इंद्रधनुष्य
☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆
आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!
बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा जन्म गोव्याचा. पण नाव काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच झाले.
भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला.
या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली.
हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले.
शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही.
आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले.
धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत.
गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’
महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !
– केशव साठये
संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈