सुश्री प्रभा सोनवणे
इंद्रधनुष्य
☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
गेली अनेक वर्षे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, मी विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आठ मार्चच्या निमित्ताने लिहिल्या आहेत. आज मी ज्या महिलेचा परिचय करून देणार आहे ती अत्यंत कर्तृत्ववान आणि उच्चविद्याविभूषित स्त्री आहे, कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात त्या,प्रमाणे….”दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती” …तशीच जिच्या दिव्यतेची गेली अनेक वर्षे प्रचिती वैद्यकीय क्षेत्रात येत आहे ती डाॅ.आरती किणीकर !
डाॅ. आरती किणीकर कार्य कर्तृत्ववाने महान आहे पण वयाने माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तिला एकेरी संबोधत आहे.
आरती किणीकर बी.जे.मेडिकल काॅलेजमध्ये प्रोफेसर असून, ससून हाॅस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ (विभाग प्रमुख ) आहे.
विद्यार्थीप्रिय प्रोफेसर, निष्णात डॉक्टर अशी ख्याती असूनही कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नसलेलं, मृदू भाषिक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.आरती किणीकर!
बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे लहानमुलांच्या आजारावर विशेष संशोधन, थॅलेसेमिया या आजाराविषयक जागरूकता निर्माण करून यशस्वी उपाय योजना, ससून हाॅस्पिटलच्या माध्यमातून अनेक खेडी दत्तक घेऊन कुपोषित बालकांच्या समस्येवर उपाय शोधून, त्या बाबतीतही भरीव कार्य करीत आहे.
डाॅ. आरती किणीकर शालेय शिक्षण काॅन्व्हेंट मधे झाले असून, वडिलांच्या बदलीच्या नोकरी मुळे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई इ.शहरात शालेय शिक्षण झाले!
वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी( मुंबई ), एम.आर.सी.पी.(इंग्लंड)
अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी, यशस्वी डॉक्टर! कर्तव्यदक्ष संसारी स्त्री, पत्नी, सून, आई या सर्व भूमिकेत उत्कृष्ट महिला!
कोरोनो काळात कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या काळात पुण्यात प्रतिबंधक उपायांसाठी दहा डॉक्टर्स ची टीम नियुक्त करण्यात आली त्यात डॉ.आरती किणीकरचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत – व्हेंटिलेटरचा तुटवडा पडल्याने अनेक रूग्ण दगावले, डाॅ. आरती किणीकर यांनी स्वतः संशोधन करून विशिष्ट प्रकारचे व्हेंटिलेटर्स अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले, इतरही अनेक वैद्यकीय यशस्वी प्रयोग केलेआहेत.
डॉक्टर असल्यामुळे कोरोना योद्धा तर आहेच.अतिशय व्यग्र असूनही घर संसारही अतिशय नीटनेटका, वयोवृद्ध सासू सासरे यांची अतिशय उत्तम देखभाल आणि निगराणी राखली! पती डाॅ.अविनाश किणीकर हे सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहेत. मुलगा आशुतोष इंजिनिअर आहे.
डाॅ. आरती किणीकर पूर्वाश्रमीची नयना चव्हाण, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ती माझी मावस बहीण आहे.
डॉक्टर म्हणून ती ग्रेट आहेच पण माणूस म्हणूनही खूप चांगली आहे. वैद्यकीय व्यवसायातलं तिचं कार्यकर्तृत्व मोठं आहेत, त्या क्षेत्रात तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, गेली अनेक वर्षे मी तिचे तिच्या क्षेत्रातील अथक परिश्रम पहात आहे!
आठ मार्चच्या निमित्ताने तिचे अभिनंदन आणि कौतुक!
स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणा-या स्वयंसिद्ध स्त्रिया म्हणजे मला अष्टभूजेच्या कन्याच वाटतात. विविध क्षेत्रातील या अष्टभूजेच्या कन्यांना माझा सलाम!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈