सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली.
गॉडविट (Godwit) जातीच्या पक्षाने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर अंतर कापून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया इथे तो उतरला. या ११ दिवसात त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर / तास.
या संपूर्ण प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त उडत होता आपल्या लक्ष्याकडे. अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या ५ ग्रॅमच्या सॅटलाईट चिपने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदला गेला आहे.
गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर / तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते.
निसर्गाच्या या अदाकारीपुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो. सलग ११ दिवस असा पृथ्वीच्या दोन टोकांचा प्रवास महासागरावरून करणं ही नक्कीच अविश्वसनीय अशी घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अश्या घटना उजेडात येत असल्या तरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास मला स्वतःला खूप शिकवून गेला.
लेखक – अज्ञात
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈