श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ “संगीत”— जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
जोतिष्यशास्त्रात ग्रहांच्या स्पंदनाला खूप महत्व आहे. Viabrations ज्याला आपण मराठीत कंप किंवा स्पंदन म्हणू . जेव्हा एका सेकंदात सोळापेक्षा जास्त पण आठ हजारपेक्षा कमी स्पंदने होतात तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो आणि जेव्हा तो लयबद्ध होतो तेव्हा त्याला आपण संगीत म्हणतो. सामवेद हा सर्वस्वी संगीतासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जोतिष्य हे वेदांग आहे. या दोघांच्या संबंधाचा उपयोग करून आपण जोतिष्यशास्त्रात संगीताचा वापर एक उपाय म्हणून कसा वापरता येईल ते पाहू.
संगीत हे एक असे एकमेवाव्दितीय विज्ञान आहे की ज्याच्या प्रभावापासून कोणीही, अगदी पक्षी, प्राणी, मानव, आदिवासी, जात, धर्म, पंथ दूर नाहीत. संगीताला विज्ञानाचे विज्ञान असे म्हणतात कारण संगीत मग ते कोणत्याही देशाचे, भाषेचे असो त्याच्यामध्ये तुमच्या अंतरात्म्याला थेट स्पर्श करण्याची ताकद आहे. आणि ते समजण्यास कोणत्याही भाषेच्या भाषान्तराची गरज नसते.
संगीताचे विज्ञान “नाद” यावर अवलंबून आहे आणि नाद हा साऱ्या विश्वात व्यापून राहिला आहे. “सा रे ग म प ध नि” हे सात सूर महादेवाच्या नृत्य आविष्कारातून निर्माण झाले असे मानतात. स्वर व त्यांचे ग्रह खालील प्रमाणे-
१) सा –रवी
२) प … चंद्र
३) ध — मंगळ
४) रे —बुध
५) नी — गुरु
६) म –शुक्र
७) ग –शनी
तसेच राग आणि राशी
१) भैरवी कुंभ
२) भूप राग कन्या
३) राग बैरागी मीन रास
४) श्री राग वृषभ
५) राग वसंत सिंह रास
६) राग सारंग धनु
७) राग पंचम धनु
भैरवी रागावर शनीचे प्रभुत्व आहे असे मानतात. राग भैरवी हा एक गूढ, भव्य, दिव्य, धीर, गंभीर असा राग आहे त्यामुळे शनीचे सर्व गुण त्याला लागू पडतात. श्री राग हा हळुवार प्रेम, संध्याकाळची हुरहूर, कोमलता व्यक्त करताना वापरतात म्हणूच हा शुक्राचा राग असे मानतात.
वेगवेगळे राग आणि त्यांची गायन पद्धती इतकी प्रभावशाली आहे की ऐकणाऱ्याचा मनाचा नूर आणि मूड बदलून टाकण्याची क्षमता आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेत चंद्र शनी, मंगळ राहू युती असते ते थोडयाशा चिथावणीने एकदम सटकून जातात किंवा निराशेच्या गर्तेत लोटले जातात. अश्यांना वीणेच्या एका झंकारानें आपोआप शांत करता येते. उष्णता, प्रकाश, आवाज, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सौम्य व उग्र अशी दोन टोके असतात. तसेच राग, लोभ, मद, मोह, मत्सर, शांति या स्थितीमध्ये दोन टोकाची स्थिती घातकच असते. सुवर्णमध्य संगीतानेच साधणे शक्य आहे.
जेव्हा चंद्राबरोबर शनी, मंगळ किंवा राहू असतात तेव्हा जातकात असलेली टोकाची नकारात्मक वृत्ती काही निवडक ट्यूनमुळे काढून टाकता येते. म्हणून तर आपल्या कडे विशिष्ठ मंत्र होम-जप असतात त्याच्या मध्ये संगीत आहेच. मंत्र होम जप या मधील नादानेच यजमानाच्या मनातील नकारात्मक वृत्तीवर परिणाम साधायचा असतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक व उत्तम विचारशक्ती वाढीस लागते. गुरु हा बुद्धीचा तर शुक्र हा भावनेचा कारक मानतात. ज्यांच्या चतुर्थात शुक्र ते संगीत उत्तम जाणतात, तर गुरु असता ते संगीताचे उत्तम ज्ञान असलेले असतात.
एके काळी भारतीयांना या संगीत आणि नाद यावर इतके प्रभुत्व होते की ते दीप राग आळवून दिवे तर मेघमल्हार गाऊन पाऊस पाडू शकत. तानसेन यांनी एकदा आपल्या संगीताने पिसाळलेला हत्ती शांत केला अशा कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकण्याची ही कला कालांतराने भारतीयांची दैवीशक्ती व अंतर्स्फूर्तीबद्दलची होत गेलेली उदासीनता कारणीभूत आहे. त्यागराज, तानसेन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, दिगंबर विष्णू पलुस्कर यांना त्यांच्या मनाच्या उत्कट भावावस्थेत रागाची रचना सुचली असावी. असो. पण आजही एक छानसे अंगाई गीत म्हणताच बाळ झोपी जाते की नाही.
सप्तमात बिघडलेला शुक्र असणाऱ्यांनी मादक विषयासक्त संगीत फार ऐकू नये. तसे करणे घातक ठरू शकते तसेच चतुर्थात बाधित शनी किंवा व्दितीयात शुक्र मंगळ अशा लोकांनी जरूर भक्तीसंगीत (डिव्होशनल) ऐकावे.
सध्याचे संगीत हे ऐकणाऱ्यांना हिंस्त्र, पाशवी, रागीट, वाईट वृत्ती वाढीस लागण्यास मदत करते. पण संगीत हे एक दैवी शास्त्र आहे. त्याचा आपण योग्य वापर समाज समृद्ध करण्यास केला पाहिजे.
(सदर लेख हा प्रसिद्ध जोतिषी बी. व्ही. रमण यांनी लिहिलेल्या Astrological मॅगझीनच्या (मार्च १९४४) संपादकीय लेखाचा सरळ अनुवाद आहे.)
संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com