? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 3 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

(आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. ) – इथून पुढे —-

देव भक्ताची पूजा करतो हे ज्ञात होतं. देव भक्तासोबत नाचतो, गातो, खेळतो हेही ज्ञात होतं. कारण कृष्णावतारात वृंदावनी गोपगोपिकांबरोबर त्याने महा रासगरबा केला होता. गोपांसवे यमुनातटी अन् विष्णुपदी शिदोऱ्या एक करून काला करून खाल्ला. एकमेकांना खावू घातला होता, हे सगळ्यांनाच माहीत होतं. सारे लोक नवविधभक्तीतून भगवंत पूजन करतात. पण भगवान भक्तीचा भुकेला, भक्तांचा भुकेला आहे.  तो भक्तांचे पूजन करतो.. त्याचे गुणवर्णन ऐकतो. नव्हे स्वतः त्याचे नाव घेऊन भावविभोर होऊन नाचतो, हे त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण काय पाहतो ते समजेना. पण ते सारं डोळ्यासमोर घडत होतं .नारदांनी केवळ बसून भक्ताची पूजा करताना पाहिलं होतं. आपण भक्ताचा नामघोष करत नर्तन करताना पाहतो आहोत  याचा आनंद झाला.  देव नाचतो याची गंमत वाटली. आणि तेही भक्तनावाचा जप करीत नाचतो याचं आश्चर्य वाटलं. 

मगापर्यंत आजचे देवदर्शन चुकले याची चुटपुट होती, पण आता सगळे बदलले. आनंद, परमानंद झाला. सुखाच्या अत्युच्च शिखरावर स्वार झाल्यासारखं वाटू लागलं. आपण काही आगळेवेगळे पाहिल्याची ऐकल्याची भावना हृदयात प्रज्वलित झाली. जीव तृप्तला. समाधान पावला. अमृतपानाहूनही हे भक्त-नामामृत रसपान अद्भुत होतं. ते पाहिल्याचं समाधान होतं. ते अनुभवल्याचा आनंद होता. परमानंद होता..

आज देवदर्शन मुकले नाही तर खरं देवदर्शन घडलं. खरं देवदर्शन झाल्याचा आनंद झाला. 

किती वेळा ते दृष्य पाहिलं माहित नाही, कळलं नाही. त्या तंद्रीतच ती व्यक्ती नाचू लागली. तीही व्यक्ती तोंडाने म्हणू लागली —

“ज्ञानोबा – तुकाराम”, 

“ज्ञानोबा  – तुकाराम”. 

खरंच संतांच्या नामस्मरणाचा काय आनंद होतो ते ती व्यक्ती अनुभवत होती.  

आता तिचं भान हरपून गेलं होतं. पहाट झाली. काकडआरतीसाठी मंडळी मंदिराकडे आली आणि त्यांनी तिला हलविले अन् ती व्यक्ती भानावर आली. शरीराने ऐहिक जगातील नित्यक्रम करू लागली. पण मन मात्र सुखाच्या कारंजाप्रमाणे नाचत होतं. ‘भक्तभजन’ रंगात दिवसभर मन तिकडेच होतं. दुसरीकडे चिंतन सुरु झालं- हे काय अद्भुत? ज्या भगवंताच्या नामस्मरणाने काय साध्य होते ते आपण वाचतो, ऐकतो, त्याचे महात्म्य सांगतो, तो स्वत:च संतनामात एवढा दंग होतो? ‘ याचा अर्थ त्याला स्वतःच्या नावापेक्षा भक्तनामघोष अधिक आवडतो . म्हणून आपणही तोच नामजप करावा. तोच आपल्यासाठी भक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी शक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी तारकमंत्र आहे. त्याचाच प्रसार झाला पाहिजे, नव्हे तो केला पाहिजे आणि तो मी केला पाहिजे. मला ते दर्शन घडले. मला ते ऐकायला मिळाले. तोच वारकऱ्यांचा तारक मंत्र आहे.’ 

आणि मग साऱ्या भक्तमंडळींना जमवून त्याबद्दल सविस्तर कथन केलं. 

काहींनी मानलं, काहींनी विरोध केला. आम्हाला अनुभुती आल्याशिवाय आम्ही का ऐकावे म्हणून काहींनी विरोध केला. त्यांच्या भजनावेळी टाळ पखवाज वाजवले तरी आवाज बाहेर येईना. कितीही प्रयत्न करून, अक्षरश: बडवूनही स्वर येईना. मग भजनरंगी भक्तरसात येऊन संत स्तवन झालं, ” ज्ञानोबा – तुकाराम ” बोल तोंडातून बाहेर पडले अन् मगच टाळ आणि पखवाज पुन्हा घुमु लागले. ” ज्ञानोबा – तुकाराम.” 

—हाच मंत्र आज साऱ्या वारकरी संप्रदायाला शक्ती प्रदान करणारा, भक्तिरसात चिंब करणारा, शक्ती- भक्ती- मंत्र म्हणून प्रचलित आहे. तोच नामजप केल्याशिवाय कुठलीही दिंडी निघत नाही. कुठलेही भजन सुरू होत नाही.  कुठलेही कीर्तन संपत नाही. 

कोणाही थकल्या मरगळलेल्या व्यक्तीलाच नव्हे, तर मृत्युशय्येवरच्या व्यक्तीलाही “ज्ञानोबा” ऐकलं की “तुकाराम” शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतात “ज्ञानोबा तुकाराम” हीच महाराष्ट्राची खरी भक्तीधारा आहे. हीच खरी शक्तीधारा आहे. हीच खरी विचारधारा आहे. भगवंतापासून प्रवाहित होवून ती समस्त वारकरी बांधवांपर्यंत आणून त्यांना त्यात सुस्नात करणारी ती महान व्यक्ती म्हणजे ‘ श्री संत प्रल्हाद महाराज बडवे ‘ होत. भक्तनाम गात नर्तन करणाऱ्या भगवंताचे दर्शन त्यांना घडले. ” ज्ञानोबा-तुकाराम ” हे भगवंतोद्गार पहिल्यांदा त्यांनी ऐकले. पाहिले. ते त्यांनीच पुढे प्रचारित केले. त्यामुळे सकल वारकरी भक्तांच्या मनात त्यांचे विषयी ममत्व आहे. वारकरी त्यांचे चरणी लीन होतात. त्यांना सन्मानित करतात. 

शके १५४२ मधे विठूरायाच्या परंपरागत पूजा-अर्चन करणाऱ्या बडवे कुळात जन्म घेतलेल्या प्रल्हाद महाराजांचा शके  १६४० (सन १७१८) हा समाधी काळ आहे. म्हणजे सुमारे ३५० वर्षे या घटनेला झाली.  तरी आजही नामदास महाराज फडावर, वासकर फडावर, आजरेकर फडावर, शिरवळकर फडावर, धोंडोपतदादांचे फडावर, बाबा महाराज सातारकरांचे फडावर तसेच दस्तापुरकरपासून ते कान्हेगांवकरांपर्यंतच्या साऱ्या महाराज मंडळात अन् विदर्भ, खानदेश, मराठवाड्यापासून ते कोकणापावेतोच्या सकल वारकरी सप्ताहात ही सत्यकथा, मंत्रकथा, दिव्यकथा, देवानुभुती कथा, देवलीला म्हणून सांगितली जाते. अन् लोक प्रल्हाद महाराजांचे चरणी नतमस्तक होतात.

— समाप्त —

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments