? इंद्रधनुष्य ?

☆ ती फुलराणी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

काही माणसं जगावेगळी असतात. त्यांना भेटलं की मन एकदम उल्हसित होतं. कामाप्रती असलेला त्यांचा ध्यास थक्क करतो. ठाण्यातल्या ८० वर्षांच्या मालती मेहेंदळे अर्थात मेहेंदळेआजी हेही असंच एक व्यक्तिमत्व.

लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला. त्यामुळे सर्वसामान्य मुलीसारखं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंच नाही. अपघाताच्या खुणांमुळे त्या आत्मविश्वास हरवून बसल्या आणि त्यातच त्यांचं बालपणही हरवलं. त्यांनी आपल्या आयुष्याच्या सीमा आखून घेतल्या. इतरांमध्ये मिसळणं त्या जणू विसरूनच गेल्या. कशीतरी शाळा पार पडली. अर्थात शाळेत असताना त्यांनी धावणे, गोळाफेक, दोरीच्या उड्या अशा ज्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यात पहिला नंबरच मिळवला. कॉलेजजीवनही त्यांना फारसं मानवलं नाही. त्यामुळे शिक्षणाची गाडी तिथेच थांबली.

एकदा भावाने त्यांच्यासाठी कागदी फुलं कशी बनवावीत हे दाखवणारं एक पुस्तक आणि काही कागद आणले. पुस्तक इंग्रजीत होतं आणि त्या भाषेशी त्यांची केवळ तोंडओळखच होती. माळ्यावरच्या एका रिकाम्या खोलीत त्यांनी कागदी फुलं बनवायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्य बहरून गेलं.

कालांतराने त्यांचं लग्न झालं आणि त्या रोह्यावरून मुंबईतल्या पार्ल्यात आल्या. दोन मुली झाल्या आणि काही वर्षांनी पती अचानक वारले. त्या पुन्हा माहेरी आल्या. नंतर त्यांचा पुनर्विवाह होऊन मेहेंदळे बनून त्या ठाण्यात आल्या. चांगले दिवस सुरू झाले. त्यांचे यजमान स्वभावाने खूप चांगले होते. मधल्या काळात त्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्या. ‘जीवनज्योती’ या पतपेढीच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. आजींनी या संस्थेसाठी बरीच वर्षं काम केलं.

मेहेंदळेकाका अचानक गेल्यावर आजी परत फुलं बनवू लागल्या. अचानक कोणीतरी त्यांना सांगितलं की या फुलांचं आपण प्रदर्शन भरवू या. प्रदर्शन भरवण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे फुलं बनवायला येणाऱ्या मुलींनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि प्रदर्शन पार पडलं. एवढी सुंदर आणि जिवंत फुलं पाहून ती कागदी आहेत यावर कोणाचा विश्वासच बसेना. प्रदर्शन अत्यंत यशस्वी झालं. आजी मनातून खूप आनंदी झाल्या. जवळ जवळ पन्नास वर्षं जोपासलेल्या छंदाचं सार्थक झालं. मग मात्र आजींनी मागे वळून बघितलं नाही. नंतर एल अॅण्ड टी या कंपनीसाठीही त्यांनी प्रदर्शन भरवलं. तुर्भेच्या टी.आय.एफ.आर. या प्रतिष्ठित संस्थेने आजींच्या फुलांचं प्रदर्शन आयोजित केलं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजींचं खूप कौतुक केलं. मधल्या काळात फुलं बनवायला शिकण्यासाठी मेहेंदळेआजींकडे तरुण मुलींचा ओघ सुरू झाला. त्यांचा क्लास खूप लोकप्रिय झाला.

आजी नंतर अमेरिकेला गेल्या , भारतभर फिरल्या. सगळीकडची फुलं बघितली आणि घरी येऊन त्यांनी ती साकारली. आजी फक्त क्रेप पेपरचीच फुलं बनवतात. वेगवेगळ्या रंगाचे, छटांचे क्रेप पेपर शोधत असतात. क्वचितप्रसंगी त्या रंग वापरतात. कृष्णकमळ आणि बकुळ ही दोन फुलं बनवणं आव्हानात्मक आहे, असं त्या सांगतात. आज आजींना त्यांच्या या छंदामुळे अजिबात वेळ नाही. त्या एकट्या राहत असल्या तरी त्या एकट्या कधीच नसतात. परिस्थिती टोकाची प्रतिकूल असतानाही सुंदर जगावं कसं हे मेहेंदळेआजींकडे बघून सहज कळतं.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments