श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
श्री. बजरंग निंबाळकर
भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!
मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!
शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!
आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!
त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.
त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!
शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!
थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!
अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!
खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!
त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!
(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)
(फेसबुकवर आलेल्या पोस्टवर आधारित)
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈