श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ गेट टुगेदर… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
परवा, अचानक ओळखीचा आवाज आला खूप वर्षानंतर…
चेहऱ्यावर औदासीन्य पसरलेलं.. थरथर कापत काप-या आवाजात भयकंपीत झालेल्या एका मुलीने आवाज दिला, “ ए ओळखले का मला..? “
मी अंदाज घेऊन म्हणालो, “ अरे, तू तर ‘लोकशाही’ ना..! “
असे म्हणताच, तिच्या चेह-यावर मंद स्मित उगवले…. सूर्यासारखे….!
“ खूप वर्षे झाली ग, अंदाज चुकू शकतो… “
“ नाही रे, तू अगदी बरोबर ओळखले… “ ती म्हणाली…
मी.. “ पण तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था.. मग कोणी केली तुझी अशी ही अवस्था….
आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी.. मानवता, संवेदनशीलता अन् ती सहिष्णुता….? “
“ होय रे, ‘सहिष्णुता’ पुर्वी भेटायची, सर्वांची चौकशी करायची… पण हल्ली दिसत नाही रे.. सत्याची बाजू घेतली म्हणून तडीपार केले म्हणतात तिला.. ‘क्रांती’ सर वर्गशिक्षक होते…. तोपर्यंत सगळं ठिकठाक होते…
विद्रोह, प्रज्ञा व ‘संघर्ष’ हे सुद्धा होते.. बरं, ते जाऊ दे… “ – ‘लोकशाही’ म्हणाली.. “ माझी “मूल्ये” कशी आहेत रे….! . “न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता”… “
“ अगं, ते तरी कशी असणार..! पुर्वी “न्याय” भेटायचा कधीकधी, तो परमनंट नाही झाला अजूनही..
कॉन्ट्रॅक्चूअल वर काम करतो… “
“ बरं ‘समता’ आणि ‘बंधुता’ च काय..? “
“ ‘समता’ तर इतिहासात फेल झाली होती… पण मुळात ती विषमतेच्या मगरमिठीत आहे.. “
“ आणि बंधुता कशी आहे..? “
“ अॕज इट इज…! अगं, ‘संविधान’ अन् तुझी अॕडमिशन एकाचवेळी झाली न.. कसा आहे ग तो…..? “
“ काय सांगू तो तर जगातील सर्वात प्रज्ञावंत विद्यार्थी.. संविधानामुळेच तुझी माझी ‘अस्मिता’ आहे..
खरं आहे रे ‘संविधान’ सोबत असलेले ‘समंजस’, प्रगल्भता आणि ‘व्यापकता’ यांनीच तर आपल्या वर्गाला एका सूत्रात बांधून ठेवले.. म्हणून तर ‘मानवता’ निर्माण झाली होती… आपल्या वर्गात… पण ‘फॕसिझम’ ची अॕडमिशन झाली आणि त्याने वर्गात विभाजनाचा प्रयत्न केला.. पण तो ‘षडयंत्र’ त्याच्या आवडीचा विषय
तुला ‘विद्वेष’ आठवतो का..? जो नेहमी अबसेंट असायचा.. तोच आज मेरीट आहे.. आज त्यालाच लौकिक प्राप्त झाला आहे.. अरे आणि तेव्हा ‘संवेदनशीलता’, ही होती… प्रत्येकाच्या मनात जिवंत… ‘विद्वेष’ ने केला तिचा एनकाऊंटर.. तीच तर आहे खरी खंत… “अभिव्यक्ती” कशी आहे रे…. आपण जिला “मिडिया” म्हणायचो…? “
“ तिचीही अवस्था खराब आहे अगं, तिच्या गळ्यातील स्वरयंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने ती ‘सत्या’ ची बाजू न मांडता, ‘सत्ते’ चे गाणे गात असते.. ती आता तटस्थ नाही राहिली.. “
“ अरे आणि तुला आठवते का… आपल्या वर्गात एक होती ‘निष्ठा’, “
“ हो ग… तिच्यावरच तर अवलंबून होती सर्वांची ‘प्रतिष्ठा’…. पण सध्या… ‘निष्ठा’ सुध्दा “अर्थ ” शास्त्राला सरेंडर झाली.. आणि ‘एथिक्स’ मध्ये फेल झाली.. असे ऐकले.. “ मी म्हणालो.
“ आणि हा ‘फॅसिझम’ कोण ग…? “
लोकशाही म्हणाली, “ तो बघ ‘प्रतिक्रांती’ च्या टीममध्ये होता.. नेहमी अवैज्ञानिक, तर्कविसंगत.. गोष्टी करायचा.. दंतकथांना इतिहास मानायचा.. अन् खरं म्हणजे ‘अंधश्रद्धा’ ही त्याची पक्की मैत्रीण होती.. “
“ हो ग..! , ती काही बदलली का येवढ्या वर्षात..? “
“ नाही रे.. अजून तरी नाही.. मला वाटते, ती बदलली असती पण तिने ‘विवेका’ शी असलेली मैत्री तोडली
त्यामुळे ती नेहमी अविवेकी, अतार्किक वागते… बरं… , ‘मनु’ कसा आहे..? “
“ होता तसाच आहे… अग, तुला आठवते का..? आपल्या वर्गात ‘आपुलकी’ ‘नितिमत्ता’ होती…
फार प्रेमळ तिची “भावना” होती. परस्परांच्या भावनांची कदर करायची.. त्यामुळे “प्रज्ञा” सुध्दा त्यांचा आदर करायची.. संघर्ष’ आणि ‘विद्रोह’ ते सातत्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे… ते दोघेही नेहमी ‘क्रांती’ च्या सोबत असायचे… पण आजकाल सगळे कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत.. फोन लागत नाही त्यांना.. ”
“ “करुणा” लाही फोन करून बघशील बरं… ‘विद्या, शिल’ आणि ‘मैत्री’ सुध्दा भेटले तर सांग त्यांना. ”
“ अगं, मला ‘विकास’ भेटला होता… मी कुतूहलाने त्याला म्हणालो.. ”अरे, किती बदलला तू… अग, तो ‘वाढ’ लाच विकास समजत होता… तो अंगात खूप फुगला…. पण ती फक्त ‘वाढ’ होती… विकास “अंतर्बाह्य” असतो… तो गुणात्मक असतो ना.. “
“अरे, समजेल त्याला कधी ना कधी… “
“ पण तोपर्यंत…. काय….? ”
“ बरं, आणि ‘अहंकार’ कसा आहे. रे…? ‘अहंकार’ आणि ‘स्वाभिमान’ दोघेही दिसायला सारखेच दिसत होते रे.. माझे नेहमी कन्फ्युजन व्हायचे.. “
“ नाही ग… त्याच्या सोबत नेहमी ‘नम्रता’ असायची व “स्वाभिमान” सोबत ती एकाच बेंचवर बसायची….
तो ‘स्वाभिमान’…! ‘स्वाभिमान’ ला ही बोलावू म्हणतो… “
“ अर्थातच, तो तर कणा आहे.. आपल्या टिमचा… त्याच्या शिवाय ‘चळवळ’ येणार नाही… “
“ बरं ‘चळवळ’ कशी आहे रे…? “
“ कोणती चळवळ..? शोषकांची…! की, शोषणमुक्तीची…! की मानवमुक्तीची..! तुला खरं सांगु का.. जेव्हा आपल्या गृपमधून ‘निष्ठा’ गेली.. अन् “तृष्णे”‘ ची अॕडमिशन झाली… तेव्हा पासून ‘चळवळ’ कणाहीन झाली… तिची परवड सुरू झाली… बघ ना ‘त्याग’ व ‘समर्पण’ ची जोपर्यंत ‘निष्ठे’ सोबत मैत्री होती
तोपर्यंत ‘चळवळ’ गतिमान होती.. खरं तर तीच तर आपल्या अभिमानाची खाण होती.. “
“ हं.. आणि “करुणा” बद्दल काय…? ”
“ करुणा म्हणाली, ‘समता’ आली तरच मी येईल.. तिच्याशिवाय..
निर्हेतूक मैत्री होती…. तेव्हाच तर खरी खात्री होती…. “
“ अरे आपल्या वर्गात ‘विश्वास’ होता… “
“ होय.. तोच तर जगण्याचा खरा ‘श्वास’ होता.. “
“ आणि काय रे.. अरे, ती प्रतिक्रांती काही बदलली का..? बरं, तिची मूल्ये विषमता, भीती, अविद्या
बरी आहेत ना..! “
मी म्हणालो, “ लोकशाही, तु सगळ्यांची चिंता करतेस.. “
“ नाही रे…. आपली ‘संस्कृती’ मानवतावादी आहे ना… विचारांचा फरक जरी असला, मतभेद असले तरी आपले त्यांच्यावर प्रेम आहेच.. शेवटी ते सर्व आपले वर्ग मित्र आहेत.. “
लोकशाही म्हणाली, “ होईल रे… सगळं बदलेल.! . तुला आठवतो का…. आपल्या वर्गातला ‘परिवर्तन’
तो पूर्वी ‘प्रस्थापित’ सरांची बाजू मांडायचा.. माझ्याशी जोरजोरात भांडायचा.. एक दिवस तो स्वतः ‘विस्थापित’ झाला… अन् त्याच्या विचारात, आचारात.. अचानक.. बदल झाला. आज तो प्रतिगामीत्व नाकारतो, विस्थापितांच्या समस्यांवर बोलतो.. लिहितो.. प्रहार करतो.. आता तर त्याने ‘पुरोगामी’ विषयात ‘पीएचडी’ केली.. अन्यायाविरुद्ध पेनाला धारधार करतो. “
“परिवर्तन होत असते रे… फक्त आपल्या सोबत ‘प्रबोधन’ असला पाहिजे… तोच एकमेव मार्ग मला दिसतो…. हे सगळे आपले वर्गमित्र भेटले तर सांग त्यांना “
मी म्हणालो, “ काय सांगू.. “
‘लोकशाही’ म्हणाली, “ गेट टुगेदर करू म्हणते.. “
“ कुठे..? “
“सेक्युलर” ग्राऊंडवर… “
“पण नियोजन कोण करणार.. ”
“भारतीय नागरिक सर…! “
“ अग,… पण गेट टुगेदर कशासाठी…? “
“ सर्वांच्या मनाची पुनर्रचना करून हे जग पुन्हा सुंदर करण्यासाठी रे..! ! “
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com