सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —

Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.

सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.

एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.

सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.

ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही! 

मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.

Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.

आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.

अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.

ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.

पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.

पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.

तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.

आयुष्य त्याचे सोपे नव्हते.

घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.

आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.

त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.

त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण 

पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.

सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.

या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.

“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.

हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही 

पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.

आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात? 

माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.

गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.

माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..

आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार! 

वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..

आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.

— समाप्त —

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments