सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सीमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या आणि दहा बिसलरी बाटल्या घेऊन चढत होती.

थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातून छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तिने आवाज दिला “ दादा सरबत, पाणी, ताक घ्या की…” मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं “ बाळा कुठची राहणार. ” पाली गावचं नाव सांगितलं. ‘ शाळेत जातेस का? ‘ २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले.

खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.

गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला…..

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय..

लेखक व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे

माजी सैनिक, खोडद,  ८३९०००८३७०

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अ.ल. देशपांडे.उमरीकर, अमरावती.

आपलीच माणसं , आपलाच परिसर , आपलीच भाषा तरीही कित्येक गोष्टींपासून आपण किती अनभिज्ञ असतो ?
लोक पोटाची खळगी भरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुनही मुख्य सामाजिक विणीपासून किती दूर राहतात ?
मग कुणीतरी लक्षात आणून देतं, आपण हळहळ व्यक्त करतो, कौतुक करतो व विसरून जातो.
खरंतर आपल्या नित्याच्या जगरहाटीत थोड्याफार फरकाने अशी माणसं वावरत असतात .
सर्वांकडून अपेक्षित नसतं पण ज्यांना सामाजिक भान जपता येतं त्यांनी मात्र ते जपत रहावं.

वंदेमातरम् सुप्रभातम्.