श्री सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ “तात्यांची अंत्ययात्रा…” – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली.
ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या -एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते.
त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती.
यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते.
पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या.
त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’
शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.
या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏
(संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर © सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज)
लेखक : श्री विश्वास साव
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈