सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.) इथून पुढे — 

आता ज्यांच्या घरात शक्यतो दुसऱ्यांबद्दल निदान उघड वाईट बोलायचे संस्कार नव्हते त्या घरातील मुले असे गॉसिपिंग करत असतील तिथे आजची परिस्थिती पहा.

इथे ट्रोलिंग च्या नावाखाली कोणालाही जे काही बोलतात, especially राजकीय नेते, त्यांचे कुटुंब, अभिनेते, अनंत अंबानीला सुद्धा.. काहीही संबंध नसताना. त्यांचाच जियो वापरून शिव्या देतात, रेवडी उडवतात…

अशा काळात आपली मुले मोठी होतायत, आपले निरीक्षण करत आहेत, ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या पुढे आपले स्थान कस्पटासमान आहे अशांना सुद्धा अर्वाच्च भाषेत बोलताना रोज पाहत आहेत आणि हेच बाळकडू पुढच्या पिढीला पोचत आहे असेही वाटले.

आपण उत्तम आईवडील आहोत असे समजणारे, कुणाचा पुरुषार्थ काढतात, कुणाला टरबूज म्हणतात, xxxxx, व्येश्या म्हणतात. त्या प्रतिक्रिया सहज, अगदी उत्स्फूर्त असतात. असे ट्रोल करणे आपल्याहून लहान मुले बघत असतात.

ते तरी आईबाबांना कुठे ट्रोल करतात, ते ही दुसऱ्यांना करतात.

ट्रोल करणे सहज असते, मजा असते, धमाल असते हे पाहताना, ट्रोल स्वतः झालो तरी ती मजा म्हणून घ्यायची एवढे मात्र ते शिकू शकत नाहीत. लहान असतात आणि त्यामुळे अपघात होतात. कुणाला मारले जाते, कुणी आत्महत्या करतात.. कुणी नैराश्यात जातात, व्यसनात जातात..

आता यावर काय उपाय आहे तर निदान आपण आपल्यापुरते सभ्य वागणे, ते शक्य नसेल तर हे जंगल आहे आणि त्या जंगलात वावरायला शिकले पाहिजे हे लहान मुलांना शिकवणे.

ह्यात अस्वस्थ होत असाल तर सगळ्यांनीच आरशासमोर उभं राहायची गरज आहे.

अपेक्षांचे ओझे आणि नकार या चक्रात अडकलेली आणि बहकलेली पिढी प्रत्येक काळात होती आणि बहकण्याचे मार्ग सुद्धा आधीच्या पिढीसाठी न समजणारे होते. आपले कुठे चुकले हे विचार करणारी पिढीही प्रत्येक काळात होती. कदाचित कुटुंब मोठे होते म्हणून असेल, एवढ्या मोठ्या कुटुंबात वाट चुकलेले एखादे मूल तसेच सामावले गेले. त्याचा फार गाजावाजा झाला नाही.

आता लहान कुटुंबात, यश आणि अपयश magnifying glass मधून बघण्याची सवय झाली आहे. साधे KG पास होणे टोप्या उडवून साजरे केलं जाते, तशाच चुका सुद्धा तेवढ्याच वाईट पद्धतीने मांडल्या जातात.

आपण यशस्वी आहोत हे सिद्ध करण्याचे फार कमी मार्ग माझ्या आधीच्या पिढीकडे होते.

शिक्षण, चांगली नोकरी, घर, जमले तर गाडी, बायकोच्या अंगावरील ठळक दागिने आणि स्वतःचा संसार करण्यास योग्य ठरलेली मुले.. बस.

हे झाले की बहुतांशी लोक समाधानात जगायची. निदान आयुष्याचा स्विकार असायचा. आता ह्या गोष्टी असायलाच हव्या, granted धरल्या जातात. अर्थात ह्या गोष्टी काही जन्माबरोबर येत नाहीत ना! त्यासाठी वेळ, मेहनत आणि “बांधिलकी” अपेक्षित असते.

प्रचंड स्पर्धा, मोठी महत्त्वाकांक्षा, मोठी स्वप्ने यामुळे मेहनत प्रचंड लागते, वेळ कमी पडतो, कुटुंबासाठी द्यायचा वेळ जो पूर्वी असायचा तो काढणे खरच कठीण झाला आहे. म्हणून असेल, “बांधिलकी outsource करण्याचे प्रमाण वाढले आहे. ”

साधेच बघा, पैसे मोजून आवडीने घेतलेल्या घरात. इंटेरियर करायला आर्किटेक्ट असतो, अनेकवेळा तुमच्या घरावर तुमच्या आवडीची खूण नसतेच…ट्रेंड जसा तसे घर असते. घरात घालवायचा वेळ सुद्धा अत्यंत कमी झाल्याने ते मेन्टेन करण्यासाठी सुद्धा नेमलेला स्टाफ असतो. आपल्या घराला कधीतरी प्रेमाने आपला स्पर्श होतो? त्यात सुट्टी पडली की एवढ्या लाडा कौतुकाने सजवलेले घर सोडून आपण out station जातो.

तक्रार नाही ही. हे घरा घरातील वास्तव आहे. घर तरी मानले तर व्यक्ती.. नाहीतर दगडाच्या भिंती.

मुलांची गोष्टच वेगळी असते. अगदी आवर्जून जन्माला घातलेले बाळ किती वर्ष बिलगुन असते! 

स्पर्धेला प्राधान्य देणारे हे जग आहे. दोन वर्षापासून त्याला सगळ्या विषयात प्रवीण करायला शिक्षक असतात, सांभाळायला आया असतात.

त्याचे जीन्स पिढीजात आले असतील पण विचार, आचार, सवयी ह्या नक्की कोणाच्या असतात? 

ऑफिस, करिअर आणि मिळाला वेळ तर सोशल लाईफ ह्यात मूल पालकांकडून काही उचलेल अशी संस्कार घडवणारी सोबत मिळते का मुलांना ? 

मौज मजा, लाड आणि अभ्यास सोडून म्हणते आहे मी. संस्कार म्हणजे पालकांच्या वर्तनाचा मुलावर उमटणारा ठसा.

दैनंदिन आचरण, यात पालकांचे आईवडिलांशी, भावंडांशी असलेले संबंध, मित्रांबरोबर असताना वर्तन, घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर असलेले वागणे, पार्टनर बरोबर असलेला बंध, सोशल मीडियावर असलेले तुमचे वर्तन, ह्या सर्व गोष्टी मूल indirectly न्याहाळत असतात. ते बघून मूल आपोआप घडत जाते. आपण नाही का म्हणत, अरे हा बाबासारखा नम्र आहे, आईसारखा हुशार आहे, आजोबांसारखा लाघवी आहे..

केवळ पेशी व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत. उदा. हुशारी आनुवंशिक असेल पण मेहेनत करणे हे मुलानी शिकण्यासाठी समोर उदाहरण असावे लागते. मूल घडवण्याचा पाया त्याचे घर असते.

तो बंध जर निर्माण झाला नसेल तर अचानक काही वर्षांनी लक्षात येते की अरे हे एवढे वेगळे का वागते, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी निवडी, त्याची स्वप्ने, त्याची व्यसने.. ह्यात कुठेच आमचा प्रभाव का नाही ? 

कारण ते पालकांबरोबर खऱ्या अर्थाने वाढतच नाही. एकाच घरी राहणे हे पुरेसे नसते त्यासाठी. मूल तुमचे उरतच नाही. उरतात ती त्यांनी केलेली कर्मे आणि ती निस्तारण्याची, कायद्यानं पालकांवर टाकलेली जबाबदारी.

ती आऊटसोर्स करता येत नाही. चुकून जर काही भलते झाले तर पालक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर येतेच.

ती टाळू शकत नाही म्हणून पालक जास्त खचत जातात. आपण अयशस्वी आहोत हा अपमान जास्त त्रास देतो.

मुलं वाढवणे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला समाजात वावरायला मदत करणे ही स्वतःहून स्विकारलेली गोष्ट असते. ती गृहित धरलेली कमिटमेंट असते. ती outsource पैशाने होऊ शकत नाही.

कितीही आदर्श वागायचा प्रयत्न केला म्हणून दगडातून मूर्ती घडतेच असे मला म्हणायचे नाही. काही केसेस आपल्या हाताच्या बाहेर असतात पण निदान वाट चुकलेल्या बोटीला आसरा मिळायला बंदर आहे एवढा विश्वास देण्याचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. गरज पडली तर त्याचे आयुष्य सावरण्यासाठी आयुष्याच्या स्वप्नाची सुद्धा तडजोड करण्याचा निर्धार हवा.

लहान मुलांचे जग छोटे असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी काय आहोत त्याही पेक्षा काय नाही आहोत ते त्यांना लगेच समजते. मूल एकदा घरापासून, मनातून तुटले की ती भेग सांधली जात नाही.

आईवडिलांचा अपमान करणे, त्यांना न भेटणे, त्यांच्याशी तुटक वागणे हे सौम्य प्रकार. मुलगा सुज्ञ असेल तर तो स्वतःचा विकास घडवून आईवडिलांवर बहिष्कार टाकतो, नसेल तर गरज असलेल्या सोबतीच्या शोधात मूल असे हरवले जाते.

Adolescence मध्ये हे वरकरणी दिसत नाही पण अशाही केसेस दिसतात. कुणाबरोबर पळून जाणे, ड्रग्स, व्यसने …आजूबाजूला माणसे असूनही मनात भरून उरलेला एकाकीपणा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे.

पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.

– क्रमशः भाग दुसरा  

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments