरे या आखाड्यात घुमू लागली. दंड बैठका, फरी गदगा, ढाल तलवार शिकू लागली. महाराजांचा मावळा बलदंड आणि शस्त्रनिपुण होत होता.
पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत धावत जायचे आणि नंतर रात्रभर लढत गड गाठायचा. पावन खिंड लढवायची. ही काटकता आणि ताकद याच आखाड्यात तयार झाली.
बजरंगबलीकी जय!
रामदासी झरे हा त्यांचा दुसरा अद्भुत खेळ.
आम्ही गोव्याला जात असताना प्रधानगुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. गाडी बंद करून सगळ्यांना बाजूच्या झाडीच्या बाजूला उभे केले, आणि विचारले, “काही ऐकू येतंय का?”
गाडीच्या आवाजानी आमचे कान बधीर झाले असावेत. काहीच ऐकू येईना. ते आम्हाला त्या झुडपांच्या मागे घेऊन गेले.
अहो आश्चर्यम्….
हायवेवरील त्या झुडुपांच्या मागे एक दोन फूट रुंदीचा खळाळून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा होता.
हाच तो रामदासी झरा. सगळ्या महामार्गांवर दर बारा कोसांवर समर्थांनी असे झरे शोधले आहेत, तयार केले आहेत. संन्याशांना स्नानसंध्या करायला आणि राजांच्या फौजेला कूच करत असताना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारे, बारमाही खळाळून वाहणारे रामदासी झरे. आजही हे महाराष्ट्राचे वैभव खळाळून वहात आहे.
माहितगाराशिवाय कळणार नाहीत, असे रामदासी झरे. बहिर्जीच्या हेरखात्याला, हे माहीत असत. मारुती मंदिरातील तळघरे आणि भुयारे त्यांच्या कामाला यायची. रामदासी झरे सैन्याला पाणी पुरवायचे.
राजे स्वराज्य उभारणी करत होते आणि समर्थ सैन्य तयार करत होते. दास मारुतीची उपासना करणारे मावळेच, राजांसाठी जीव देणारे जिवलग असे तयार झाले.
समर्थांच्या कुबडीत गुप्ती असायची असे म्हणतात. तेव्हापासून लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार, योगी अरबिंदो घोष, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र घोष आदि सगळे राजकीय नेते हे राजकारण, क्रांतीकार्य आणि योग, अध्यात्म यात सहज संचार करणारे होते. संन्याशाचा संसार म्हणजेच जगाचा संसार, ही उक्ती या सगळ्यांनी सार्थ केली.
महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही पुढील साखळी. आपणही त्याच मालिकेतील लढवय्ये बनूयात..
भारतमाताकी जय.. !!
लेखक : श्री धनंजय केळकर
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈