श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“गेले गायचेच राहूनी !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तो माझ्याएवढाच तेवीस चोवीस वर्षांचा. आम्हां दोघांनाही रायफल मस्त चालवता यायची… निशाणा एकदम अचूक आमचा. पण त्याला गिटार वाजवता यायची आणि तो गायचाही अतिशय सुरेख. एल्टन जॉनचं Sacrifice तर तो असा काही गायचा की बस्स! माझ्या आणि त्याच्या भेटीचा शेवट याच गाण्याने व्हायचा नेहमी… किंबहुना हे गाणं ऐकण्यासाठीच मी त्याच्याकडे जात असे. माझ्यासारखाच तोही इथं सैन्याधिकारी बनायला आला होता. त्याचे वडील बँकेत नोकरीला तर आई माझ्या आईसरखीच साधी गृहिणी होती. तो मेघालयातल्या शिलॉंग इथे जन्मलेला… शिलॉंग म्हणजे पृथ्वीवरील एक स्वर्गच जणू! इथेच मी एका शाळेत शिकलो. तो माझ्यापेक्षा केवळ शेहचाळीस दिवसांनी मोठा होता. इथल्याच एका प्रसिद्ध शाळेत शिकणारा हा गोरागोमटा गडी अंगापिंडाने मजबूत पण वागण्या-बोलण्यात एकदम मृदू. इथल्या तरुणाईच्या रमण्याच्या सगळ्या जागा आणि बागा आम्हांला ठाऊक होत्या. त्यावेळी त्याची आणि माझी अजिबात ओळख नव्हती… माझ्यासारखाच तो शहरात फिरत असेल, शाळा बुडवून सिनेमाला जात असेल… त्यालाही मित्र-मैत्रिणी असतील… त्याचीही स्वप्नं असतील माझ्यासारखीच… भारतीय सैन्याचा रुबाबदार गणवेश परिधान करावा… शौर्य गाजवावे! आणि योगायोगाने आम्ही दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच वर्षी दाखल झालो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईची १९९६ची हिवाळी तुकडी. पण तो काही माझ्या कंपनी किंवा प्लाटूनमध्ये नव्हता. आमची ओळख झाली ती परेड ग्राउंडवर. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणा-या वेळापत्रकानंतर त्याला त्याच्या बराकीत भेटायला जायचं म्हणजे एक कामच होतं… पण मी ते आनंदाने करायचो.. कारण त्याला भेटल्यावर आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर थकवा पळून जाई. आमच्या भेटीचा समारोप त्याच गाण्याने व्हायचा…. त्याने आधी कितीही वेळा ते गाणं गायलेलं असलं तरी मी त्याला एकदा.. एकदा… पुन्हा एकच वेळा… ते गाणं गा! असा त्याला आग्रह करायचो… आणि तो सुद्धा त्यादिवाशीचं त्याचं अखेरचं गाणं गाताना भान हरपून गायचा… त्याचं गाणं ऐकायला इतर बरेच प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित असायाचे. एकदा त्याने त्याच्या प्रेयासीचं नावही मला सांगून टाकले… आणि जेंव्हा जेंव्हा तिचा उल्लेख मी करयचो तेंव्हा तेंव्हा त्याचे गुबगुबीत गाल आणखी लाल व्हायचे… ते दोघं लग्न करणार होते स्थिरस्थावर झाल्यावर! त्याने त्याच्या आणि तिने तिच्या घरी अजून काही सांगितले नव्हते तसे! त्याच्या पाकिटात तिचा एक फोटो मात्र असे! दिवस पुढे सरकत होते… आमचे प्रशिक्षण जोमाने सुरु होते… आणि मी त्याचे गाणे ऐकायला जाणेही तसे रोजचेच होऊन गेले होते! 

ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता तो दिवस अखेर उगवला… अंतिम पग नावाची पायरी पार करताना मनाला जे काही जाणवतं ते इतरांना कधीही समजणार नाही…. अभिमान, जबाबदारीची जाणीव, केलेल्या श्रमाचं फळ मिळाल्याची भावना… सारं कसं एकवटून येतं यावेळी. आम्ही दोघांनीही त्यादिवशी अंतिम पग पार केले आणि आम्ही भारतीय सेनेचे अधिकारी झालो! 

या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी त्याच्या बराकीत गेलो होतो… पण तो त्याच्या आई-बाबांना घ्यायला बाहेर गेला होता… त्याचा थोरला भाऊ सुद्धा यायचा होता पासिंग आऊट परेड बघायला! त्यामुळे त्यादिवशीची आमची भेट झालीच नाही. दुस-या दिवशी परेड कार्यक्रम पार पडल्यानंतरच्या गडबडीत मला तो भेटला नाही. सायंकाळी आम्हां सर्वांनाच अकादमीचा निरोप घ्यायचा होता. त्याच्या आधी काही मिनिटे मी त्याच्या बराकीत पोहोचलो… तोवर तो तिथून निघून गेला होता… आमची भेट नाही झाली! तो त्याच्या टेबलवर जिथे त्याची गिटार ठेवत असे त्या जागेकडे पाहत मी तिथून माझ्या बराकीत परतलो आणि माझ्या गावी निघालो.

जंटलमन कडेट क्लिफर्ड किशिंग नॉनगृम त्याचं पूर्ण नाव होतं. त्याला पहिलीच नेमणूक मिळाली ती रणभूमीची राणी म्हणवल्या जाणा-या 12 JAK LI (१२, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्री) मध्ये. इथे सतत काहीतरी घडत असते! त्याला शेवटचे भेटून अठरा महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी आपल्या हद्दीत लपून छपून घुसले आणि त्यांना तिथून हुसकावून लावणे हे एक मोठेच काम होऊन बसले. त्यावेळी मी पठाणकोट येथे नेमणुकीस होतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या एका मागून एक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मालिकाच सुरु केली होती… पण हे काम अतिशय जीवघेणे होते! ताज्या दमाचे अधिकारी आणि सैनिक या लढाईत अगदी पुढच्या फळीमध्ये होते…. रणभूमीला ताज्या रक्ताची तहान असते असं म्हणतात! युद्धात यश तर रोजच मिळत होते पण बलिदानाच्या काळीज पिळवटून टाकणा-या बातम्याही रोजच कानी पडत होत्या! अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्यासोबत हसणारा आपला सहकारी आज शवपेटीमध्ये पाहून दु:ख आणि शत्रूविषयी प्रचंड राग अशा संमिश्र भावना मनात दाटून यायच्या! 

त्यादिवशी मी माझ्या युनिटच्या रणगाडा दुरुस्तीच्या प्रशिक्षणात अगदी रात्री उशिरापर्यंत व्यग्र होतो. युनिटमध्ये माझ्यासाठी फोन आला… कुणी इन्फंट्री ऑफिसर माझ्याशी बोलू इच्छित होते. हात पाय ऑईल-धुळीने माखलेले अशा अवस्थेत मी धावत जाऊन तो कॉल घेतला… तर पलीकडून क्लीफी अर्थात क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब बोलत होते.. क्लीफी हे मी त्याला ठेवलेलं टोपणनाव. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा… उत्साही! कारगिल लढाईमध्ये निघालो आहे! त्याने अगदी अभिमानाने सांगितले… आवाजात कुठेही भीती, काळजी नव्हती. लढाईत शौर्य गाजवण्याची संधी मिळत असलेली पाहून एका सैनिकाच्या रक्ताने उसळ्या घ्यायला सुरुवात केली होती…. भेटू युद्ध जिंकून आल्यावर… भेटीत तुझ्या आवडीचं गाणं नक्की गाईन… तेच नेहमीचं Sacrifice.. त्यागाचं गाणं! विश्वासाचं गाणं! अकादमीमधून निघताना तुझी भेट होऊ शकली नाही.. मित्रा! माफ कर!… तो म्हणत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर तो साक्षात उभा राहिलेला होता! गिटार ऐवजी आता त्याच्या हातात मला रायफल दिसत होती! 

पर्वतांच्या माथ्यांवरून शत्रू आरामात निशाणा साधत होता. बर्फाने आच्छादलेल्या पहाडांवर चढून वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवेत घेणे. ७० अंशाची चढण चढून जाणे आणि तेही युद्ध साहित्य पाठीवर घेऊन, वरून अचूक गोळीबार सुरु असताना…. कल्पनाच धडकी भरवणारी. एक गोळी म्हणजे एक यमदूत…. अंधारात, बर्फावरून पाय निसटला म्हणजे खाली हजारो फूट दरीत कायमची विश्रांती मिळणार याची शाश्वती. शत्रू पाहतो आहे… भारताचे सिंह पहाड चढण्याच्या प्रयत्नात आहेत… त्यांना ही कामगिरी शक्यच होणार नाही हे ते ओळखून आहेत. समोरून, वरून प्रचंड गोळीबार होत असताना या मरणाच्या पावसात कोण चालेल? त्यांनी विचार केला असावा. त्यांचा गोळीबार तर थांबणार नव्हताच… त्यांची तयारी प्रचंड होती! पहाड जिंकायचा म्हणजे शत्रूच्या नरडीला हात घालावाच लागणार होता…. आणि हे करताना त्या मरणवर्षावात चिंब भिजावेच लागणार होते… तुकडीतील किमान एकाला तरी. अशावेळी हा नक्की सर्वांच्या पुढे असणार हे तर ठरलेले होते. त्याला त्याच्या जीवाची पर्वा तरी कुठे होती… सोपवलेली कामगिरी पडेल ती किंमत मोजून फत्ते करायचीच हा त्याचा निर्धार होता… धोका पत्करणे भागच होते! 

सत्तर अंश उभी चढण तो लीलया चढला…. दहा तास लागले होते त्याला पहाडाच्या टोकापर्यंत पोहोचायला…. गोळीबाराच्या गदारोळात शत्रूवर चालून गेला… शत्रूला हे असे काही कुणी करेल याची कल्पनाच नव्हती… ते वरून आरामात त्यांच्या शस्त्रांचे ट्रिगर दाबत बसले होते.. त्यांच्या टप्प्यात येणा-या भारतीय सैनिकांवर गोळीबार करीत होते. खालून आपल्या बोफोर्स तोफा आग ओकत होत्याच… पण शत्रूने जागाच अशा निवडल्या होत्या की तिथे फक्त माणूस पोहोचू शकेल! आणि तिथे कुणी माणूस पोहोचू शकेल असे शत्रूने स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते! तो एखाद्या वादळवा-यासारखा शत्रूच्या बंकरसमोर पोहोचला… बंकरमध्ये हातगोळे फेकले आणि त्याच्या हातातल्या रायफलने दुश्मनाच्या मरणाचे गीत वाजवायला आरंभ केला… जणू तो काही गिटारच्या ताराच छेडतो आहे… अचूक सूर! सहा शत्रू सैनिक त्याने त्यांच्या अंतिम यात्रेला धाडून दिले! एक धिप्पाड शत्रू सैनिक त्याच्यावर झेपावला… हातातल्या रायफली एवढ्या जवळून एकमेकांवर झाडता येत नाहीत…. अशावेळी क्लिफर्डने शाळेत असाताना गिरवलेले बॉक्सिंगचे धडे कामी आले… पाहता पाहता ते धिप्पाड धूड कायमचे खाली कोसळले… क्लिफर्ड साहेबांनी त्याने जणू त्या पहाडाला मोठे भगदाडच पाडले होते…. आपल्या नेत्याचा हा भीमपराक्रम पाहून त्याच्या मागोमाग मग त्याचे सैनिक पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रचंड वेगाने उर्वरीत कामगिरी पार पाडली…. Point 4812 आता भारताच्या ताब्यात आले होते! 

पण पावसात बाहेर पाऊल टाकले म्हणजे भिजणे आलेच… हा गडी तर खुल्या आभाळातून होणा-या वर्षावात पुढे सरसावला होता… रक्ताने भिजणे साहजिकच होते… शरीराची शत्रूने डागलेल्या गोळ्यांनी चाळण झालेली…. केवळ २४ वर्षांचा तो सुकुमार देह… आता फक्त एकाच रंगाची कहाणी सांगत होता…. I gave my today for your tomorrow! महावीर लेफ्टनंट क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब धारातीर्थी पडले! हेच तर स्वप्न असतं प्रत्येक भारतीय सैनिकाचं.. ताठ मानेने मरणाला सामोरे जायचं… राष्ट्रध्वजात गुंडाळले जाऊन घरी परतायचं… इथं या मरणाला जीवनाच्या सार्थकतेची किनार असते! 

तो लवकरच सुट्टीवर घरी येणार होता म्हणून थोरल्या भावाने आपल्या विवाहाची तारीख पुढे ढकलली होती… बाकी सर्व तयारी झालेलीच होती.. फक्त त्याची सर्वजण वाट पहात होते…. तो आला पण फुलांनी शाकारलेल्या, तिरंगा लपेटलेल्या शवपेटीत! पीटर अंकल आणि सेली आंटीच्या दु:खाला कोणतेही परिमाण लावता येणार नाही. ते त्याच्या शवपेटीवर डोकं टेकवून त्याच्या आत्म्याच्या कल्याणाची प्रार्थना पुटपुटत आहेत! त्याच्या सन्मानार्थ हवेत झाडल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरी मेघालयाच्या आभाळातल्या मेघांना भेदून वर जात आहेत… ढगांच्या मनातही मोठी खळबळ माजली आहे… ते कोणत्याही क्षणी बरसू लागतील असं वाटतं आहे७… ७ मार्च, १९७५ रोजी जन्मलेले Captain Keishing Clifford Nongrum आता पन्नास वर्षांचे असते… तुमच्या आमच्या सारखे संसारात आनंदात असते… पण देश सुखात रहावा म्हणून त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले! 

माझ्या टेबलवर मी एका सैनिकाचा पुतळा ठेवलेला असतो कायम… या पुतळ्याच्या हातात गिटार मात्र नाही… रायफल आहे! माझ्या जिवलग मित्राच्या तोंडून Sacrifice अर्थात त्यागाचं गाणं एकदा शेवटचं ऐकण्याचं राहून गेलं… देवाच्या घरी भेट होईल तेंव्हा मात्र मी त्याला आग्रहाने तेच गाणं गाण्याचा आग्रह मात्र निश्चित धरणार आहे! 

– – लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत 

(Captain Keishing Clifford Nongrum साहेबांचे मित्र लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत साहेब यांनी एका फेसबुक लेखात इंग्रजी भाषेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे मी जमेल तसे मराठी भाषांतर आपल्यासाठी मला भावले त्या शैलीत केले आहे. यात काही कमीजास्त असू शकते. अहलावत साहेबांची परवानगी घेता नाही आली, क्षमस्व! सुधारणा असतील तर त्या निश्चित करेन!)

लहानपणी खेळ खेळताना हे छोटे Keishing Clifford साहेब स्वत: बनवलेली लाकडी रायफल हाती धरत. घरच्यांना अजिबात कळू न देता त्यांनी सैन्याधिकारी होण्यासाठीची परीक्षा दिली होती! अत्यंत कठीण प्रशिक्षण लीलया पूर्ण केले होते. सियाचीन ग्लेशियरवर नेमणुकीस असताना तिथे झालेल्या हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या बारा सैनिकांचे प्राण उणे ६० अंश तापमानात त्यांनी अथक प्रयत्न करून वाचवले होते. सुट्टीवर आल्यावर आपल्या शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात फिरून व्याखाने देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सैन्यात अधिकारी कसे व्हावे या विषयावर त्यांनी स्वहस्ताक्षरात सविस्तर माहिती लिहून ठेवली होती. ते देणार असलेले शेवटचे व्याख्यान त्या शाळेच्या परीक्षा सुरु असल्याने होऊ शकले नव्हते… त्यांचे मित्र संदीप अहलावत साहेबांनी नंतर त्याच शाळेत जाऊन दिले कारण हे व्याख्यान द्यायला Captain Keishing Clifford Nongrum हयात नव्हते! Captain Keishing Clifford Nongrum यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या भावाने गरीब मुलांसाठी एक फुटबॉल क्लब स्थापन केलाय. यासाठी लागणारा निधी हे विद्यार्थी स्वत: एक बेकरी चालवून त्यातून मिळणा-या पैशांतून भागवतात. साहेबांचे आई वडील कारगिलच्या त्या पहाडांवर स्वत: जाऊन आपला लाडका लेक जिथे धारातीर्थी पडला होता ती जागा बघून आले! साहेबांच्या स्मृती शिलांग मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपले लोक ही बलिदाने विसरून जातात याचा अनुभव साहेबांच्या कुटुंबीयांनी सुद्धा घेतला आहे… पण जेंव्हा एखादी महिला साहेबांच्या बाबतीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे दाखवायला येते, एखादा माणूस त्यांच्या दरवाजावर माथा टेकवून त्याने धरलेला उपवास सोडायला येतो… तेंव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार, ‘महावीर चक्र’ प्राप्त करणारा मेघालयातील हा पहिलाच तरुण आहे, ही बाबही त्यांना अभिमानाचे क्षण देऊन जाते! आज इतक्या वर्षांनतर साहेबांचे कोर्स मेट अर्थात OTA मधील सहाध्यायी त्यांच्या घराला भेट देतात, साहेबांना मानवंदना देतात, तेंव्हा आपण एकटे नाही आहोत… देश आपल्या मागे उभा अही, ही त्यांची भावना दुणावते. पूर्वोत्तर राज्यातही देशभक्तीची बीजे खोलवर रुजली आहेत, याचेच हे प्रत्यंतर असते. जय हिंद! 

– – – तुम भूल न जाओ इनको… इसलिये कही ये कहानी! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments