सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आयुष्य’ –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

सुख-दु:खाच्या नात्याने बांधलेली माणसं मरण आल्यावर अधिकच जुळलेली दिसतात.

एका जीवंत माणसाला जे प्रेम, आधार, आपुलकी आणि सहानुभूती तो जिवंत असताना हवी असते, तीच माणसं त्याच्या मृत्यूनंतर देण्याचा आटापिटा करतात.

हे दृश्य पाहिलं की वाटतं – माणसाच्या भावनांची किंमत त्याला असताना नसते, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी ढोंगी संवेदना उफाळून येतात. लांबच्या नातेवाईकांचं अचानक ‘आपुलकीने’ येणं हे अचंबित करते कोणी तरी मेलं की अचानक काही नातेवाईक ‘गाडी मिळाली नाही’, ‘प्रायव्हेट गाडीने का होईना पण येतोच’ असं म्हणत निघतात.

तेच लोक त्याच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मात्र गडप असतात.

वाढदिवस, लग्न, संकटं – अशा कुठल्याच वेळी त्यांचा पत्ता लागत नाही.

पण माणूस मेल्यावर मात्र ते ‘शेवटचं तोंड बघायला’ म्हणून हजेरी लावतात.

प्रश्न असा आहे की हे शेवटचं तोंड बघण्याने मृत माणसाला नेमकं काय मिळतं?

जिवंत असताना ज्या माणसांना भेटायची ओढ नव्हती, त्यांचा मृत्यूनंतर अचानक ओढ लागते हे आश्चर्यकारक आहे.

कधी कधी अगदी मनोभावे, डोळ्यात अश्रू आणून नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी रडतात.

काही लोक उगाच मोठ्याने आक्रोश करतात, काही जण विचारतात, “अरे, एवढ्या लवकर का गेला?”

पण खरेच एवढी हळहळ होती तर तो जिवंत असताना ती कुठे गायब होती?

आजारात मदतीला न येणारे लोक मयताच्या स्वयंपाकाला मात्र हमखास हजर असतात.

जे नातेवाईक जिवंत असताना बोलत नव्हते, ते आता “त्यावेळी बोलायला हवं होतं”  असं म्हणत उसासे टाकतात.

अशावेळी असं वाटतं की माणसाच्या अस्तित्वाची किंमत त्याला असताना कमी असते, पण मेल्यावर त्याच्यासाठी भावना उसळून येतात.

कोणीतरी मेलं की गावकऱ्यांपासून ते शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एक नवा विषय मिळतो.

“त्याचा मुलगा वेळेवर पोहोचला नाही”, “सून रडली नाही”, “अमुक माणूस दोन दिवसांनी आला”, “त्याच्या घरच्यांनी नीट पाहुणचार केला नाही” – अशा चर्चांनी स्मशानाजवळचा एखादा कट्टा गरम होतो.

मयताच्या टोपलीत किती फुले टाकली, कोण किती वेळ बसलं, कोण किती वेळ रडलं यावर लोक माणसाच्या सगळी नाती ठरवतात.

पण खरी गरज जिवंत माणसाला आधाराची असते.

जो हयात आहे, त्याच्यासाठी वेळ काढणं जास्त महत्त्वाचं असतं.

खरी सहानुभूती – मृत्यूनंतर नाही, जगत असताना द्या!

एका जिवंत माणसाला मदतीचा हात, बोलण्याची सोबत, आधार आणि प्रेम हवं असतं.

तो मेल्यावर दिलेल्या अश्रूंना काहीच अर्थ नसतो.

त्याच्या आजारपणात केलेली सेवा, त्याच्या मनाला दिलासा, त्याच्या संकटात दिलेली साथ – हाच खरा माणुसकीचा कसोटी क्षण असतो.

म्हणूनच, शेवटचं तोंड बघण्याच्या दिखाव्यापेक्षा, जिवंत असलेल्या माणसाच्या डोळ्यातील आनंद पहाण्यासाठी वेळ काढा.

त्याच्या हसण्याच्या साक्षी व्हा, त्याच्या दुःखात पाठिंबा द्या.

तो असताना प्रेम द्या – जेणेकरून तो मेल्यावर फुकटच्या ढोंगी सहानुभूतीची गरज उरणार नाही !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments