इंद्रधनुष्य
☆ स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रध्वज – लेखक –स्व. वि. दा. सावरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“ब्रिटिशांचा युनियन जॅक हाच हिंदुस्थानचा ध्वज म्हणून आमच्या भर कॉंग्रेसमधेच मिरविला जाई, जयजयकारिला जाई. ह्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचा भावी ध्वज कसा असावा ह्याविषयी अभिनव भारतात होणाऱ्या चर्चेची जी एक कल्पना मॅडम कामाबाई आणि हेमचंद्र दास ह्यांना आलेली होती, तिचेच स्वरूप निश्चित करून पॅरिसला चित्रकलानिपुण हेमचंद्र दास ह्यांनी तत्काल एक सुंदर ध्वज चित्रवून दिला.
तो घेऊन कामाबाई त्या परिषदेला स्टुटगार्ड (जर्मनी) येथे गेल्या. त्यांची भाषणाची पाळी येताच ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडून हिंदुस्थान स्वतंत्र करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या वतीने त्यांनी आपले उद्दीपक भाषण करताकरता मध्ये तो ध्वज काढून, आवेशाने पुढे मागे फडकवीत त्या उद्गारल्या, “behold!! This is the flag of independent India.” हा पहा आमचा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज !
त्यासरशी अकस्मात चकित होऊन तेथील सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी उठून त्या ध्वजास मानवंदना
दिली !! स्वतंत्र भारताचा जगातील प्रबळ राष्ट्रांच्या मेळाव्यात प्रकटपणे उभारला गेलेला हा पहिलाच राष्ट्रध्वज होय !!!
– स्व. वि. दा. सावरकर
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈