श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
आधी याविषयी काही..….
महर्षी नारद… यांना देवर्षी नारद असेही संबोधले जाते. उत्तम भक्त, तसेच ऋषी वाल्मिकी, महर्षी व्यास, भक्त प्रल्हाद आदि महान ऋषींचे, भक्तांचे गुरू असलेले नारद आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा विशेष गुणांमुळे ते कळीचे नारद म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची #कळ# ही कळकळींची (जनहितार्थ) होती असे आपल्या लक्षात येईल. त्यांचा #कळी# मुळे कोणाचाही बळी न जाता सर्वसामान्य मनुष्याला जगण्याचे बळ मिळत असे….. !
त्यांनी भक्तीमार्गाचे अनुसरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अनेकांना भक्तिमार्गात आणले. “आपल्यासारखे करिती तात्काळ” असे संतांचे वर्णन केले जाते. नारदांसाठी हे वर्णन तंतोतंत लागू होते. पण त्यांची भक्ती सूत्रे सोडली तर महर्षी नारदांचे अन्य साहित्य उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे “ नारद भक्तिसूत्रे “ हीच त्यांची खरी ओळख आहे असे म्हणावेसे वाटते.
संत एकनाथ महाराज देवर्षी नारदांचा गौरव पुढील प्रमाणे करतात.
“धन्य धन्य तो नारदु, । ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु ।
सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदू सदोदित ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।
ज्याचेनि संगे तत्त्वतां | नित्यमुक्ततां जडजीवा ॥
– (संदर्भ: एकनाथी भागवत २-३७, ३८)
भक्ति हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. शास्त्र म्हटले की त्याचे नियम असणे स्वाभाविकच आहे. महर्षी नारद आपल्याला या ८४ श्लोकांमध्ये भक्तीचे समर्पक दर्शन घडवतात… या लेखमालेच्या माध्यमातून आपण त्यातील काही प्रमुख सूत्रं पाहणार आहोत. भक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भक्त, भगवंत आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचे साधन समजून घ्यायचे आहे. त्याआधी नारदमुनीचे संक्षिप्त चरित्र आपण पाहू.
भागवत प्रथम स्कंध अध्याय पाचमध्ये स्वतः नारदांनी आपले चरित्र व्यासांना सांगितले आहे. नारद म्हणतात, “ हे महामुने ! मी पूर्वकाली एक दासीपुत्र होतो. एक वेळी वर्षाऋतूत चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्या गावी बरेच योगी संतमहात्मे आले. त्यावेळी मी लहान बालक होतो. माझ्या मातेने मला त्या महापुरुषांच्या सेवेकडे सोपवून दिले. मी जरी लहान होतो तरी मी जितेंद्रिय होतो. त्या महात्म्यांपुढे मी मुळीच खोडकरपणा करीत नव्हतो. शांतीने, संयमाने मी त्यांच्याजवळ बसून राही व ते सांगतील ते काम करीत असे. यामुळे ते समदृष्टी होते तरी माझेवर विशेष प्रसन्न राहात होते, व कृपा करीत होते. त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट खात असे. त्या प्रभावाने माझे सर्व किल्मिष दूर झाले. असे करीत असता काही काळाने माझे चित्त शुद्ध झाले. ज्यामुळे त्यांनी कथन केलेल्या भागवत धर्मात मला गोडी निर्माण झाली. ते लोक नित्य श्रीकृष्णकथा गात होते व मी त्या संतांच्या अनुग्रहाने त्या मनोहर कथांचे श्रद्धेने श्रवण करीत होतो. यामुळे भगवंताचे ठिकाणी माझी बुद्धी जडली. “
सांगणारा कोण आहे यावर त्या सांगण्याचे मूल्य ठरत असते. इथे भक्तिशास्त्र सांगणारे देवर्षी नारद आहेत, त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण श्रद्धेने या सूत्रांकडे पाहाल असा मला विश्वास आहे.
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचें। परंतु येथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।
– समर्थ रामदास (दासबोध 20. 04. 26)
*****
सूत्र क्रमांक ०१ / १
अथातो भक्तिं व्याख्यास्यामः
अर्थ : अथ (आता) अत: (यापुढे) भक्ति (भक्तीचे) व्याख्यास्यामः (आम्ही व्याख्या करीत आहोत)
विवरण :
आपण भक्ति सूत्रे अभ्यासणार आहोत, अर्थात भक्ति शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. शास्त्राचा अभ्यास करताना काही गृहितके पाळणे गरजेचे ठरते, त्यामुळे विषय समजायला मदत होऊ शकते.
१. मी आहे.
२. जगत् आहे
३. ईश्वर आहे
४. माझा व जगाचा संबंध आहे.
५. ईश्वराचा जगाशी संबंध आहे.
६. ईश्वराचा माझ्याशीही संबंध आहे.
७. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, तर मी अल्पशक्ती आहे.
८. ईश्वर ज्ञानी आहे तर मी अज्ञानी आहे.
९. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तर मी अल्पकर्ता आहे.
१०. ईश्वराचा असलेला संबंध माझ्या बाजूने जिवंत ठेवण्यासाठी ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे.
अथ म्हणजे आता… !
#आता# या शब्दात आधी काही तरी घडले आहे, काहीतरी कृती केली आहे असे भासते. आता या शब्दाचे अर्थ आपण अनेक प्रकारे लावू शकतो. “मागण्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर”, “आता तू इतके कर* या अर्थाने, असे अनेक अर्थ काढता येतील, फक्त ते समष्टीच्या अर्थाने घ्यायला हवेत. पुढे अत: हा शब्द आहे. त्याचा अर्थ या पुढे असा आहे.
श्रीसमर्थांनी दासबोधात या नऊ भक्तींचे अत्यंत मार्मिकपणे वर्णन केलेले आढळते. भक्तिमार्गातील या नऊ वाटा आहेत असे म्हणता येईल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कोणतीही वाट शेवटी चंद्रभागेला जाऊन मिळते. तसे या मार्गांपैकी कोणत्याही वाटेने गेले तरी भगवंतांच्या चरणाशी पोहोचणार यात बिल्कुल संदेह नसावा.
भक्तीचे नऊ प्रकार सांगण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ भक्तही होऊन गेले आहेत. श्रवण-परीक्षित, कीर्तन-शुकाचार्य, स्मरण-प्रल्हाद, पादसेवन-लक्ष्मी, अर्चन-पृथू राजा, वंदन-अक्रूर, दास्य-हनुमान, सख्य-अर्जुन, आत्मनिवेदन-बली असे ते श्रेष्ठ भक्त होऊन गेले. या नऊ प्रकारांना नवविधा भक्ती म्हणतात. पहिले तीन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास सहाय्यक ठरतात. पुढचे तीन हे भगवंताच्या सगुण रुपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे. भगवंताच्या यश, गुण, महात्म्य इत्यादी गोष्टी सश्रद्ध मनाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय. श्रवणानंतर स्मरण आणि कीर्तन संभवते. कीर्तनात नृत्य, गीत व वाद्य या तिहींचाही समावेश होतो. संगीताच्या साथीवर होणाऱ्या कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते. बरेचसे भक्ती साहित्य गेय पदांच्या रुपानेच निर्माण झाले आहे. यात मग्न राहणे म्हणजेच स्मरणभक्ती होय. पादसेवन भक्ती ही मूर्तिपूजा, गुरुपूजा, भगवत् भक्तांची पूजा यास्वरुपात होऊ शकते. श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, मूर्ती, सद्गुरू आणि भक्त यांच्या ठिकाणी भगवान वास करतो. भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्याचे अंतरात ध्यान करीत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात. श्रीहरी हाच माझा मायबाप आहे, प्रभू सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, अशा भावनेने भक्ती करणे हिला दास्यभक्ती म्हणतात. परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा भावनेने भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात. आत्मनिवेदन ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते, की तेथून त्याला सर्व विश्व ईश्वरमय दिसू लागते.
ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्टेचा अनुराग म्हणजे भक्ती अशी भक्तीची सुलभ व्याख्या करता येईल.
भगवंताच्या ठिकाणी अत्यंत अनुरक्ती ठेवणे आणि त्या अवस्थेत आनंदानुभव घेणे, ही भक्तीची साध्यविषयक बाजू आहे. भक्ती केल्याने मनुष्याचे मन आनंदी राहते, शांत राहते आणि असे अनेक लौकिक आणि अलौकिक लाभ होत असतात. सात्विक, राजस आणि तामस असे भक्तीचे तीन भेदही सांगण्यात आले आहेत. ‘सगुण भक्ती’ आणि ‘निर्गुण भक्ती’ असेही भक्तीचे मार्ग आहेत.
सध्या समाज खूप बदलला आहे. प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. समाजात असुरक्षितता वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकाला कमी श्रमात मोठे यश मिळवावेसे वाटतं आहे. महागाई वाढत आहे. पैसा हेच सर्वस्व असल्याचे वाटू लागले आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनू पाहत आहे. अशा परिस्थितीत माणसाचा स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. शरीरसुखाच्या भौतिक साधनांत वाढ होत आहे. नवनवीन संशोधनामुळे निर्माण होणाऱ्या औषधांमुळे आयुर्मयादा वाढली आहे. असे असले तरी या विज्ञानयुगातही बरीच माणसे भगवंतांकडे /भक्तिमार्गाकडे झुकू लागली आहेत, स्वतःला समजेल तशी ईश्वरभक्ती करू लागली आहेत हे एक चांगले लक्षण आहे. परंतु मनुष्य करीत असलेली भक्ति ही शुद्ध असावी, यासाठी भक्तीमार्गांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. ‘भक्ती’ म्हणजे नेमके काय ?
भक्तीची एक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल….
‘दुसऱ्यावर अकारण, निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे भक्ति.’
संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात,
“तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥”
(सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक १७५३, धार्मिक प्रकाशन संस्था)
मनात, अर्थात मनाच्या प्रत्येक भावात जर भगवंत सामावला गेला तर भगवंत दूर नाही असे सर्व संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत.
भक्ति सूत्रे अभ्यासण्यासाठी काहीतरी पात्रता असणे गरजेचे ठरते. (अर्थात कोणतेही शास्त्र/शस्त्र शिकण्यासाठी किमान अर्हता अपेक्षित असतेच)
इथे तर भक्ति शास्त्र शिकून मनुष्याला, साधकाला भगवतांची प्राप्ति करून घ्यायची आहे. त्यामुळे साधकाने साधन, आपण त्यास उपासना म्हणू शकतो, त्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. त्यास साधन चातुष्ट्य असे म्हटले जाते. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः सूत्र १ / १
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈