श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” – भाग- २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
नायब सुभेदार संतोष राळे
(प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.) – इथून पुढे
हे पथक एक डोंगर चढू लागले. अंधारले होते… संतोष यांना हलकीशी चाहूल लागली… समोरून डोंगरउतारावरून कुणी तरी येत होते! सर्वांनी त्वरीत पवित्रा घेतला. संतोष साहेबांना त्यांना वाटले की हे आपलेच जवान असण्याची शक्यता आहे. काहीवेळा आपलेच जवान स्थानिक लोकांच्या वेशात त्या भागात फिरून माहिती घेत असतात. त्या दोघांकडे काही शस्त्रेही दिसत नव्हती. संतोष साहेबांनी आपल्याजवळील walki-talkie वरून त्या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला… पण फ्रीकेव्न्सी जुळली नाही! तेंव्हा मागे असलेल्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला… काही तरी निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणून संतोष यांनी सावधपणे त्या दोघांकडे जाण्याचा निर्णय घेतला… त्यांनी सहकारी जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे निघाले… एवढ्यात त्यांच्या दिशेने एक गोळी फायर झाली… ती गोळी संतोष यांच्या डोक्याच्या अगदी जवळून मागे गेली आणि दगडावर आदळली… साहेब अगदी थोडक्यात बचावले होते…. सावध असलेल्या संतोष यांच्या एके-४७चा रोख त्या तिघांवर होताच.. त्यांनी एक जोरदार फैर अचूक झाडली… ते तिघेही त्या टेकडीवरून गडगडत खाली आले ते अगदी संतोष साहेब जिथे बसले होते त्याजागेच्या अगदी जवळ…. त्या तिघांच्या हातांतली शस्त्रे ते टेकडीवर खाली गडगडत येताना टेकडीवरच पडली होती… संतोष यांनी तीन अतिरेकी ठार मारले होते!
संतोष साहेबांनी खबरदारी म्हणून या तिघांच्याही मृतदेहांच्या टाळक्यात एक एक गोळी घालण्याचे आदेश त्यांच्या सहका-याला दिले. ते तिघे एकमेकांशेजारीच जणू एका ओळीत पडलेले होते… आपल्या जवानाने पहिल्याच्या डोक्यात एक गोळी घातली…. दुस-याच्याही डोक्यात एक गोळी घातली… त्याच्या डोक्यातील मेंदू बाहेर पडून तिस-याच्या डोक्यावर जाऊन पडला!… जवानाला त्या गडबडीत असे वाटले की तो तिसराही अतिरेकी खलास झालेला आहे.. आता परत गोळी मारण्याची गरज नाही! तो तिसरा जिवंत राहिलेला होता!….. आणि दुर्दैवाने हे लक्षात आले नव्हते!
हे तिघे अतिरेकी जिथून आले तिथेच आणखी काही अतिरेकी लपून बसलेले होते. जोजन साहेबांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्यांच्यापैकी काहीजण जबर जखमी होते, शिवाय त्यांच्याजवळचा दारूगोळाही बहुदा संपुष्टात आला असावा. या अतिरेक्यांच्या शोधात संतोष आणि त्यांचे पथक पहाड चढू लागले. एकेठिकाणी शंका आली म्हणून ते दोन मोठ्या पत्थरांच्या आडोशाला बसले… अंदाज घेण्यासाठी जरासे डोके वर काढले तेंव्हा एकाचवेळी तीन बाजूंनी जबरदस्त फायरिंग सुरु झाले. संतोष यांनी ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली… अतिरेकी त्यांच्या वरच्या बाजूला होते.. त्यांना अचूक नेम साधता येत होता… त्यांनी संतोष यांच्यावर फायर सुरु केला… त्यांच्या मस्तकाच्या अगदी वरून गोळ्या सुसाट मागे जात होत्या… माती डोळ्यांत उडत होती… इतक्यात तिथल्या एका झाडाची वाळलेली फांदी साहेबांच्या डोक्यावर पडली! तशाही स्थितीत त्यांनी जवाबी फायरींग जारी ठेवले… त्यातले काही जण बहुदा मागे पळाले असावेत.. एका अतिरेक्याच्या रायफलची magazine तुटली… तो एका झाडाच्या आड ती magazine बदलण्याच्या प्रयत्नात उभा होता… त्याची रायफल कोणत्याही क्षणी गोळीबारास सुरुवात करणार होती…. संतोष यांनी त्याला आपल्या जीवाची पर्वा न करता दुस-या बाजूने जात जबरदस्त ठोकला… त्याचे हात, पाय वेगवेगळ्या दिशेला उडाले…. कोथळा बाहेर पडला… ! आधीचे तीन आणि आता हा चौथा बळी मिळवला होता संतोष यांनी. त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊन मग संतोष साहेब खाली आधीच्या जागेपर्यंत आले. रात्री ठार मारलेल्या तिघांपैकी एकाचा मुडदा तिथून गायब होता. रात्री अंधारामुळे काहीसा गोंधळ उडाला असावा… दोनच अतिरेकी असावेत असा समज झाला.. पण तेवढ्यात संतोष यांना तेथील एका झाडामागे काही हालचाल दिसली… तर रात्री ‘मरून’ पडलेला अतिरेकी चक्क जिवंत होता… त्यांना स्वत:ची स्वत: मलमपट्टी केलेली होती! साहेबांनी त्याला लांबूनच आवाज दिला आणि वरिष्ठ अधिका-यांच्या मेसेज नुसार त्याला शरण येण्यास फर्मावले. संतोष साहेबांनी त्याला त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुढे यायला सांगितले..
पण त्याला यांची भाषा काही समजेना. मग वरिष्ठ साहेबांनी एक दुभाषी तिथे धाडला. त्या अतिरेक्याने त्या दुभाषामार्फत सांगितले की तो जखमी असल्याने चालू शकत नाही.. एक पाय निकामी झाला आहे… त्यामुळे कपडे काढणे शक्य नाही… जवळ कुठलेही हत्यार नाही! संतोष यांनी त्या अतिरेक्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला….. पण सहकारी जवानाला त्याच्यावर नेम धरून बसायला सांगितले.. जरासा जरी हलला तरी लगेच ठोक! संतोष साहेब त्या अतिरेक्याच्या जवळ जात असताना त्याने त्याच्या कपड्यात लपवलेला हातागोळा काढला आणि त्याची पिन उपसून तो साहेबांच्या अंगावर फेकला… पण त्या फेकण्यात विशेष जोर नव्हता… संतोष साहेबांनी त्वरीत जमिनीवर लोळण घेतल्याने त्यांना त्या फुटलेल्या गोळ्याचा काही उपद्रव झाला नाही…. तो गोळा त्या अतिरेक्याच्या अगदी जवळच फुटल्याने आणि त्यात आपल्या जवानाने अचूक निशाणा साधल्याने तो आता मात्र कायमचा गेला! आधीच मेलेल्या दोघांचे मृतदेह तिथून हलवताना साहेबांनी काळजी घेतली… हे अतिरेकी मरताना त्यांच्या जवळचा हातागोळा अंगाखाली लपवून ठेवतात… त्यांचा देह उचलायला जाताच तो गोळा फुटेल अशी व्यवस्था करून ठेवतात. उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या संतोष यांनी त्यांचा हा डाव ओळखला…. अतिरेक्यांच्या बुटाला दोरी बांधून ती जंगली कुत्री मागे ओढली…. हातगोळ्यांचे स्फोट अतिरेक्यांच्या शरीरांना आणखीनच क्षतविक्षत करत गेले!
आधी डोंगरावर मारल्या गेलेल्या एकाचा साथीदार दुस-या मार्गाने आपल्या मागे असलेल्या तुकडीच्या दिशेने निघाला होता. पण एका प्रामाणिक खबरीने वेळेत सूचना दिल्याने त्याचाही आपल्या जवानबंधूनी खात्मा केला…. सर्वांनी मिळून सहा दिवसांत एकूण अठरा अतिरेक्यांना कंठस्नान घडवले होते.
त्यावेळी हवालदार पदावर कार्यरत असलेले श्री. संतोष राळे यांना पुढे नायब सुबेदार म्हणून बढती मिळाली. नंतर त्यांना लेबानन या आफ्रिकी देशात शांतीसेनेत काम करण्याची संधीही मिळाली!
१८ अतिरेक्यांच्या निर्दालनात सहभागी होण्याची ही अतुलनीय कामगिरी बजावून संतोष साहेब गावी आले… हा मराठी मातीतला रांगडा गाडी…. अगदी down to earth! त्यांनी घरी काहीही सांगितले नव्हते. देशासाठी लढण्याचे आणि शत्रूला ठार मारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या हृदयात होते.. ये दिल मांगे मोअर… ही त्यांची इच्छा होती. आता पुढची लढाई कधी याची ते वाट पहात होते. आणि आपण काही फार मोठी कामगिरी केली आहे याचा साधा लवलेशही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात दिसत नव्हता… आणि आजच्या घडीलाही दिसत नाही.
त्या दिवशी त्यांच्या गावातल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता. नायब सुबेदार संतोष राळे साहेब या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यादिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी होती…… आपले सुपुत्र श्री. संतोष राळे यांना अशोक चक्रानंतर दुसरे स्थान असलेले कीर्ती चक्र जाहीर झाले आहे! गावकरी लोकांनीच त्यांना ही खबर दिली… त्यादिवशी दूरदर्शनवरही बातमी दिसली… संतोष साहेबांनी फोन करून खात्री करून घेअली… तेंव्हा त्यांना खरे वाटले… कारण एवढा मोठा पुरस्कार मिळेल असे त्यांना वाटलेही नव्हते. उलट आपले मोठे अधिकारी आणि जवान गमावल्याचे दु:ख त्यांना होते!
२९ मार्च २००९ रोजी भारताच्या तिन्ही सेनादलांच्या सुप्रीम कमांडर तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कीर्ती चक्र स्वीकारताना नायब सुबेदार श्री. संतोष तानाजीराव राळे यांची छाती अभिमानाने फुलून आली होती… आईच्या गर्भात शिकलेली झुंजाराची रीत त्यांनी प्रत्यक्षात रणभूमीवर उपयोगात आणली होती!
(ही शौर्यगाथा काश्मीरमधील मच्चील सेक्टर, नारनहर नावाच्या ओढ्याच्या परिसरात घडलेली असल्याने त्याला ऑपरेशन नारनहर असे नाव आहे. सदर माहिती मी राळे साहेबांच्या अनेकांनी घेतलेल्या मुलाखती, बातम्या इत्यादी मधून संकलित केली आहे. कर्नल त्यागवीर यादव साहेबांनी संतोषजी यांची मुलाखत खूप छान घेतली आहे.)
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈