डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘कविराज भूषण…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव
(उत्तरार्ध)
नमस्कार मैत्रांनो,
कविराज भूषण यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि शिवरायांविषयी असलेल्या अतीव आदराने रचलेल्या काव्याचे शिवराय आणि त्यांच्या समस्त दरबारी मंडळींना खूपच कौतुक होते. छत्रपतींनी या अभूतपूर्व काव्यरचना निव्वळ ऐकल्याच नाही तर या राजकवीचा वेळोवेळी उचित बिदागी सहित मानमरातब केला. बघू या त्यातीलच कांही निवडक काव्य रचना
शिवरायांच्या युद्धांचे सजीव चित्रण:
गनीमाशी शिवरायांच्या सेनेने केलेल्या घनघोर युद्धाचे सजीव वर्णन करतांना भूषण यांच्या लेखणीचे जणू टोकदार भाले होतात. शब्दांकन असे आहे जणू तोफेचे गोळे आग ओकताहेत. हे वीररसपूर्ण, जोमदार काव्य वाचतांना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. युद्धाच्या उत्साहाने मुसमुसलेल्या सैन्याचे कूच, रणांगणात रणभेरीचा शंखनाद, शस्त्रांची चकमक, शूरवीरांचे मर्दानी शौर्य आणि भ्याडांची भयावह अवस्था इत्यादी दृश्यांचे चित्रण कवीने अतिशय प्रभावीपणे केले आहे. खालील काव्यांशात शिवाजी राजांच्या चतुरंगिणी सेनेच्या प्रस्थानाचे अत्यंत मनोहर चित्रण आहे. कविराज म्हणतात:
साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीतन चलत है,
भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं|
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत है,
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि, थारा पर पारा पारावार यों हलत है॥
अर्थ: ‘सर्जा’ या उपाधीने सुशोभित झालेले अत्यंत श्रेष्ठ आणि वीरवर शिवाजी राजे आपली चतुरंगिणी सेना (हत्ती, रथ, घोडदळ आणि पायदळ हे सैन्याचे चार विभाग असलेली सेना) सज्ज करून आणि शरीराच्या प्रत्येक अंगात उत्साह निर्माण करून युद्ध जिंकण्याची ईर्षा बाळगून होते. त्यावेळी ढोल-ताशे आणि नगारे गर्जत होते. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मदमस्त हत्ती होते आणि युद्धासाठी उत्तेजित झाल्यामुळे हत्तींच्या कर्णरंध्रातून अत्यधिक मद नदी-नाल्यांप्रमाणे वाहत होता.जगाच्या कानाकोपऱ्यात दहशत पसरली होती, कारण शिवाजीचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते. हत्तींच्या धक्क्याने डोंगरही उन्मळून पडत होते. प्रचंड सैन्याच्या हालचालीमुळे बरीच धूळ उडत होती. अति धूळ उडल्यामुळे आकाशात चमकणारा सूर्य ताऱ्यासारखा दिसत होता आणि समुद्र ताटात ठेवलेल्या पाऱ्यासारखा थरथरत होता.
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अन भूषण यांची काव्यप्रतिभा:
आता वळू या कविराज भूषण यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अशा काव्य रचनेकडे! दिनांक ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या एकमेवाद्वितीय राजसी सोहळ्याचे साद्यन्त आणि बारीक सारीक तपशिलांसह वर्णन अनेकानेक तऱ्हेने करण्यात आले आहे. या लेखाच्या विषयाला अनुषंगून आपण बघू या की कवी भूषण सिंहासनाधीश शिवरायांचे कसे ओजस्वी वर्णन करतात. हे हुबेहूब वर्णन वाचतांना कवीची सौंदर्यदृष्टी, उत्तुंग साहित्यिक आणि बौद्धिक भरारी बघून केवळ त्यांच्या काव्यप्रतिभेला त्रिवार मुजरा करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हां सिंहासनावर आरूढ झाले, त्या प्रसंगी त्यांची स्तुती करताना कविराज भूषण यांनी पुढील छंदकाव्य राजदरबारात सादर केले होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वीररसाने भारलेले, उत्कट आणि मार्मिक वर्णन केवळ थोर कवी भूषण यांच्यासारखे त्यांचे मनस्वी प्रशंसकच करू शकत होते. एकापेक्षा वरचढ एक अशा सुंदर उपमालंकारांनी सजलेल्या आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित प्राचीन संदर्भ देत, कवी रसमय वर्णन करतात की छत्रपती म्लेंच्छांवर कसे भारी पडले!
इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है |
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर सेर सिवराज है ||
अर्थ: ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर रघुकुल राजा (श्रीराम), मेघांवर पवन, रतीचा पती म्हणजे कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहू (कार्तवीर्य) वर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, वृक्षांच्या खोडांवर दावानल, हरिणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर मृगराज (सिंह), तिमिरावर प्रकाशकिरण आणि कंसावर कृष्ण भारी पडतात आणि त्यांच्यावर आरूढ होतात, तसेच म्लेच्छ वंशावर शिवाजी व्याघ्रासमान भारी पडतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करतात.
छंदबद्ध आणि अलंकारिक काव्य
रसाळ परिपोषक असे अर्थपूर्ण छंदबद्ध काव्य रचतांना ते बहारदार तर होतेच, पण अतिरम्य गेय असे काव्य निर्माण झालेले दिसून येते. त्यांच्या काव्यात दोहा, कवित्त, सवैया, छप्पय इत्यादी तत्कालीन छंदांचा प्रामुख्याने उपयोग केल्या गेला आहे. रीतिकालीन कवींचे प्रमुख बलस्थान म्हणजे अलंकारिक भाषा! भूषण यांची काव्यसुंदरी एका पेक्षा एक आकर्षक अलंकारांनी सजलेली आहे. ते अपरिमित सौंदर्य बघतांना रसिक मुग्ध होतात. त्यांच्या काव्यात सर्वच अलंकारांची रेलचेल आहे. अर्थालंकारांपेक्षा शब्दालंकारांना प्राधान्य आहे. त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे यमक अलंकारांनी नटलेले हे एक उदाहरण बघा!
ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।
कंद मूल भोग करैं कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वै तीन बेर खाती हैं।
भूषन सिथिल अंग भूषन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती हैं।
‘भूषन’ भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जड़ातीं ते वै नगन जड़ाती हैं॥
महत्वाचे शब्दार्थ
(१) ऊंचे घोर मंदर – उंच विशाल महाल/उंच विशाल पर्वत
(२) कंद मूल – राजघराण्यात खाल्ले जाणारे चविष्ट कंद-मूळ / जंगलातील कंद मुळे
(३) तीन बेर खातीं – तीन वेळा खात होत्या/ तीन बोरे खातात
(४) बिजन – पंखे/ एकाकी
(५) नगन – नग – हिरे मोती इत्यादी रत्ने/ नग्न
कवीराज भूषण म्हणतात: “ज्या शत्रूंच्या स्त्रिया ज्या पूर्वी उंच-उंच-विशाल राजमंदिरांत राहत होत्या त्या आता शिवरायांच्या भीतीमुळे आणि आपला जीव वाचवण्यासाठी भयंकर पर्वतांच्या गुहेत लपून राहतात. ज्या महालातील स्वादिष्ट पदार्थ खात होत्या, त्या आता जंगलात भटकत जंगली कंद, मुळे आणि फळे खाऊन जगतात. जडजवाहिराने जड झालेल्या दागिन्यांच्या वजनामुळे ज्यांचे अंगप्रत्यंग शिथिल असायचे, त्यांचेच अंगांग आता भुकेने कासावीस होत आलेल्या अशक्तपणामुळे शिथिल झाले आहे. ज्या राजस्त्रियांवर शीतल पंखे डुलत असत, त्या आता निर्जन जंगलात एकट्या फिरतात. भूषण म्हणतात, एकेकाळी ज्या मुघल स्त्रिया अभिमानाने हिरे मोती अन विविध रत्न यांनी जडवलेले दागिने घालून मिरवीत असत, त्या आता वस्त्रहीन अवस्थेत हिवाळ्याच्या भीषण शीतकालात थर थर कापत असतात.
स्वाभिमानी महाकवि भूषण
शिवरायांच्या दरबारी रुजू असलेले महाकवि भूषण अत्यंत स्वाभिमानी होते. त्याचेच एक उदाहरण! एकदा दुसऱ्या राज्याचा एक राजा शिवरायांच्या दरबारी आला. कवींचे शिवराय आख्यान ऐकून तो खूपच प्रभावित झाला. तो भूषणला आग्रह करीत म्हणाला, ‘तुम्ही माझ्या दरबारात येऊन माझ्यावर प्रशंसात्मक काव्य करा.” कांही दिवसांनी भूषण त्या राजाच्या दरबारी गेले आणि त्या राजाच्या प्रशंसात्मक काव्यग्रंथातील कांही अंश त्यांनी वाचून दाखवले. सर्वांनी त्यांची स्तुती केली. तेव्हां तो अहंकारी राजा म्हणाला,”या तीन लाख सुवर्ण मुद्रा घ्या, इतके अधिक मानधन देणारा राजा या देशात तुम्हाला कुठेही भेटणार नाही.” भूषण त्याच्या अहंकाराने व्यथित होऊन गप्पच होते. राजा त्यांना म्हणाला, “याहून अधिक सुवर्णमुद्रा हव्या असतील तर तसे सांगा, मी देईन.” कविराजांनी ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली राजाला परत केली आणि त्या गर्विष्ठ राजाला म्हणाले, “तुम्ही माझ्या काव्याची कदर केली नाही. तुम्हाला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे होते. तुम्ही माझा आणि माझ्या कवितेचा घोर अपमान केला आहे.” राजाला तेव्हां आपली चूक कळली व त्यांने कवींची क्षमा मागितली अन आपल्या दरबारी रुजू होण्याची विनंती केली. पण स्वाभिमानी कवी भूषण तडक त्या राजाच्या दरबारातून थेट शिवछत्रपतींच्या दरबारी परतले!
भूषण यांच्या अद्वितीय कवितेमध्ये राष्ट्रीय चेतना ओसंडून वाहत असते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय भावनेने भारलेले कवी आहेत.महाकवी भूषण यांचे हिंदी साहित्यात अनोखे स्थान आहे. रत्नांचा खच पडलेला असतांनाही जसा कोहिनूर आपल्या लखलखणाऱ्या तेजाने उठून दिसतो, तद्वतच रीतिकालात शृंगार आणि हास्यरसाची प्रचुर साहित्य निर्मिती करणाऱ्या कवींच्या गराड्यात कविराज भूषण आपल्या आगळ्यावेगळ्या वीररसाने ओतप्रोत कवितेमुळे अजरामर झालेले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखनातून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचे धडे शिकवले आणि हिंदू संस्कृतीच्या ऐश्वर्याची नव्याने ओळख पटवून दिली. त्यांचे काव्य निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहे आणि तो जपून ठेवणे आपले परम कर्तव्य आहे.
– समाप्त –
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈