इंद्रधनुष्य
☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा….आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर !
‘ का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ?’ —-
जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉलस्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते—
* परत येणे ….. कधीच सोपे नसते *
एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला “ मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. “
राजा दयाळू होता. त्याने विचारले:” कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?”
माणूस म्हणाला:” कसायला थोडी जमीन द्या.”
राजा म्हणाला: “ उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालू शकशील, धावू शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. पण लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही ! “
माणूस खूश झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला — पळत राहिला. सूर्य माथ्यावर चढला होता—पण माणूस धावायचं थांबला नाही—अजून थोडी मेहनत– मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती !
संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही ! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे— आता परत यायचे होते– सूर्य पश्चिमेकडे वळला होता– तो थकला होता. परत पोहोचायचे होते–पण वेळ वेगाने निघून जात होती —अजून थोडी मेहनत–न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला –पण आता श्वास घेणं कठीण झालं होतं. तो खाली पडला— आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला !
राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:—-
* याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता ! *
—–आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत ! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही ती करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो—-मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.
मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा!
सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नाही—-
थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचा राहून गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं तरी खूश व्हा.
काळजी घ्या—आनंदी रहा—सुरक्षित रहा.
संग्राहक : – सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈