श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-4 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
(नंतर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.) इथून पुढे —
नासाने ह्यूमन लँडिंग सिस्टीमसाठी आलेल्या तीन आराखड्यांमधून स्पेस एक्स चा आराखडा निवडला आहे. ती पूर्णतः पुनर्वापर होऊ शकणारी उड्डाण भरणारी व अवतरण करणारी प्रणाली आहे. त्याची रचना चंद्र, मंगळ व अंतराळातील अनेक खगोलीय पिंडांकडच्या प्रवासासाठी बनविण्यात आली आहे. ही HLS स्पेस एक्स च्या सुपर हेवी प्रक्षेपकाद्वारे उड्डाण भरेल. पृथ्वीच्या निम्न कक्षेत (low earth orbit अर्थात LEO) इंधन भरून ती चंद्राकडे प्रयाण करेल.
आर्टिमिस-३ मोहिमेमध्ये यान चंद्रावर कोठे उतरवायचे हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्यात मोहिमेची उद्दिष्टे आणि उड्डाणाची तारीख महत्वाची आहेत. नासाच्या सध्या चंद्रकक्षेत असलेल्या ल्यूनार रिकनायसन्स ऑर्बिटर कडून आलेली चंद्रभूमीची सुस्पष्ट अशी अनेक छायाचित्रे नासाकडे उपलब्ध आहेत. त्यात वर्षातील कोणत्या काळात कोणत्या भागात किती सूर्यप्रकाश असतो हे दिसते. यान उतरविण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे, त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश हवा (कारण सूर्यप्रकाश हा एकमेव ऊर्जास्रोत असणार आहे), तपमानातील चढउतार कमीतकमी हवेत, पृथ्वीशी संवाद साधण्यासाठी उतरण्याची जागा व पृथ्वी एका रेषेत हवेत (म्हणजे मध्ये डोंगर वगैरे नकोत), जागेचा उतार कमीतकमी हवा, जागेवर जास्त माती व दगडधोंडे नकोत नाहीतर यान उतरताना धूळ उडेल तसेच चालताना किंवा रोव्हर चालवताना अडथळा येईल. ही जागा चंद्राच्या कायम अंधाऱ्या जागेजवळ असावी कारण तेथे कांही ठिकाणी बर्फ स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.
नासाने पृथ्वीवरून चंद्रावर व चंद्रावरून पृथ्वीवर सामानाची ने आण करण्यासाठी चौदा कंपन्या निवडल्या आहेत. त्यांना कमर्शिअल ल्यूनार पे लोड सर्व्हिसेस (CLPS) म्हटले आहे. आर्टिमिस-३ मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर उतरण्यापूर्वीच त्यांना लागणारे सामान, वैज्ञानिक उपकरणे व VIPER (Volatiles investigating polar exploration rover) ही बग्गी (rover) हे सर्व या CLPS द्वारा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाठविण्यात येईल. हा VIPER सुद्धा अंतराळवीरांनी कोठे उतरायचे हे सुचवू शकेल. चंद्रावर दोन अंतराळवीर शंभर किलो सामानासह उतरतील. परततांना ते चंद्रावरील दगडमातीचे पस्तीस किलो वजनाचे नमुने घेऊन येतील.
एक आठवड्याच्या चंद्रावरील मुक्कामात अंतराळवीर त्या प्रदेशातील भू रचनेचा अभ्यास करून त्याची नोंद ठेवतील, त्यात एखादा कायम अंधारात असणारा पट्टा आढळतो का हे ही पाहतील. पृथ्वीवर आणण्यासाठी ते विविध नमुने गोळा करतील, त्यांचा पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केला जाईल. दगडांच्या नमुन्यांवरून चंद्रावर मोठी उल्का किंवा अशनी कधी आदळला तो कालखंड ठरविला जाईल. खडक पोखरून घेतलेल्या नमुन्यांवरून त्या खडकांच्या थरात प्राचीन सौरवादळांचे अवशेष आहेत का हे पाहण्यात येईल. एक नमुना कायम अंधार असलेल्या भागातून व एक नमुना कायम उजेडात असणाऱ्या भागातून घेतला जाईल व त्यांमध्ये भूगर्भीयदृष्ट्या कांही फरक आहे का, तसेच अंधारातील नमुन्यामध्ये वायुरूप मूलद्रव्ये आहेत का हे तपासले जाईल.
चंद्रावर असतांना अंतराळवीर HLS च्या एका कक्षात राहतील. HLS चा वरचा भाग पुनः चंद्रकक्षेत परतण्यासाठी वापरला जाईल. अंतराळवीर चंद्रावर कमीतकमी दोनवेळा उतरून काम करतील. अंतराळवीरांनी घातलेल्या अंतराळपोषाखात असणाऱ्या जीवनरक्षक प्रणालीत सुधारणा करून चार वेळा चंद्रावर उतरून काम करता येईल का, तसेच आणखी एखादे अवतरण अनपेक्षित आले तर करता येईल का याचा नासा विचार करत आहे. त्यासाठी HLS च्या वजनात वाढ करावी लागल्यास ती किती करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. तसे झाल्यास दिवस क्रमांक १,२,४,५ हे चंद्रावर काम करण्याचे दिवस पैकी शेवटच्या दिवसाचा अर्धा भाग त्या परिसराची स्वच्छता, हत्यारे गोळा करून व्यवस्थित ठेवणे-जेणेकरून ती पुढील मोहिमांमध्ये वापरता येतील- वगैरेसाठी असेल तर दिवस क्रमांक ३ हा विश्रांतीचा असेल. त्यावेळी अंतराळवीर HLS च्या आत वैज्ञानिक प्रयोग व पृथ्वीवरील लोकांशी संभाषण वगैरे करतील. जर ल्यूनार टेरिन व्हेईकल(LTV) हा रोव्हर अंतराळवीर उतरण्याआधी उपस्थित असेल तर, अंतराळवीर चंद्रभूमीवर जास्त दूर प्रवास करू शकतील.
चंद्रावरचा मुक्काम संपल्यावर अंतराळवीर HLS द्वारे चंद्रभूमीवरून उड्डाण करून ओरियनशी जोडले जातील व तीन दिवसांचा प्रवास करून पृथ्वीवर परततील.
आर्टिमिस-३ नंतर….
आर्टिमिस-३ नंतर अनेक चंद्र मोहिमा केल्या जातील. पुढील मोहिमांच्यावेळी गेट-वे अर्थात चांद्र अंतराळ स्थानकाचा वापर केला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आर्टिमिस कॅम्प उभारण्यात येईल. पृथ्वीवरील इंटरनेट प्रमाणे LunaNet चालू करण्यात येईल. रोव्हर्स सॅम्पल्सचे पृथ:करण करतील व तो विदा पृथ्वीकडे पाठविण्यात येईल. चंद्रभूमीवरील अंतराळवीरांना सौरज्वाळांची आगाऊ सूचना मिळून ते आडोशाला जाऊ शकतील. ल्यूनानेट पोझिशनिंग, नेव्हीगेशन आणि टाईमिंग (PNT) सेवा देईल, त्यामुळे चंद्रपृष्ठावरील कामे पूर्वीपेक्षा सुरळीतपणे पार पडतील.
या सर्व चंद्रमोहिमा नासा, त्याचे आंतरराष्ट्रीय सहकारी आणि व्यावसायिक सहकारी यांच्याद्वारे केल्या जातील. त्यामुळे नासाला सौरमालिकेचा धांढोळा घ्यायला वेळ मिळेल. नासाचे हे सहकारी रोव्हर्स, चंद्रनिवास आणि ISRU- इन सी टू रिसोर्स युटिलायझेशन अर्थात चंद्रभूमीवरील संसाधनांचा उपयोग करणारी साधने पुरवू शकतात. त्यामुळे आर्टिमिस कॅम्प हा अमेरिका व तिच्या सहकाऱ्यांसाठी दुसरे घरच बनेल.
चंद्रमोहिमांच्या या बहुमोल अनुभवाचा वापर करून नासा आर्टिमिस योजनेअंतर्गत समानव मंगळ मोहीम आखणार आहे.
— समाप्त —
© श्री राजीव गजानन पुजारी
फोन -9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈