श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-2 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
(तसेच अंतरिक्षयान परत आल्यावर अंतराळवीरांना सुखरूपपणे यानातून बाहेर काढले जाते.) इथून पुढे —–
४) गेट वे :- हे चंद्राभोवती भूस्थिर कक्षेत फिरणारे एक अंतराळ स्थानक असून येणाऱ्या भविष्यात त्याची उभारणी केली जाईल. भविष्यातील आर्टिमिस मोहिमांतील अंतराळवीर ओरियन यानातून या स्थानकावर येतील. येथून ते आवश्यक सामान घेऊन ह्युमन लॅंडींग सिस्टिममध्ये(HLS) जातील. त्यांना घेऊन HLS चंद्रावर उतरेल. अंतराळवीर चंद्रावर त्यांना सोपवलेली कामगिरी बाजावून HLS मध्ये बसून गेट वे वर येतील. तेथून ओरियन यानाद्वारे ते पृथ्वीवर परततील. यात फायदा हा आहे की एकाच चंद्रमोहिमेमध्ये अंतराळवीर एकापेक्षा जास्त वेळा चंद्रावर उतरून काम करू शकतात अथवा चंद्राभोवतीच्या कक्षेत विविध प्रयोग करू शकतात. हा गेट वे एका दशकाहून जास्त काळ कार्यरत असेल.
५) ह्युमन लॅंडींग सिस्टम (HLS):- ही चंद्रमोहिमेमधील अंतिम वाहतूक प्रणाली आहे. याद्वारे चंद्राच्या कक्षेतून अंतराळवीरांना चंद्रावर उतरविले जाईल व काम संपल्यावर पुनः त्यांना चंद्रकक्षेत नेले जाईल.
६) आर्टिमिस बेस कॅम्प :- अंतराळवीरांना चंद्रावर राहणे व काम करणे यासाठी याची निर्मिती केली जाईल. यामध्ये आधुनिक चांद्रकार्यकक्ष(Cabin), एक बग्गी(Rover) व एक फिरते घर (Mobile home) असणार आहे.
आता आपण आर्टिमिस योजनेच्या पहिल्या तीन मोहिमांविषयी माहिती घेऊ :
आर्टिमिस १ :-आर्टिमिस १ द्वारा मानवरहित ओरियन यानाला चंद्राच्या ४०,००० मैल पलीकडे किंवा पृथ्वीपासून २,८०,००० मैलाच्या कक्षेत पाठविण्यात येईल. ही मोहीम म्हणजे SLS, ओरियन व एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम (EGS) यांचे समानव मोहिमेआगोदरचे एकत्रित परीक्षण आहे.
SLS प्रक्षेपकाची चार RS-25 इंजिन्स, दोन अनुवर्धि प्रक्षेपक व अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्पा या सर्वांचे वेगवेगळे व संयुक्त परीक्षण झालेले आहे, पण त्याचे अंतराळातील हे पहिलेच उड्डाण आहे. त्यामुळे या मोहिमेद्वारा त्याच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल.
ओरियन यानाचे साडेचार तासांचे प्रत्यक्ष उड्डाण परीक्षण ५ डिसेंबर २०१४ ला झाले आहे. याद्वारे या यानाने ते पृथ्वीच्या सुदूर कक्षेत अंतराळ उड्डाणयोग्य आहे हे सिद्ध केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना त्याच्या उष्णताप्रतिबंधक कवचाचे थोड्या प्रमाणात का होईना परीक्षण झाले आहे. यान समुद्रात उतरल्यावर त्याच्या कोषाला (capsule) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिकही झाले आहे. ओरियन यानाच्या या प्रत्यक्ष उड्डाण परीक्षणाला एक्सप्लोरेशन फ्लाइट टेस्ट-१ असे संबोधण्यात आले आहे. हे परीक्षण मानवरहित होते.
नासाने ओरियनच्या पॅरेशूट्सचे परीक्षण सप्टेंबर २०१८ ला यशस्वीरीत्या पर पाडले. या प्रणालीत ११ पॅरेशूट्स असणार आहेत. यान समुद्रसपाटीपासून ५ मैल आल्यावर ती उघडली जातील.
२०१९ ला नासाने असेंट अबॉर्ट -२ परीक्षण पार पाडले, त्याद्वारे उड्डाणाच्यावेळी ओरियन यानाच्या टोकावर असणारी संकटकालीन यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे याची खात्री करण्यात आली. उड्डाणाच्या वेळी काही अनपेक्षित घडलेच, तर ही यंत्रणा ओरियन यानाला आतील अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून बाजूला काढेल व अटलांटिक समुद्रात त्याला उतरविण्यात येईल.
ओरियन यानाचा दल विभाग (crew module) हा युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने बनविलेल्या सेवा विभागाशी (service module) पूर्णपणे जोडला आहे. हा सेवा विभाग दल विभागाला लागणारे जास्तीत जास्त प्रणोदन (propulsion), ऊर्जा आणि शीतकरण (cooling) पुरविणार आहे. मोहिमेदरम्यान अंतराळवीर दल विभागात राहतील व काम करतील. जगातील सर्वांत मोठ्या निर्वात खोलीत व टोकाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र व तपमान (-२५० ते २०० डिग्री फॅरनहिट) असणाऱ्या परिस्थितीत यानाचे परीक्षण करण्यात आले आहे. अशी परिस्थिति अंतराळात असते म्हणून हे परीक्षण करण्यात आले.
नासाच्या भू प्रणाली विभागाने (ground system team) पायाभूत सुविधांमध्ये (infrastructure) व भू समर्थन उपकरणांमध्ये (ground support equipments) योग्य ते बदल केले, जेणेकरून आर्टिमिस मोहिमेचे उड्डाण व ओरियन यानाचे अवतरण यांना मदत होईल. वाहन जुळणी इमारतीत (vehicle assembly building) तसेच नवीन पुनर्निर्मित 39-B प्रक्षेपण तळावर फिरत्या लॉंचरचे परीक्षण करण्यात आले व सुविधा प्रणाली (facility system) व भू प्रणाली (ground system) यांचेशी तो उड्डाणाच्यावेळी संवाद साधू शकेल याची खात्री करण्यात आली.
एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम दल (EGS team) हा विभाग उड्डाणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जबाबदार असतो. या दलाच्या सदस्यांनी फायरिंग रूम -१ मध्ये उड्डाणाचे प्रारूप निर्माण करुन अभ्यास केला आणि शिक्कामोर्तब केले की, हे दल उड्डाणसज्ज आहे आणि प्रत्यक्षात उड्डाणाच्यावेळी येणाऱ्या कोणत्याही अडचणींना तोंड देण्यास समर्थ आहे. या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.
क्रमशः …
© श्री राजीव गजानन पुजारी
फोन -9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈