डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘कविराज भूषण…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(पूर्वार्ध)
महाकवी भूषण (१६१३ – १७१५) हे ‘रीतिकाल’ मधील प्रमुख हिंदी कवी गणले जातात. जेव्हा इतर कवी शृंगाररसपूर्ण काव्य रचत होते, तेव्हा भूषण यांनी वीररसाने ओतप्रोत रचना करून स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे सिद्ध केले. कवी भूषण मोरंग, कुमाऊं, श्रीनगर, जयपूर, जोधपूर, रेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल इत्यादींच्या आश्रयाखाली राहिले, परंतु त्याचे आवडते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा छत्रसाल हेच होते.
महाकवी भूषण मूळचे टिकवापूर या गावाचे रहिवासी होते असे मानल्या जाते. हे गाव आजच्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या घाटमपूर तालुक्यात स्थित आहे. त्यांचे दोन भाऊ व्यापमणी आणि मतिराम हे देखील कवी होते. त्यांचे मूळ नाव ज्ञात नाही, मात्र ‘शिवराज भूषण’ या ग्रंथाच्या खाली दिलेल्या दोह्याचा संदर्भ जोडला तर, चित्रकूटचे राजे हृदय राम यांचा मुलगा रुद्र शाह याने त्यांना मानाने ‘भूषण’ ही उपाधी दिलेली होती. त्यांच्या उत्तुंग साहित्याला शोभेल अशीच ही पदवी आहे असे वाटते.
कुल सुलंकि चित्रकूट-पति साहस सील-समुद्र।
कवि भूषण पदवी दई, हृदय राम सुत रुद्र॥
भूषण हे आपल्या भावांसोबत राहत असत. एकदा त्यांनी जेवतांना आपल्या भावजयीला मीठ मागितले. भावजयीने हे मीठ विकत घेण्यापुरते पैसे कमावून आणा, अशी त्यांची निर्भत्सना केली. ती जिव्हारी लागल्याने हा स्वाभिमानी कवी घर सोडून निघून गेला. (पुढे राजकवी झाल्यावर त्यांनी आपल्या भावजयीला १ लाख रुपयांचे मीठ पाठवून दिले असे म्हटल्या जाते.) कित्येक राजांच्या दरबारी राहिल्यानंतर ते पन्नानरेश राजा छत्रसाल यांच्याकडे राजकवी म्हणून रुजू झाले, तेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयास गेले. कांही वर्षानंतर छत्रसाल महाराजांकडे ते परत गेले. परंतु त्यांचे मन तिथे लागेना अन ते शिवरायांच्या दरबारात परतले ते कायम त्यांच्याच सेवेशी एकनिष्ठ राहण्यासाठी! खरे तर इतक्या राजांच्या दरबारी चाकरी करूनही ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल या दोनच राजांचे खरे प्रशंसक होते. त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात याची कबुली दिली आहे, ती अशी-
और राव राजा एक मन में न ल्याऊं अब।
साहू को सराहों कै सराहौं छत्रसाल को॥
इसवी १७१५ मध्ये कवी भूषण मृत्यू पावले.
कवी भूषण यांची साहित्य संपदा:
विद्वान मंडळी मानतात की शिवराजभूषण, शिवाबावनी, छत्रसालदशक, भूषण उल्लास, भूषण हजारा आणि दूषनोल्लासा असे सहा ग्रंथांचे लेखन कवी भूषण यांनी केले आहे. परंतु यांच्यापैकी फक्त शिवराज भूषण, छत्रसाल दशक आणि शिवाबावनी हेच काव्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. कविराज यांनी शिवराजभूषणमध्ये प्रचुर अलंकारिक काव्य, छत्रसाल दशकमध्ये छत्रसाल बुंदेलाचे पराक्रम, दानशीलता आणि शिवाबावनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहेत.
‘शिवराज भूषण’ हा एक विशाल काव्यग्रंथ असून त्यात ३८५ पद्य (काव्ये) आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे आणि पराक्रमाचे ओजस्वी वर्णन करणाऱ्या शिवाबावनीमध्ये ५२ कविता आहेत. बुंदेला शूर छत्रसालच्या शौर्याचे वर्णन ‘छत्रसाल दशक’ मधील दहा कवितांमध्ये केले आहे. त्यांचे संपूर्ण काव्य वीररसाने, चैतन्य तेजोमय गुणांनी आणि जोमाने भारलेले आणि रसरसलेले आहे. या काव्यांत महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि खलनायक आहे मुघल बादशहा औरंगजेब. औरंगजेबाप्रती त्यांचा हा तीव्र विरोध जातीच्या वैमनस्यावर आधारित नाही तर एका जुलमी आणि नृशंस शासकाच्या दुष्कृत्यांविरुद्ध आहे.
रीतिकाव्याची सर्वात महान उपलब्धी होती हिंदीच्या एका सुसंस्कृत आणि सहृदय समाजाची निर्मिती. या काळात सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाने चरम सीमा गाठली होती. कलात्मक काव्य या काळात प्रचुर मात्रेत रचल्या गेले.वाकपटू कवींच्या माध्यमातून मुळातच गोड अशी ब्रज भाषा आणखीच रमणीय झाली. लवचिक, भावपूर्ण आणि लालित्यपूर्ण शब्दार्थांच्या अभिव्यक्तीमुळे ही राजस भाषा त्या काळातल्या कवी मंडळींची लाडकी ‘काव्य भाषा’ बनली. त्या काळात शृंगार रसाने परिष्कृत काव्य हे सर्वाधिक परिचित आणि रसिकमान्य होते.
भूषण यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये:
मात्र या शृंगारिक वातावरणात भूषण यांचे मन रमेना. मुघलांचे हिंदूंवर होत असलेले निर्घृण अत्याचार ते सतत बघत होते. आपला समाज लाचार, बलहीन आणि चैतन्यशून्य झाला होता. म्हणूनच देशभक्तीची ज्योत जगवणे हेच आपले इतिकर्तव्य समजून कवी भूषण यांनी रीतिकालाच्या मळलेल्या वाटेवर चालण्याचे नाकारले. प्रवाहाविरुद्ध पोहत त्यांनी वीररसाने परिपूर्ण अशा काव्य रचना केल्या आणि अखिल आयुष्याचे तेच उद्दिष्ट ठेवले. त्यांच्या प्रत्येक कवितेची मूळ भावना शौर्याचे गुणगान करते. हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आणि त्यांच्या नायकांच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन हेच त्यांच्या कवितेचं गमक आहे. भूषण यांची काव्य शैली त्यांच्या विषयास अत्यंत अनुकूल आहे, तसेच ओजपूर्ण आणि वीररसपूर्ण आख्यान मांडायला सर्वथा उपयुक्त आहे. प्रभावोत्पादक, प्रसंगात्मक चित्रमयता आणि सरस शब्दालंकार योजना भूषण यांच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ठे आहेत. या महान देशभक्त कवीने मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि निराश झालेल्या हिंदू समाजात आशा निर्माण करून त्यांना संघर्ष करण्यास प्रोत्साहित केले. हा विषय मांडतांना त्यांनी छत्रपती शिवाजी आणि राजा छत्रसाल हे काव्य नायक निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल लिहितांना भूषण यांच्या लेखणीला हजारो धुमारे फुटलेले बघायला मिळतात. ‘शिवभूषण’ या काव्यग्रंथातील एक काव्य स्फुल्लिंग बघा.
सबन के ऊपर ही ठाढ़ो रहिबे के जोग, ताहि खरो कियो जाय जारन के नियरे,
जानि गैर मिसिल गुसीले गुसा धारि उर, कीन्हों न सलाम, न बचन बोलर सियरे।
भूषण भनत महाबीर बलकन लाग्यौ, सारी पात साही के उड़ाय गए जियरे,
तमक तें लाल मुख सिवा को निरखि भयो, स्याम मुख नौरंग, सिपाह मुख पियरे॥’
औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांना जेव्हां सहा हजारी मनसबदारांच्या ओळीत स्थान देण्यात आले, तेव्हां या अपमानाने ते पेटून उठले. भर दरबारात ते क्रोधावेशाने औरंगजेबास दरबारात तक्रार करू लागले, त्या दृश्याचे चित्रण या रौद्ररसाने भरलेल्या काव्यांशात केले गेले आहे.
अर्थ: मुघल दरबारात सर्वोच्च स्थानी उभे राहण्यास सक्षम असलेल्या सर्जा शिवाजीचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांना ते आसन दिलेले होते. औरंगजेबाच्या या अपमानजनक वागणुकीमुळे शिवाजी संतप्त झाले, त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला सलाम केला नाही आणि दरबाराच्या शिष्ठतेनुसार विनम्र शब्द देखील उच्चारले नाहीत. महाबली शिवाजी रागाने गर्जना करू लागले आणि त्याचे हे क्रोधायमान वर्तन पाहून मुघल दरबारातील सर्वांच्या मनात चलबिचल होऊन ते घाबरून किंकर्तव्यमूढ झाले. रागाने लाल झालेला शिवरायांचा चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा काळवंडला आणि सैनिकांची तोंडे कमालीच्या भीतीग्रस्ततेने पिवळी पडली.
धर्मरक्षक शिवाजी महाराजांचे कवी भूषण यांनी केलेले काव्य वर्णन:
हिंदू धर्माच्या अतिरेकी द्वेषाने पछाडलेला मुघल बादशहा औरंगजेब जेव्हां हिंदू समाजावर, त्यांच्या धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालत होता, तसेच मुस्लिम धर्माची पाळेमुळे हिंदुस्तानात रुजवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हां गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून छत्रपती शिवराय अखंड प्रयत्नशील होते. त्याच संदर्भातील हे वर्णन बघा!
देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी,
गौरागनपति आप औरन को देत ताप आप के मकान सब मारि गये दबकी।
पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी,
कासिहू ते कला जाती मथुरा मसीद होती सिवाजी न होतो तौ सुनति होत सबकी॥
अर्थ: संपूर्ण हिंदुस्थानात हिरवी फडकी ज्यावर चंद तारे कोरले आहेत अशी फडकी फडकताना दिसत होती. मोठमोठाले राजे मात्तब्बर राजे मुसलमानांचे मांडलिक झाले होते. साधू संतांची सिद्धी फळाला येत नव्हती तसेच तपश्चर्या कामाला येत नव्हती. अशावेळी कविराज भूषण गणरायाला लटक्या रागाने विचारतात: अहो गणराय आणि श्री गौरी तुम्ही खरे असुर संहारक परंतु तुम्ही देखील तुमच्या देवळात दडी मारून बसलात. अहो छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्याचे काम हाती घेतले नसते तर काशीची कला लयाला गेली असती, मथुरेत मशीद वसली असती आणि आम्हा सर्व हिंदूंना सुंता करून घ्यावी लागली असती!
भारतीय संस्कृतीचे जाणकार कविराज भूषण:
हिंदूंना त्यांची हरवलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी कविराजांनी संस्कृतीचा उचित वापर केला. त्यांनी अनेक देवी-देवतांच्या कार्यांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची गणना त्या महान देवी देवतांच्या कार्यांच्या श्रेणीत केली. शिवाजी महाराजांना धर्म आणि संस्कृतीचे प्रणेते म्हणून त्यांनी आपल्या काव्यात चित्रित केले. खालील ओळी त्याच्याच परिचयक आहेत.
बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में।
हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में।
मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में।
राजन की हद्द राखी तेग-बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥
अर्थ: भूषण म्हणतात की महाराज शिवाजींनी आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाला परास्त करून त्याने वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांना नष्ट होण्यापासून वाचवले आणि दुसरीकडे वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा प्रसार केला. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचे सार असलेल्या पुराणांचे रक्षण केले आणि रामनामाचे महत्त्वही अबाधित ठेवले. त्यावेळी हिंदूंची धार्मिक प्रतीके मुस्लिमांकडून नष्ट केली जात होती. त्यांनी हिंदूंना डोक्यावरील केसांच्या शेंड्या (शिखासूत्र) कापण्यापासून वाचवले आणि त्यांना उदरनिर्वाह देऊ केला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या गळ्यात पवित्र जानवे (यज्ञोपवीत) आणि तुळशीमाळ घालण्याचे संरक्षण दिले. त्यांनी दिल्लीच्या पातशहाचे कंबरडे मोडले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. राजांच्या हातात देवतुल्य वरदहस्ताची शक्ती होती, अर्थात जो कोणी त्यांच्या आश्रयास गेला, त्याला त्यांनी आपल्या पंखांखाली घेतले. या महान राजाने हिंदू राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि आपल्या तळपत्या तलवारीच्या बळावर देवस्थानांचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर शूरवीर शिवाजी राजाने प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) अबाधित राखला.
उत्तरार्धात कविराज भूषण यांच्या अशाच काही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा काव्य रचना बघू या.
– क्रमशः भाग पहिला (पूर्वार्ध)
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
केवळ अप्रतिमच नाही तर प्रेरणादायक लेख आहे. कविराज भूषण ह्यांची आज खऱ्या अर्थाने ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Dhanyavad Sir