श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “है प्रीत जहाँकी रीत सदा !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
त्याला फक्त एकच भाषा येत होती. आणि कामसुद्धा एकच माहीत होते…. जो पेशा स्वीकारला आहे त्या पेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा जशाच्या तशा पाळणे. त्याने त्याच्या देशासाठी सीमा भागात रस्ते बांधणीसाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचे काम इमानेइतबारे केले. त्याच्या देशाचे आणि शेजारच्या देशाचे युद्ध झाले आणि संपले सुद्धा. तो काही बंदूक चालवणारा सैनिक नव्हता. त्याचे सर्वेक्षणाचे काम मात्र सुरूच राहिले.
आपल्या तंबूच्या बाहेर असाच फेरफटका मारायला तो बाहेर पडला आणि रस्ता चुकला आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत पोहोचला. अन्नपाण्यावाचून बर्फाळ डोंगरात वाट शोधून थकलेला तो रेडक्रॉसच्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लोकांना आसाम मध्ये दिसला आणि त्यांनी त्याला शेजारच्या देशाच्या सैन्याच्या हवाली केले… अर्थात हा देश म्हणजे आपला भारत ! ‘जीते हैं किसीने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है… ‘ अशी धारणा असलेला देश.
देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून भारतीय यंत्रणेने या चिनी सैनिकावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्याच्यावर रीतसर खटला चालला आणि त्याची रवानगी सात वर्षांच्या तुरुंगवासासाठी करण्यात आली! यानिमित्त तो देशातील काही तुरुंग फिरला. शिक्षा संपल्यानंतर मात्र याला कुठे पाठवायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला. का कुणास ठाऊक मात्र याला चीनला पाठवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. चीनकडूनही तशी काही चौकशी करण्यात आली नसावी, बहुदा.
भारतीय पोलिसांनी याला मध्यप्रदेशातील तिरोडी या दुर्गम गावात सोडून दिले. भाषेचा अडसर अजूनही होताच. तो फक्त आपले नाव सांगू शके.. वांग की! त्याच्या नावाचा एक अर्थ होता… वांग म्हणजे राजा आणि की म्हणजे एकमेवाद्वितीय! आणि योगायोगाचा भाग म्हणजे तिरोडीच्या गावकऱ्यांनी त्याचे नामकरण केले राज बहादूर. ते त्याला नेपाळी किंवा पूर्वोत्तर राज्यातील माणूस समजले असावेत!
या चिनी राजाने मग तिरोडी जवळच्याच पीठ गिरणीत दळणाचे काम केले. काही पैसे जमा झाल्यावर गावातच दूध विक्रीचे एक छोटे दुकान सुरू केले. एकूणच दिसणे, स्वभाव आणि बोलणे वेगळे असल्याने गावकरी त्याच्याशी तसे प्रेमाने वागत असत.
हळूहळू हा आपला (नसलेला) भाई हिंदीचा भाई झाला… त्याला मोडके तोडके हिंदी समजू लागले. त्याला चीनमधील त्याच्या घराचा पत्ता माहित होता.. त्याने कित्येक पत्रे पाठवलीसुद्धा. पण त्याच्या पत्राचे पहिले उत्तर मिळायला तीस वर्षे लागली.
मध्ये बराच कालावधी गेल्यामुळे आणि वांगकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने न घर का न घाट का अशी त्याची अवस्था झाली होती. त्याला आपले भाऊ आणि आईची खूप आठवण येत असे… पण त्याच्यापुढे पश्चातापाशिवाय काहीही नव्हते. वांगच्या आधी दोन चिनी सैनिक भारतातल्या मनोरुग्णालयात सुमारे पस्तीस वर्षे होते. त्यांना कालांतराने म्हणजे २००३ मध्ये चीनच्या हवाली करण्यात आले!
सर्वांशी अदबीने, प्रामाणिकपणे वागत असल्याने वांगबद्दल कुणाची काही तक्रार नव्हती. त्याचे वागणेही संशयास्पद नव्हते. त्याचा गावातले लोक सोडून इतर कुणाशी संबंध नव्हता. स्थानिक पोलिस त्याची अधून मधून खबर घेत असत आणि त्याला माराहाण सुद्धा होई.
कालांतराने वांग याने त्या गावातल्याच सुशीला नावाच्या अतिशय गरीब मजूर मुलीशी विवाह केला.. कित्येक वर्षे तो अत्यंत गरीबीत राहिला. त्यात त्याने दोन मुली आणि एका मुलाला जन्म दिला.
वांगची कथा तशी कित्येकवेळा समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली होती पण त्याकडे त्यावेळी फारसे कुणी लक्ष दिले नाही. पण बीबीसी वर त्याची खबर आली आणि ती चीन पर्यंत पोहोचली. चीन सरकार आणि भारत सरकारमध्ये वांगबाबत बोलणे झाले आणि चीनने २०१३ मध्ये वांग, त्याचा मुलगा विष्णू, आणि सूनबाई नेहा आणि खनक नावाची नात यांना चीनचा पासपोर्ट दिला… पण वांग २०१७ मध्ये चीनमध्ये जाऊ शकला. अर्थातच त्याचे तेथे मोठे स्वागत झाले. याला कारणीभूत झाला तो सोशल मिडीया. त्याची पत्नी मात्र त्याच्या सोबत गेली नाही. मुलगा, सून आणि नात यांच्यासाठी चीनने प्रवासी विजा दिला होता. भारत सरकारने मात्र वांग याची इच्छा असल्यास त्याला भारतात परतण्याची परवानगी देऊ केली! पण तीनच महिन्यांत वांग त्याच्या आजारी पत्नीला भेटायला भारतात परतला. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुशीला मृत्यू पावल्या. मग वांग पुन्हा चीनला परतला. आता त्याच्यापुढे दोन कुटुंबे होती.. चीनमध्ये त्याचे भाऊबंद आणि भारतात त्याचा मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे !
वांगने चिनी सैन्याकडे त्याच्या पेन्शनची मागणी केली. पण त्यांच्या कागदपत्रात वांग की ‘मयत’ दिसतो. आणि त्याच्याकडे आणखी कोणतीही कागदपत्रे नाहीत. मार्च २०२४ मध्ये वांग भारतात तीन महिन्याच्या प्रवासी वीजावर आला होता. त्यानंतर त्याची खबर किमान मिडीयात तरी आलेली नाही… बहुदा तो चीनला परतला असावा!
चिनी अर्थात चायनीज वस्तू त्यांच्या दर्जाबाबत भारतात तशा बदनाम आहेत! ‘चलेगा तो चांद तक नहीं तो शाम तक’ असेही गंमतीने म्हटले जाते. परंतू त्यात तथ्य असण्याची शक्यता खूप जास्त दिसते! असो. पण वांग हा चायनीज मात्र भारतात चक्क पन्नास वर्षे टिकला! इथल्या प्रेमळ माणसांनी या शत्रूला सांभाळून घेतले… हीच तर भारताची खासियत आहे. चीन आणि पाकिस्तानी लोकांबाबत मात्र असे म्हणता येत नही… आपले कितीतरी सैनिक त्यांच्या कैदेत खितपत पडले होते… आता तर ते या जगात असण्याची शक्यता अगदीच धूसर आहे… कारण भारत-चीन युद्धाला साठपेक्षा अधिक वर्षे उलटून गेलेली आहेत.
युद्धामुळे खूप नुकसान होते असे वयाची ऐंशीपेक्षा जास्त वर्षे उलटलेले वांग की म्हणत असतात.. त्यांनी कुटुंबाचा विरह खूप जास्त वर्षे सहन केला, त्यांची आणि आईची भेट शेवटपर्यंत झाली नाही !
पण चिनी कम आणि भारतीय जास्त असलेले वांग की उर्फ राज बहादूर वांग भारताबद्दल कृतज्ञ आहेत ! ‘ जीते हो किसीने देश तो क्या.. हमने तो दिलों को जीता है! ‘ असे आपण अभिमानाने म्हणू शकतो
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈