श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-3 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
(या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.) इथून पुढे —–
SLS प्रक्षेपक मानवरहित ओरियन अंतराळयानाला पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. तेथून अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्प्याच्या सहाय्याने यान चंद्राच्या रेट्रोग्रेड कक्षेत जायला सज्ज होईल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने (gravity assist) ते चंद्राच्या सुदूर रेट्रोग्रेड कक्षेत जाईल. रेट्रोग्रेड म्हणजे, चंद्र स्वतःभोवती ज्या दिशेने फिरतो, त्याच्या विरुद्ध दिशेने यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. या कक्षेत यान सहा दिवस राहील. नंतर परत गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यान पृथ्वीकडे झेपावेल. एकूण मोहीम २६ दिवसांची असेल. मोहिमेची पूर्तता यान ताशी २४,५०० मैल किंवा मॅक ३२ या अतिप्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करुन पॅसिफिक महासागरात विसावण्याने होणार आहे. तत्पूर्वी त्याने त्याच्या संपूर्ण प्रवासाचा विदा ( डेटा ) गोळा केलेला असेल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यानाचा परत प्रवेश ही या मोहिमेची प्राथमिकता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना यानाच्या उष्णतारोधक कवचाचे तपमान ५००० डिग्री फॅरनहिट एव्हढे असणार आहे. या तपमानाला हे कवच टिकते का याचेही परीक्षण या निमित्ताने होईल.
या मोहिमेमध्ये अंतराळवीरांना आवश्यक असणाऱ्या उपकरणांऐवजी वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती गोळा करणारी उपकरणे असतील. समानव मोहिमेच्यावेळी कॉकपीट समोर असणारे दर्शक, नियंत्रक व जीवसंरक्षक उपकरणांऐवजी यानाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आवश्यक अशा विदा ( डेटा ) गोळा करणाऱ्या उपकरणांचा समावेश असेल. यामुळे यानाच्या कामगिरीचे उड्डाणापूर्वी तयार केलेले अंदाजी प्रारूप व प्रत्यक्ष विदेवरून मिळालेली माहिती यांचा तौलनिक अभ्यास केला जाईल. या चार ते सहा आठवड्यांच्या मोहिमेमध्ये यान चौदा लाख मैलांपेक्षा जास्त प्रवास करेल. यामुळे मानवांसाठी तयार केलेल्या यानाचा पृथ्वीपासून सुदूर प्रवासाचा अपोलो १३ ने केलेला उच्चांक मोडला जाईल. या मोहिमेशी अनेक विश्वविद्यालये, आंतरराष्ट्रीय सहयोगी व खाजगी कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांची संख्या पूर्वीच्या चांद्रमोहिमेशी जोडल्या गेलेल्या संस्थांपेक्षा जास्त आहे. आर्टिमिस-१ मोहिमेमध्ये १३ लघुउपग्रह सुद्धा सुदूर आंतरिक्षात सोडले जातील, त्यामुळे आपल्या सुदूर अंतरिक्षाच्या वातावरणाविषयीच्या ज्ञानात भर पडेल. हे उपग्रह नवीन वैज्ञानिक अन्वेषण करतील आणि नवीन तांत्रिक प्रत्यक्षिके देखील करतील.
आर्टिमिस-२:- ही स्पेस लॉंच सिस्टीम व ओरियन अंतराळयान यांची पहिलीच समानव मोहीम आहे. या मोहिमेद्वारा चार अंतराळवीरांना पन्नास वर्षांनंतर प्रथमच चंद्राच्या वातावरणात पाठविण्यात येणार आहे. ‘आर्टिमिस पिढी’ चा हा ‘अपोलो ८’ क्षण आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण अपोलो ८ यानाद्वारा इतिहासात प्रथमच मानव चंद्राच्या वातावरणात पोचला होता. यावेळी ओरियन यानातील अंतराळवीर पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा फोटो काढतील.
आर्टिमिस १ च्या यशामुळे तसेच हजारो तास केलेल्या तयारी व तालमींमुळे मिळालेला आत्मविश्वास घेऊन हे अंतराळवीर SLS च्या टोकावर असलेल्या ओरियनमध्ये आरूढ होतील. ही मोहीम दहा दिवसांची असेल. या मोहिमेद्वारा चंद्राच्या विरुद्ध बाजूला जास्तीतजास्त लांब जाण्याचा व असंकरीत मुक्त प्रत्यागमन विक्षेपमार्गाने (hybrid free return trajectory) परत येण्याचा समानव यानाचा विक्रम प्रस्थापित होईल.
आर्टिमिस ३:- आर्टिमिस-२ प्रमाणेच आर्टिमिस-३ मोहिमेमध्ये देखील चार अंतराळवीर असतील. पण यावेळी पहिल्यांदा एक स्त्री व नंतर एक पुरुष चंद्रभूमीवर पाऊल ठेवतील. आर्टिमिस-३ मोहिमेपूर्वी चंद्राभोवती अंतराळस्थानक उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्याला गेट वे म्हणून संबोधले जाईल. ओरियन अंतराळयान या स्थानकाशी जोडले जाईल. अंतराळवीर या स्थानकावर उतरतील. नंतर ह्यूमन लँडिंग सिस्टीम (HLS) द्वारे ते चंद्रावर उतरतील. चंद्रावरील काम संपल्यावर HLS च्या मदतीने ते पुन्हा स्थानकावर येतील. या स्थानकाचा उपयोग फार महत्वाचा आहे. कारण एकाच चंद्रमोहिमेत अंतराळवीर अनेकदा चंद्रावर उतरून काम करू शकतील. जर आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत स्थानकाचे काम पूर्ण झाले नाही तर आर्टिमिस योजनेच्या पुढील मोहिमांसाठी याचा वापर केला जाईल. या अंतराळ स्थानकासारखेच भविष्यात मंगळाभोवती देखील अंतराळ स्थानक उभारण्यात येईल. या स्थानकात अंतराळवीर थांबून अनेकवेळा ते मंगळावर उतरून काम करू शकतील. म्हणजेच चंद्राभोवतीचे अंतराळ स्थानक म्हणजे मंगळावर मनुष्य भविष्यात कशा पद्धतीने काम करू शकेल याची रंगीत तालीमच म्हणायची!!
जर अंतराळ स्थानक आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत पूर्ण झाले नाही तर, अंतराळवीर ह्यूमन लँडिंग सिस्टिम वापरून चंद्रावर उतरतील. या परिस्थितीत चंद्रकक्षेतच अंतराळवीर ओरियन मधून HLS मध्ये स्थलांतरित होतील. चंद्रावरील त्यांचे काम संपल्यावर HLS मध्ये बसून पुन्हा ते चंद्रकक्षेत येतील, तेथेच ते पुन्हा ओरियन यानात स्थलांतरित होतील. नंतर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.
क्रमशः …
© श्री राजीव गजानन पुजारी
फोन -9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈