डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद– (संस्कृत ऋचा – मधुछंदस् वैश्वामित्र ऋषी) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
गीत ऋग्वेद
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३ ( सरस्वती सूक्त )
देवता – १ ते ३ अश्विनीकुमार; ४ ते ६ इंद्र; ७ ते ९ विश्वेदेव; १० ते १२ सरस्वती.
संस्कृत ऋचा – मधुछंदस् वैश्वामित्र ऋषी
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
अश्वि॑ना॒ यज्व॑री॒रिषो॒ द्रव॑त्पाणी॒ शुभ॑स्पती । पुरु॑भुजा चन॒स्यत॑म् ॥ १ ॥
आर्द्र जाहले हस्त आपुले दानकर्म करुनी
स्वामी आपण मंगल सकल करिता या अवनी
भक्तगणांना अश्विना हो तुमचा आधार
अर्घ्य अर्पितो स्वीकारुनिया आम्हा धन्य कर ||१||
अश्वि॑ना॒ पुरु॑दंससा॒ नरा॒ शवी॑रया धि॒या । धिष्ण्या॒ वन॑तं॒ गिरः॑ ॥ २ ॥
हे अश्विना तुमची कर्मे सर्वांना ज्ञात
सकल जाणती तव शौर्याला होई मस्तक नत
धैर्य अपुले दे आधारा संकट काळात
मायेने घे पोटाशीया होऊनि अमुचे तात ||२||
दस्रा॑ यु॒वाक॑वः सु॒ता नास॑त्या वृ॒क्तब॑र्हिषः । आ या॑तं रुद्रवर्तनी ॥ ३ ॥
अश्वदेवते सत्यस्वरूपे पीडा तू हरिशी
पराक्रमाने तुझिया आम्हा सौख्य सदा देशी
दर्भतृणांना दूर करोनी मधुर सोमरस केला
आवाहन हे तुजला आता येई प्रशायला ||३||
इन्द्रा या॑हि चित्रभानो सु॒ता इ॒मे त्वा॒यवः॑ । अण्वी॑भि॒स्तना॑ पू॒तासः॑ ॥ ४ ॥
दिव्य कांतीच्या देवेंद्रा ये हविर्भाग घ्याया
करांगुलींनी तयार केल्या सोमरसा प्याया
शुद्ध नि निर्मल किती सोमरस तुजसाठी बनविला
सच्चित्ताने निर्मोहाने तुजला अर्पीयला ||४||
इन्द्रा या॑हि धि॒येषि॒तो विप्र॑जूतः सु॒ताव॑तः । उप॒ ब्रह्मा॑णि वा॒घतः॑ ॥ ५ ॥
विद्वानांनी थोर तुझ्यास्तव स्तोत्रे ती रचिली
आम्ही सानुले तुझ्याच चरणी भक्ती आळविली
तुझ्याचसाठी सिद्ध करुनिया सोमरसा आणिले
स्वीकारुनिया आर्त प्रार्थना हवी तुझा तू घे ||५||
इन्द्रा या॑हि॒ तूतु॑जान॒ उप॒ ब्रह्मा॑णि हरिवः । सु॒ते द॑धिष्व न॒श्चनः॑ ॥ ६ ॥
पीतवर्ण अश्वावर आरुढ वज्रसिद्ध देवेन्द्रा
झणि येउनिया स्वीकारुनिया स्तवने धन्य करा
प्रीती तुमची सोमरसाप्रति जाणुनिया आणिला
प्राशुनिया त्या प्रसन्न चित्ते आम्हा हृदयी धारा ||६||
ओमा॑सश्चर्षणीधृतो॒ विश्वे॑ देवास॒ आ ग॑त । दा॒श्वांसो॑ दा॒शुषः॑ सु॒तम् ॥ ७ ॥
रक्षणकर्ते या विश्वाचे विश्वात्मक तुम्ही
पोषणकरते अखिल जिवांचे विश्वपाल तुम्ही
हविर्भाग हा तुम्हास अर्पण यावे स्वीकाराय
अनुभूती देउन औदार्याची आशिष द्यायला ||७||
विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒प्तुरः॑ सु॒तमा ग॑न्त॒ तूर्ण॑यः । उ॒स्रा इ॑व॒ स्वस॑राणि ॥ ८ ॥
जगतरक्षका या विश्वाचा असशी तू देव
नैवेद्याला ग्रहण कराया प्रसन्न होई पाव
सायंकाळी गृहा परतण्या धेनु आतुर होई
सोमरसास्तव आर्त होऊनी तसाचि रे तू येई ||८||
विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒स्रिध॒ एहि॑मायासो अ॒द्रुहः॑ । मेधं॑ जुषन्त॒ वह्न॑यः ॥ ९ ॥
विश्वंभर देवांची माया किती मतीतीत
द्वेष न करिती त्यांची सर्वांठायी असते प्रीत
समर्थ नाही जगती कोणी त्यांना पीडाया
स्वीकारुनिया हविर्भाग सिद्ध आशिष द्याया ||९||
पा॒व॒का नः॒ सर॑स्वती॒ वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती । य॒ज्ञं व॑ष्टु धि॒याव॑सुः ॥ १० ॥
पावन करणारी विश्वाला सरस्वती येवो
हविर्भागास्तव यज्ञवेदीवर अवतारुनिया येवो
बुद्धीसामर्थ्य्याने तुझिया आम्हा लाभो ज्ञान
तुझ्याच ठायी शाश्वत असुदे अमुचे हे ध्यान ||१०||
चो॒द॒यि॒त्री सू॒नृता॑नां॒ चेत॑न्ती सुमती॒नाम् । य॒ज्ञं द॑धे॒ सर॑स्वती ॥ ११ ॥
सत्य प्रेरणा दायी माता सकलांची शारदा
मार्ग दाविशी सुबुध जणांना तू असशी ज्ञानदा
स्वीकारुनिया अमुची भक्ती याग धन्य केला
सरस्वतीने कृपा दावुनी यज्ञ ग्रहण केला ||११||
म॒हो अर्णः॒ सर॑स्वती॒ प्र चे॑तयति के॒तुना॑ । धियो॒ विश्वा॒ विरा॑जति ॥ १२ ॥
विश्वव्यापि तू बुद्धिदेवता चराचरा व्यापिशी
स्वयंप्रकाशे ज्ञान उधळुनी आम्हाला उजळशी
प्रज्ञेच्या साम्राज्याची तू आदिदेवता होशी
आशीर्वच देऊन जगाला बुद्धिमान बनविशी ||१२||
YouTube Link : https://youtu.be/qYCLnbK_Tr0
Attachments area : Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 3
भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈