श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test) श्री राजीव ग पुजारी 

जर तुम्हाला हॉलिवूड सिनेमांची आवड असेल तर तुम्हाला नक्कीच अर्मागेडन हा ब्लॉकबस्टर सिनेमा आठवत असेल. या सिनेमात ब्रुस विलीस आणि बेन ऐक्लेफ एका लघुग्रहापासून पृथ्वीला वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. या सिनेमाच्या कहाणीला अमेरिकन अंतरीक्ष संस्था अर्थात नासा (NASA) मूर्त स्वरूप देत आहे.

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी स्पेस एक्स (Space-X)च्या फाल्कन-९ (Falcan-9) या प्रक्षेपकाद्वारे नासाने DART (Double Asteroid Redirection Test) या अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपण केले. या मोहिमेचा उद्देश डायमॉर्फस या लघुग्रहाला धडक देऊन त्याची कक्षा बदलणे हा होता. या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, पण भविष्यात एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीचे रक्षण करण्याची वेळ आलीच तर त्याची रंगीत तालीम म्हणून या मोहिमेकडे पाहता येईल. नासाने या मोहिमेला ग्रहीय संरक्षण मोहीम (Planetary Defence Mission) असे नाव दिले आहे.

२७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी या आंतरिक्ष यानाने एक कोटी सहा लाख किलोमीटर दूर असलेल्या डायमॉर्फस या लघुग्रहाला ताशी २४००० किलोमीटर या वेगाने धडक दिली आणि नासाच्या जोन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीतील तंत्रज्ञ व वैज्ञानिक आनंदाने बेभान झाले. कारण मानवी इतिहासातील हा क्षण एकमेवाद्वितीय होता. 

संपूर्ण मोहिमेसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. नासाचे ग्रहीय संरक्षण अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणतात, ” सध्याचा विचार केला तर, असा कोणताही लघुग्रह नाही, ज्याच्यापासून पृथ्वीला नजिकच्या भविष्यात धोका संभवू शकेल. परंतु अंतराळात पृथ्वीच्या जवळपास मोठ्या संख्येने लघुग्रह आहेत. नासाचा प्रयत्न असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आहे, की ज्यामुळे भविष्यात प्रत्यक्षात जर एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका वाटला, तर वेळेअगोदर त्यावर उपाय करता येईल. आम्ही अशी वेळ येऊ देणार नाही की एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येईल व त्यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचे परीक्षण करू.”

डायमॉर्फस हा १६० मिटर व्यासाचा लघुग्रह असून तो डिडीमॉस या ७६० मिटर व्यासाच्या दुसऱ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस व डिडीमॉस ही जोडगोळी सूर्याभोवती ज्या वेगाने परिभ्रमण करते, त्यापेक्षा खूप कमी गतीने डायमॉर्फस डिडीमॉसभोवती फिरतो. त्यामुळे DART ने दिलेल्या धडकेचा परिणाम आपणास सहज मोजता येईल. या धडकेमुळे डायमॉर्फसच्या डिडीमॉसभोवती फिरण्याच्या कक्षेत १% पेक्षा कमी फरक पडेल पण पृथ्वीवरून दुर्बीणीच्या सहाय्याने तो मोजता येण्याजोगा असेल.

DART अंतराळयानाने लिसीयाक्यूब (LICIACube) नावाचा लहान उपग्रह सोबत नेला होता. हा उपग्रह इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. DART च्या धडकेअगोदर तो DART पासून अलग केला गेला व त्याने डायमॉर्फसवरील DART च्या धडकेचे तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या धुळीच्या ढगाचे फोटो घेऊन नासाकडे पाठवले आहेत. पृथ्वीवरील व अंतराळातील दुर्बिणी, धडकेनंतर डायमॉर्फसच्या कक्षेचा वेध घेतील व त्याच्या कक्षेत किती फरक पडला आहे हे नजिकच्या भविष्यात आपणास कळू शकेल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments