? इंद्रधनुष्य ?

☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तनोट राय देवी – खरं तर हे नावसुध्दा मी आधी ऐकले नव्हते. पण आम्ही राजस्थान टूरला गेलो असताना जैसरमेलला टेन्टमधे राहून तेथील थरचे वाळवंट व त्या अनुषंगाने   वालुकामय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आमच्या गाईडने सांगितले की येथून साधारण २०० किलोमीटरवर प्रसिध्द श्री तनोट राय देवीचे जागृत मंदिर आहे. तेथे जायला ४ तास लागले. मंदिरात प्रवेश करतानाच मला नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटले. चौकशीअंती कळले की हे मंदिर BSF – Border Security Force च्या अखत्यारीत आहे व या मंदिराची पूर्ण देखभाल अगदी पूजेसहीत BSF करते. त्यामुळे सर्वत्र एकप्रकारची शिस्त जाणवते. कसलेही अवडंबर नाही. सकाळची पूजा झाल्यावरचे प्रसन्न वातावरण, देखणी फुलांची आरास केली होती. स्थानिक लोक भक्तीभावाने दर्शनास येत होते. दर्शन लांबूनच होते. शेजारी बरेच गोटानारळ ठेवलेले होते, ते प्रत्येकजण घेऊन वाढवत होते. अर्धा देवीपुढे व अर्धा प्रसाद –हे सर्व विनाशुल्क. मंदिरात कोणीही पुजारी वा गुरूजी नव्हते. पण सारे काही शांतपणे चालले होते. 

मंदिर परिसरात फिरत असताना तेथे शोकेसमधे खूप सारे जवानांचे व बॉम्बचे फोटो दिसले. अशी माहिती मिळाली की BSF चे हे आराध्य दैवत आहे. १९६५च्या युध्दात पाकिस्तानी सैन्याने या मंदिराच्या परिसरात ३०००+ बाँम्ब फेकले होते, पण तरीही मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही व सर्व बाँम्ब न फुटता वाया गेले. तेथे आजही बरेच बाँम्ब पहायला ठेवले आहेत. एवढे बॉम्ब टाकल्यावर कसलेही नुकसान न होणे हा आपल्या व पाकिस्तानी सैन्यासाठी एक चमत्कारच होता. म्हणून या देवीला ‘ बमवाली देवी ‘ असे पण म्हणतात. हा चमत्कार पाहून पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडीयर शाहनवाज यांनी देवीदर्शनाची परवानगी मागितली. आपल्या सरकारने अडीच वर्षाने ती दिल्यावर त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली, जी आपल्याला आजही पहायला मिळते . 

मंदिराबाहेर १९६५च्या भारत पाकिस्तान युध्दाची आठवण म्हणून एक विजयस्तंभ उभारला आहे. हा स्तंभ आपल्या मनात आपल्या जवानांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण जागवतो. मंदिराएवढेच या विजयस्तंभासमोर नतमस्तक होत असताना मी परत एकदा माझ्या हजारो जवानांचे प्राण वाचवणाऱ्या देवीपुढे विनम्रपणे झुकले व प्रार्थना केली की ‘ देवीमा अशीच माझ्या जवानांवर तुझी कृपा ठेव व अखंड पाठीशी रहा.’ 

येथून भारत पाकिस्तान सीमा २० किमी आहे. तेथे जाण्यासाठी या मंदिर परिसरातच BSF ने काही औपचारिकता पूर्ण केल्यावर पास देण्याची व्यवस्था केली आहे. ती पूर्ण करून आपल्याला बॉर्डरपर्यंत जाता येते. तेथे मोठा वॅाचटॅावर आहे. येथून सर्व परिसर छान दिसतो. यावेळी प्रथमच Front line – Border वर कार्यरत असलेली महिला ऑफिसर ड्युटीवर दिसली . तिच्याशी संवाद साधत आम्ही तिच्याप्रती वाटणारा आदर व अभिमान व्यक्त केला. त्यांचे नाव श्रीमति सुमती, व त्या श्री गंगानगरच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅार्डरपोस्टचा नंबर ६०९ आहे व शेवटचे गाव आहे बावलीया.  प्रत्यक्ष बॅार्डरवर, जेथून पाकिस्तान फक्त १५० मीटरवर आहे, तेथे जाण्याचा एक संस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही समला परतलो.

 

लेखिका : सुश्री विभा पटवर्धन  

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments