सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ चैत्र गौरीच्या ओव्या… गीता गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
द्वितीयेची चंद्रकोर नाजुकशी शोभियली,
माझ्या गं अंगणात माहेरवाशिण ती आली.
बांधविला छान झुला, अंगणात सावलीला,
सडा रांगोळी घालून, पानाफूलांनी सजविला.
पाय धुवून प्रवेशली, गौर शुभ पावलांनी,
नाजूक पैंजण जोडवी, कंकणे किणकिणली.
झोपाळ्याला पितळ कड्या, लखलख चमकती,
मऊ रेशमी गालिचा, शोभे त्यावर तो किती.
गौर बसली थाटात, आजुबाजू फूलं माळा,
वस्त्र नाजुक घातले, मोतियांचे सर गळा.
चांदीच्या वाटीत , नैवेद्य नानाविध,
सुगंधित शीतल जल, पन्हे रस सरबत.
सुबक करंज्या मोदक लाडू, पक्वान्ने ती किती,
आंबा द्राक्षे कलिंगड, शोभा वाढविती.
लेक माहेरासी येते, गौरीच्या गं स्वरूपात,
क्षणभर विसावते, करी मायदेशी हितगुज.
सासुरवाशीण माहेरवाशिण, दोन्ही माझ्याच की लेकी,
होई माझे घर गोकुळ, दूध साखर त्यांच्या मुखी.
गौरीच्या आगमने, घर गेले आनंदून,
घर नाचते गाते जणु, लहान बालक होऊन.
गौर नटली जेवली, विसावून तृप्त झाली,
अक्षय तृतीया करून, परतण्या सज्ज झाली.
मनी दाटे हुरहुर, परि रिवाज पाळण्या
सानंदे करा पाठवणी, निरोप पुढल्या वर्षी येण्या.
राहो तुझा आशिर्वाद, नांदो सुख सर्वत्र,
घराघरांत भरून राहो, मंगलमय पावित्र्य.
– सुश्री गीता गद्रे, टिमरनी (म.प्र.)
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२