डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ४ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
सु॒रू॒प॒कृ॒त्नुमू॒तये॑ सु॒दुघा॑मिव गो॒दुहे॑ । जु॒हू॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥
उत्तमश्या अन्नासी भक्षुन धेनु मुदित होते
सकस देऊनी पान्हा अपुल्या पाडसासि पाजिते
विश्वनिर्मित्या हे शचीनाथा हवी तुला अर्पण
स्वीकारुनिया देवा होई तू आम्हासि प्रसन्न ||१||
उप॑ नः॒ सव॒ना ग॑हि॒ सोम॑स्य सोमपाः पिब । गो॒दा इद्रे॒वतो॒ मदः॑ ॥ २ ॥
तुझियासाठी सोमरसाचा सिद्ध घेउनी हवि
प्रतीक्षा तुझी आतुरतेने प्राशण्यास तू येई
अपार ऐश्वर्य तुझे आमुचे डोळे दिपविते
तुझ्या कृपेने गोधन देवा सहज प्राप्त होते ||२||
अथा॑ ते॒ अन्त॑मानां वि॒द्याम॑ सुमती॒नाम् । मा नो॒ अति॑ ख्य॒ आ ग॑हि ॥ ३ ॥
दयावान तू अंतर्यामी सर्वश्रुत असशी
आम्हा जवळी घे माया वर्षुन अपुल्या पोटाशी
देई आम्हालाही कटाक्ष एक करुणेचा
येई सत्वर नकोस पाहू अंत प्रतीक्षेचा ||३||
परे॑हि॒ विग्र॒मस्तृ॑त॒मिन्द्रं॑ पृच्छा विप॒श्चित॑म् । यस्ते॒ सखि॑भ्य॒ आ वर॑म् ॥ ४ ॥
बुद्धी होते समर्थ प्रज्ञेने विश्वामाजी
प्रियसख्याहुनी तोची श्रेष्ठ त्रैलोक्यामाजी
सत्वर जावे त्याच्या जवळी कृपा मागण्यासाठी
इंद्र करिल तव तृप्त कामना तुझिया भक्तीसाठी ||४||
उ॒त ब्रु॑वन्तु नो॒ निदो॒ निर॒न्यत॑श्चिदारत । दधा॑ना॒ इन्द्र॒ इद्दुवः॑ ॥ ५ ॥
उपासना इंद्राची फोल कुटिल किती वदती
कल्याण न होई सांगूनी मार्गभ्रष्ट करती
त्यांची धारणा त्यांना लाभो अम्हा काय त्याचे
देवेन्द्राची भक्ती करण्या आम्ही सिद्ध व्हायचे ||५||
उ॒त नः॑ सु॒भगाँ॑ अ॒रिर्वो॒चेयु॑र्दस्म कृ॒ष्टयः॑ । स्यामेदिन्द्र॑स्य॒ शर्म॑णि ॥ ६ ॥
भाग्य आमुचे थोर ऐसे इंद्रभक्त म्हणती
मस्तक अमुचे सदैव आहे तुमच्या पायावरती
पराक्रमी अति हे शचीपतये अमुचे न दुजे कोणी
तुझ्या आश्रयाचीच कामना वसते अमुच्या मनी ||६||
एमा॒शुमा॒शवे॑ भर यज्ञ॒श्रियं॑ नृ॒माद॑नम् । प॒त॒यन्म॑न्द॒यत्स॑खम् ॥ ७ ॥
यज्ञाला मांगल्य देतसे पवित्र सोमरस
सर्वव्यापि देवेंद्राला करुmm अर्पण सोमरस
चैतन्यासी जागृत करतो पावन सोमरस
संतोष स्फुरण इंद्रासी देई सोमरस ||७||
अ॒स्य पी॒त्वा श॑तक्रतो घ॒नो वृ॒त्राणा॑मभवः । प्रावो॒ वाजे॑षु वा॒जिन॑म् ॥ ८ ॥
पान करुनिया सोमरसाचे वृत्रा निर्दाळिले
चंडप्रतापि हे सूरेंद्रा असुरा उच्छादिले
शौर्य दावुनी शूर सैनिका रणात राखीयले
तव चरणांवर अर्पण करण्या सोमरसा आणिले ||८||
तं त्वा॒ वाजे॑षु वा॒जिनं॑ वा॒जया॑मः शतक्रतो । धना॑नामिन्द्रसा॒तये॑ ॥ ९ ॥
पराक्रमी तू शौर्य दाविशी अचंबीत आम्ही
वैभवप्राप्तीच्या वरदाना आसुसलो आम्ही
तुझ्या प्रतापाने दिपूनीया भाट तुझे आम्ही
यशाचे तुझ्या गायन करितो धन्य मनी आम्ही ||९||
यो रा॒योऽ॒वनि॑र्म॒हान्सु॑पा॒रः सु॑न्व॒तः सखा॑ । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ १० ॥
संपत्तीचा स्वामि समस्त संकटविमोचक
थोर अति जो सदैव सिद्ध भक्तांचा तारक
याजक करितो सोमरसार्पण सखा तया हृदयीचा
बलाढ्य देवेंद्राला स्तविता प्रसन्न तो व्हायचा ||१०||
YouTube Link: https://youtu.be/mS8oUKS-61o
Attachments area: Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 4
भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈