? इंद्रधनुष्य ?

☆ पहाटे तुळशीला पाणी का घालावे?… डाॅ. संतोष ढगे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगीतले आहे. त्यापाठीमागे पुढील दोन महत्वाची कारणे आहेत —–

📖 अध्यात्मिक महत्व-

याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजीत करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, “ तू कोण आहेस?”  त्यावर विष्णू आपल्या खऱ्या  रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला ‘ तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, ‘ असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, “ तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण  स्वीकारील ?” तेव्हा भगवंत म्हणतात, “ मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.” त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात.

ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘ शालिग्राम ’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

📖 वैज्ञानिक महत्व-

जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वत्थ –पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यू सोडते. व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.

या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे.

॥ इति सर्वेश्वरी चरणार्पणमस्तु ॥

– ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, 

– त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.

– जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,

– तिथे भक्तीची कमतरता नसते. 

– जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. 

– जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. 

– आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.

सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया: |

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत् ||

ले. डॉ. संतोष ढगे

 

संग्रहिका : माधुरी परांजपे

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments