श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “ठिणगी ठिणगी वाहू दे” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
श्री सोमनाथ
सांगलीतले तरुण भारत स्टेडीयम. श्रोत्यांची तुडुंब गर्दी. आज एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच मंगेशकर गाणार होते! लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर.
मंचावर जणू आकाशगंगाच अवतरली होती… त्यात लतादीदी धृवपदी विराजमान. साधी माणसं या चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं… जगदीश खेबुडकर या भारी माणसाने आणि संगीत दिले होते.. आनंदघन अर्थात खुद्द लता मंगेशकर यांनी.
म्युझिक अरेंजरने इशारा केला… वन. टू… थ्री…. स्टार्ट ! गाण्याचा प्रारंभच मुळी होता एक हलक्याशा तालवाद्याच्या ठेक्याने…. त्या तालवादकाने धडधडत्या काळजाने आणि थरथरत्या हाताने आपले ते नाजूक वाद्य स्वामी समर्थांचे स्मरण करून छेडले…. अचूक… अगदी अचूक ! आज त्याने चूक करून चालणारच नव्हतं…. दिदींनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण श्रोतृवृंद अक्षरश: मोहरून गेला! गाणं ज्या तालवाद्याने सुरु झाले होते.. त्याच वाद्याच्या तालात अगदी नाजूक पावलांनी चालून थबकले…. अर्थात टाळ्यांचा कडकडाट झालाच! दीदीने मग राजाच्या रंग म्हाली सुरु केले आणि मग या राजाची भीड चेपली गेली!… हा वादक होता…. राजू! अर्थात सोमनाथ रघुनाथ साळुंके. पुण्यातून सांगलीत या कार्यक्रमासाठी राजू जावळकर, रमाकांत परांजपे हे वादकही गेले होते आणि त्यांनी या वादकाला सोबत नेले होते…. मंगेशकरांचा वाद्यवृंद या राजूसाठी अगदी नवखा होता!
सोमनाथ यांचा जन्म एरंडवण्यातल्या गणेशनगर वस्तीत तेरा जानेवारी चौसष्ट रोजीचा! वडील त्यांच्या तारुण्यात गोवा मुक्ती लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक. पुढे पोटासाठी त्यांनी दैनिक केसरीमध्ये कंपोझर म्हणून नोकरी केली. परंतु आधुनिक छपाई यंत्रे आली आणि हे खिळे जुळवणारे कालबाह्य झाले. मग रघुनाथराव ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. खाणारी तोंडे आणि येणारे रुपये… मेळ बसणे शक्य नव्हते. सोमनाथ यांचे मोठे बंधू सुद्धा याच व्यवसायात आले कारण पर्याय नव्हता. धाकट्या सोमनाथला शिकावेसे वाटत होते.
मनपा ५५ नंबर १ली ते ४थी. पाचवी ते सातवी ३० नंबर. आठवी नववी नारायण पेठेतील वेलणकर हायस्कूलमध्ये. आणि हॉटेलचा कचरा टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, water प्रूफिंगची कामे करून देणे, सायकलवर फिरून वर्तमानपत्रे घरोघरी पोहोचवणे ही आणि अशी कित्येक किरकोळ कामे करून दहावीचा अभ्यास करण्यासाठी आपटे प्रशाला नाईट स्कूलमध्ये जाणे असा क्रम सुरु झाला.
हे जीवनचक्र सुरु असताना सायकलच्या दोन चाकांनी भुरळ घातली. आणि सोमनाथची स्वप्नं वेगाने धाव घेऊ लागली. श्रीगोंदेकर नावाच्या मित्राची एक साधी सायकल मिळाली… तिच्यात modification करून तिची रेसिंग सायकल बनवली Roadster! आणि मग स्थानिक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला आरंभ केला….. जिंकण्याची चटक लागली ती इथूनच.
त्या काळी पुण्या-मुंबईमध्ये सायकल रेसचे वेड होते. खंडाळा घाट वेगात पार करणा-याला घाटांचा राजा किताब मिळायचा. आधुनिक सायकलवाले हा घाट चोवीस मिनिटांत चढायचे आणि आपला हा राजा जुनी सायकल दामटत त्यांच्या मागोमाग पोहोचायचा… केवळ चार मिनिटांचा फरक असायचा! नंतर पै-पै जमवून सोमनाथ यांनी ४६००० हजार रुपयांची रेसर सायकल विकत घेतली.
या खेळात पैसा मात्र फारसा नव्हता! कित्येक स्थानिक स्पर्धांमध्ये सोमनाथ यांनी कप्स, ढाली मिळवल्या. इतक्या की घरात ठेवायला जागा पुरेना. लाकडी ढाली तर सोमनाथ यांच्या मातोश्रींनी चक्क बंबात घालायला वापरल्या!
सायकल रेसिंग मध्ये सोमनाथ यांनी एकदा नव्हे दोनदा राष्ट्रीय मजल मारली. प्रॉमिस कंपनीने १५ जानेवारी ते २० जानेवारी १९८९ या कालावधीत मुंबई ते गोवा अशी ६८० किलोमीटर्स अंतराची पाच दिवसांची सायकल रेस आयोजित केली होती. पूर्ण देशभरातले सायकलपटू सहभागी होते. आपले सोमनाथ त्यांच्या त्या सायकलवर स्वार झाले आणि त्यांनी तिस-या क्रमांकाने गोवा गाठले…. ५७ तास, ५७ मिनिटे आणि ५८ सेकंदात! गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमनाथ यांनी पारितोषिक स्वीकारले…. वडिलांनी गोवा मुक्ती आंदोलनात घेतलेल्या सक्रीय सहभागाला जणू ही आदरांजली म्हणावी!
प्रॉमिस कंपनीच्या स्पर्धेतले हे यश प्रॉमिसिंग सोमनाथ यांना चांगल्या नोकरीचे प्रॉमिस मात्र देऊ शकले नाही. पोलिस खाते, बँक्स, शासकीय सेवा यांना सोमनाथ यांचे कर्तृत्व दिसले नाही. मग सोमनाथ यांनी सायकल एका कोप-यात ठेवून दिली!
पण सोमनाथ यांनी आणखी एक छंद जोपासला होता… वाद्य वादनाचा. जिथे कुठे वाद्य वाजवली जात तिथे सोमनाथ जात…. तिथल्या लोकांची काहीबाही कामे करून देत… आणि ते वाद्य कसे वाजवले जाते… त्याचे निरीक्षण करीत…. अशी सुमारे चाळीस वाद्ये सोमनाथ वाजवायला शिकले! मग लोक त्यांना वाद्ये वाजवायला बोलावू लागले.
मंगेशकरांच्या सांगलीतल्या कार्यक्रमासाठीही त्यांनाही असेच बोलावले गेले होते. पण त्या कार्यक्रमानंतर त्यांना पुढे काही विशेष काम मिळाले नाही.
अभिनव पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन होते. त्यात काही वाद्ये वाजवायला कुणी तरी पाहिजे होते. सोमनाथ यांचे मोठे बंधू या शाळेची वर्दी करीत असत…. म्हणजे रिक्षा काका होते. शिरीष निर्मळ हे त्यावेळी तिथे नुकतेच सेवक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी सोमनाथ यांच्या भावाकडे निरोप दिला आणि सोमनाथ यांचा अभिनव परिवारात वाजत गाजत प्रवेश झाला! इथे काही वर्षे सेवक म्हणून सेवा दिल्यानंतर सोमनाथ यांना आदर्श शिक्षण मंडळीच्या कार्यालयात नेमणूक मिळाली.
याच नोकरीच्या आधारे २७/१२/९४ रोजी सोमनाथ विवाहबद्ध झाले. आता कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमांत ताल वाद्ये वाजवून सोमनाथ संसाराच्या ऐरणीला ठिणगी ठिणगीची फुले वाहत जमेल तसा भाता वरखाली करीत होते.
आणि एकेदिवशी ऐरण प्रसन्न झाली बहुदा. श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टने गणेश क्रीडा कला मंचावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजला होता. पुण्यातील प्रसिद्ध हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर यांनी सोमनाथ यांना या कार्यक्रमात संधी मिळवून दिली. उषाताई मंगेशकर होत्या गाण्यास. पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रेक्षकात उपस्थित होते. त्यांनी सोमनाथ यांची कला ऐकली आणि त्या रात्री बारा वाजता सोमनाथ साळुंके यांना पंडितजीचा फोन आला… सर्व वाद्ये घेऊन उद्याच्या कार्यक्रमास हजर रहावे! उषाताईसोबत तर शनिवार वाड्यासमोर झालेल्या कार्यक्रमात एका गाण्यात साथही देण्याची संधी सोमनाथ यांना मिळाली होती. विशिष्ट ढंगाच्या आवाजामुळे आणि उत्तम पाठांतर असल्याने पल्लेदार वाक्ये सोमनाथ सहजी म्हणू शकत होते.
अशा गावात तमाशा बरा.. इशकाचा झरा…. पिचकारी भरा… उडू दे रंग.. उडू रंग… मखमली पडद्याच्या आत…. पुनवेची रात… चांदनी न्हात… होऊ दे दंग.. चटक चांदणी चतुर कामिनी… काय म्हणू तुला तू हाईस तरी कोण? छबीदार छबी.
पुढे अनुराधा पौडवाल यांच्या सोबत अनिल अरुण यांच्या रजनीगंधा कार्यक्रमात सोमनाथ यांची तालवाद्ये वाजली. डोंबिवली मध्ये आशा ताईनी मोठा कार्यक्रम केला.. त्यात सोमनाथ होते… ताईन्च्या घरी सराव करता करता आशा ताईने केलेला पुलाव चाखण्याची संधीही त्यांना लाभली.
उषाताई, आशाताई, हृदयनाथ, भारती मंगेशकर यांनी या प्रामाणिक सोमनाथला जीव लावला. जीवघेण्या आजारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अगदी व्ही आय पी कक्षात उपचार दिले… तेही अगदी विनामूल्य. कलेची कदर करणारी ही माणसे म्हणूनच मोठी आहेत!
हाती लागेल ते वाद्य वाजवणे आणि मिळेल ते गाणे गाणे हा या जंटलमन राजूचा शिरस्ता. त्यातूनच आम्ही सातपुते चित्रपटात अशोक सराफ यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी साधली… सोनू निगम, वैशाली सामंत यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नाव झळकले… राजेंद्र साळुंके! मित्र त्यांना राजा म्हणत त्यातूनच राजेंद्र नाव रूढ झाले.
अभिनव पूर्व प्राथमिक…. आदर्श शिक्षण मंडळी…. आदर्श मुलींचे हायस्कूल… कै. सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल… आणि शेवटी अभिनव हायस्कूल अशा नोकरीचा प्रवास करताना आपण मोठे कलाकार आहोत, शिपायाचे काम कसे करू असे प्रश्न सोमनाथ उर्फ राजूकाका यांना पडले नाहीत. रात्री कार्यक्रम करून यायला उशीर झाला तरी सकाळी कामावर शाळेत वेळेत हजर राहणे हे राजूच्या अंगवळणी पडले होते. कार्यक्रम या शब्दातील पहिले का आणि शेवटचे म हे अक्षर मिळून काम असा शब्द होतो!
शाळेच्या कार्याक्रमात हक्काचा तालवादक म्हणून सेवा बजावली… संबळ विशेष आवडीचा. त्यांच्या मुलानेही, धनंजयने बी. पी. एड. करून शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु केले आहे. हा मुलगाही राजू काकांना ताल से ताल मिला करीत अनेक मोठ्या कलाकारांना वाद्य साथ करीत आहे….. तो सर्व वाद्ये वाजवतो.
सोमनाथ उर्फ राजू यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. स्वामी समर्थ कलाकार पुरस्कार, गंधर्व पुरस्कार आणि असे अनेक. सलग १२१ गाणी वाजवण्याचा त्यांचा विक्रम लिम्का बुक मध्ये नोंदला गेला आहे. ३१ जानेवारी, २०२५ रोजी राजू काका निवृत्त झाले. आजपर्यंत त्यांनी कित्येक प्रसिद्ध कलाकारांना साथ केली आहे. त्यात उषाताई मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, दयानंद घोटकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रा. नरेंद्र चिपळूणकर, राजू जावळकर, डॉक्टर राजेंद्र दूरकर, विवेक परांजपे, दयानंद घोटकर हे राजू यांचे मित्र, मार्गदर्शक!
अभिनव पूर्व प्राथमिक मराठी—आदर्श शिक्षण मंडळी कार्यालय—आदर्श मुलींचे विद्यालय—कै. सौ. सुशीलाबाई वीरकर विद्यालय आणि शेवटी तीन वर्षे अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, अशी त्यांची सेवा झाली !
कष्टाच्या ऐरणीवर श्रमाचे घाव घालीत सोमनाथ म्हणजे राजू काकांनी अनेकांची आभाळागत माया मिळवली आहे….. त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची चवरी वरखाली होत राहावी…. ही प्रार्थना !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈