सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

वीस एक वर्ष झाली असतील.

तेव्हा माझी मैत्रीण एका एनजीओ साठी काम करत होती. प्रोजेक्टच्या अनुषंगाने रिमांड होम मधील मुलांना समुपदेशन हा तिच्या कामाचा भाग होता. माझ्या घराच्या जवळ ही शाळा असल्याने आठवड्यातून एक दिवस मुलांना गणित शिकवायला येशील का असे तिने विचारले. यातली तीन मुले अतिशय हुशार होती आणि स्कॉलरशिप परीक्षेला त्यांना बसवायचे ठरवले होते.

अर्थात हा सुद्धा एक प्रयोग होता. आठवड्यातून एकदाच असल्याने मी हो म्हटले.

मुलांशी बोलणे हा माझ्या कामाचा विषय नव्हता. त्यांना गणितातील काही विषय शिकवणे आणि पेपर सोडवून घेणे इथपर्यंत माझी सीमा होती.

इथल्या मुलांवर चोरीपासून खुनापर्यंत आरोप होते. बहुतेक मुलं अतिशय निम्नस्तरीय वर्गातून आलेली असल्याने घरातून प्रेम, संरक्षण हा मुद्दा गृहीत धरण्यासारखा नव्हता. अनेकजण त्यामुळे निर्ढावलेले असतात.

यातल्या एका मुलाने आपल्या वडिलांचे लिंग कापले होते. त्यांच्या रखेलीला (मला याच शब्दात त्याचा अपराध सांगितला होता) भाजून मारायचा प्रयत्न केला होता. आईला सतत मारहाण बघून आधीच डोके सरकलेले आणि त्यात एक दिवशी वडील या बाईला घरीच घेऊन आले म्हंटल्यावर त्याचा संयम संपला.

तेरा/ चौदा वर्षाचा होता तो. बऱ्यापैकी शार्प होता. समज होती आणि शिकण्याची आवड होती.

“त्याने जे काही केलेआणि का केले ते पाहता त्या बाबतीत वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण ते तुझ्या वागण्यातून दिसता कामा नये. दोन गोष्टी आहेत. एक त्याचा चुकीचा भूतकाळ आणि एक त्याचा बरोबर होऊ शकेल असा भविष्यकाळ.

त्याने का केलं हे कितीही दुःखदायक असेल तरी ते चुकीचेच आहे आणि सहानुभूतीने तू त्याला वागवायला जाशील तर आपण केलं ते बरोबरच असे त्याच्या मनात राहील. हे नको व्हायला. आपण केलं ते चूक हे त्याला पटलच पाहिजे तर तो यातून काहीतरी शिकेल. महत्त्वाचे आहे ते मनावर संयम ठेवून, आपला भविष्यकाळ घडवणे. दुसऱ्यांना शिक्षा देणे, हा जगण्याचा हेतू नसावा. ”

ह्या सूचना मिळाल्याने असेल, आमचे संबंध शिक्षक आणि विद्यार्थी एवढेच मर्यादित असूनही, त्या मर्यादेत चांगले राहिले. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही पण बाहत्तर टक्के मिळून तो पास झाला. नंतर माझा संपर्क तुटला.

त्या मुलाची परिस्थिती आणि त्याचा सामाजिक वर्ग वेगळा होता तरीही “Adolescence” सिरीज बद्दल होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रिया यामुळे हा मुलगा आठवला.

Adolescence सिरीज पाहिली. मुलगा आणि त्याच्याच वयाच्या काही मुलांबरोबर बसून पाहिली. सिरीज खूप आवडली. अभिनय उत्तम आणि जिथे पालक आणि मूल यात अंतर पडत जाणे हे अपरिहार्य होत जाणार आहे अशा काळात प्रत्येक पालकांनी पहावी.

पाहताना भीती वाटली, अस्वस्थ वाटले तर नाही…

हे प्रत्येक काळात घडत असते. मुलांचा अपमान करणे, चिडवणे, वाळीत टाकणं आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक काळात तेवढेच वाईट असतात. मजा म्हणजे त्यांचे जे वर्तन असते ते आधीच्या पिढीसाठी आक्षेपार्ह, धक्काजनक असेच असते.

मुलगा तिशी ओलांडून गेला असल्याने, त्याला यातले काही शब्द माहिती आहेत, काही नाही पण त्याच्या काळात, ऑर्कुट हा प्लॅटफॉर्म होता. ओळखीची, अनोळखी सुद्धा मुले असायची आणि तेव्हा सुद्धा एक कोड language होती.

पुरुषार्थ काय याच्या चाचण्या होत्या, मुलींचे boobs कमी असतील तर मुलींना complex असायचा.. त्यावरून नावे ठेवली जायची आणि त्त्या वयात ते vicious असायचे/ वाटायचे.

मुलगा पाचवीत मी त्याची शाळा बदलली होती. नवीन शाळा, नवीन मुलं, त्यात हा स्कॉलरशिप मिळून गेलेला, शिवाय उत्तम तबला वाजवायचा, गायचा. दिसायला सुद्धा गोड. पटकन मित्र झाले.. आता हे खटकणारी मुले सुद्धा असतात. एक मुलगा त्याला सारखा कडकू, पडवळ.. आणि असलच काही, चिडवायचा. नेहेमी हसत जाणारा मुलगा गप्प गप्प असतो हे लक्षात लगेच आले पण हा काही सांगेना.

आता शाळेत जायचेच म्हणून मी ठरवले त्याच्याच आदल्या दिवशी घरी आला तर तोंड लाल, पायावर वळ.. रडून लाल झालेलं डोळे..

“अरे, काय झाले?” तर सांगेना.

शेवटी मित्राला फोन करते तर म्हणाला, “मी मारले त्याला. मला सारखा चिडवत होता म्हणून मी मारले. “

आता हा बेदम मार खाऊन आलाय ते कळत होते पण त्याचाही सेल्फ रिस्पेक्ट रहावा म्हणून म्हटले, “अरे, लागले नाही ना त्याला ? “ 

“He is thick skinned. He is hippo.. तुला त्याचीच दया.. वाईट आहेस.. (मुसमुसणे) 

त्याला काय लागणार. मी उद्या कंपास घेऊन हातात घुसवणार त्याच्या. (आता डोळे लाल आणि चमकायला लागले) 

पोटात धस झाले..

त्याला ओरडून उपयोग नव्हता. आई म्हणजे आधार असे त्या वयात वाटते त्याला तडा जायला नको म्हणून त्या मित्राच्या आईला फोन करून, मारामारी झाली त्याबद्दल विचारले. सॉरी म्हटले. त्या मुलाने आपले वर्जन दिलेले.. सुदैवाने ती सुद्धा मुलाला ओळखणारी आई होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. दोघांना एकत्र बसून समजावले. माझ्या मुलाने वर्गातल्या वीस मुलांना वाढदिवसाला घरी बोलावून त्याला वगळले याचा राग होता, तो तुला मी आता बोलावेन पुढच्या वर्षी म्हणून काढून टाकला.

आता ही सिरीज पाहिल्यावर वाटले, एक पोटेन्शियल खून किंवा डोळे बिळे फुटणे टळले.

ही चेष्टा नाही.. it could have gone either way… खून वगैरे नाही पण काहीतरी भलत्या जागी लागणे सुद्धा ओरखडा उमटवून गेले असते. दोघांच्या आई सजग होत्या असे म्हणेन मी.

सिरीज मधले आईवडील सुद्धा अतिशय चांगले होते मग असे का घडले..

मुळात माझ्या मुलाला सुद्धा एकदम कंपास का आठवला.. आम्ही दोघेही हिंसक नाही..

तर मी आता डॉ स्वाती केळकर यांनी लिहिलेले “द ब्रेन” वाचते आहे. त्यात असे म्हटले आहे, मानवी मेंदू अनुभवांनी, परिस्थितीने बदलतो. तो अनुभव ग्रहण करतो आणि त्यानुसार स्वतःला adapt करतो.. आई वडील, शेजारचा भवताल, शाळेतील मित्र, बघितलेले सिनेमा, नाटक, कार्टून सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो आणि आताच्या जगात ही गोष्ट टाळता येत नाही. फार तर मी असे म्हणू शकते, मुलात घडलेला बदल टिपण्याची नजर, वेळ आणि जाणीव माझ्यात होती.

मुलगा तरी आताचा. माझ्या वेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी एक जाड्या मुलाला आम्ही आमच्या भाषेत पी स्क्वेअर म्हणायचो. पर्मनंट प्रेग्नंट.

ए, पी स्क्वेअर आला बघ. बिचारा चुपचाप जायचो.. बरे त्याची गरज नव्हती पण मजा. एक मुलगी खूपच उफाड्याची होती. ती ताठ उभी राहिली ना आम्हा किरकोळ मुलींना ते कायतरीच वाटायचे. त्या वरून असल्या वाह्यात कोट्या केल्या होत्या कधीतरी. आता हे आठवले आणि मलाच काटा आला अंगावर. अत्यंत अभ्यासू आणि शांत म्हणून ओळखायचे पण तुमच्या ग्रुप मध्ये अशा आगावू गोष्टी होतात.

तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments