सुश्री उषा जनार्दन ढगे

? इंद्रधनुष्य ?

☆ रक्तातही प्लॅस्टिक…!  – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.

सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.   

पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा  उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.

वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो. 

मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो. 

नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा! 

ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे 

संग्राहिका :  सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments