डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ५ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
आ त्वेता॒ नि षी॑द॒तेन्द्र॑म॒भि प्र गा॑यत । सखा॑य॒ स्तोम॑वाहसः ॥ १ ॥
या मित्रांनो या सखयांनो यज्ञवेदीला या
सारे मिळूनी गायन करु या सुस्वर लावू या
गायन अपुले सुरेन्द्रास या प्रसन्न करण्याला
कृपा तयाची व्हावी म्हणुनी आर्त व्हावयाला ||१||
पु॒रू॒तमं॑ पुरू॒णामीशा॑नं॒ वार्या॑णाम् । इन्द्रं॒ सोमे॒ सचा॑ सु॒ते ॥ २ ॥
सुरेंद्र शीरोमणी श्रेष्ठतम त्यासी वंदन करा
अलोट संपत्तीचा स्वामी त्याचे चरण धरा
होत्साता तो सिद्ध सोमरस सुरेंद्रस्तोत्र करा
आवर्जुनिया आर्त स्वराने त्या पाचारण करा ||२||
स घा॑ नो॒ योग॒ आ भु॑व॒त्स रा॒ये स पुरं॑ध्याम् । गम॒द्वाजे॑भि॒रा स नः॑ ॥ ३ ॥
या देवेंद्रा सामर्थ्यासह आम्हास दर्शन द्याया
आम्हा देखील तुम्हासारिख्या वैभवास द्याया
लाभ आमुचे सद्भावनिही तुमचा वास असो
तुमच्या चरणी चित्त आमुचे सदैव लीन असो ||३||
यस्य॑ सं॒स्थे न वृ॒ण्वते॒ हरी॑ स॒मत्सु॒ शत्र॑वः । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ ४ ॥
चंडप्रतापी देवेन्द्राशी रणी कोण भिडतो
सज्ज तयाच्या अश्वा पाहुन रिपुही भेदरतो
प्रसन्न करण्या सुरेन्द्रास या आर्त होऊनीया
सारे मिळूनी स्तवन करूया महिमा गाऊया ||४||
सु॒त॒पान्वे॑ सु॒ता इ॒मे शुच॑यो यन्ति वी॒तये॑ । सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ॥ ५ ॥
ताज्या सोमरसात मधुर दह्यास मिसळूनी
पवित्र पावन सोमरसाचा हविर्भाग आणुनी
रुची द्यावया देवेंद्राला त्यास सवे घेउनी
प्रसन्न करूया या इंद्राला सोमरसा अर्पुनी ||५||
त्वं सु॒तस्य॑ पी॒तये॑ स॒द्यो वृ॒द्धो अ॑जायथाः । इन्द्र॒ ज्यैष्ठ्या॑य सुक्रतो ॥ ६ ॥
राज्य कराया जगतावरती चंडप्रतापी इंद्रा
सोमाच्या पानास्तव होशी प्रकट सिद्ध देवेंद्रा
करून सोमाचा स्वीकार आम्हा उपकृत करी
सामर्थ्याने तुझिया देवा वसुंधरे सावरी ||६||
आ त्वा॑ विशन्त्वा॒शवः॒ सोमा॑स इन्द्र गिर्वणः । शं ते॑ सन्तु॒ प्रचे॑तसे ॥ ७ ॥
ज्ञानमंडिता हे शचिनाथा सोमरसा स्वीकारी
पान करुनिया या सोमाचे गात्रा मोद करी
वर्धन करिण्या उत्साहाचे तुझे स्तवन देवेंद्रा
तव चित्ताला तव देहाला नंद देत हे इंद्रा ||७||
त्वां स्तोमा॑ अवीवृध॒न्त्वामु॒क्था श॑तक्रतो । त्वां व॑र्धन्तु नो॒ गिरः॑ ॥ ८ ॥
स्तवनांनी या तुझीच महती दाहिदिशा पसरली
तुझ्या स्तुतीने तुझीच कीर्ति वृद्धिंगत ती झाली
या स्तोत्रांनी तव महिमा बहु दिगंत तो व्हावा
प्रज्ञाशाली रे देवेन्द्रा सकला प्रसन्न व्हावा ||८||
अक्षि॑तोतिः सनेदि॒मं वाज॒मिन्द्रः॑ सह॒स्रिण॑म् । यस्मि॒न्विश्वा॑नि॒ पौंस्या॑ ॥ ९ ॥
अमोघ वज्रा हाती घेउन इंद्र ज्यास तारी
कोण असे या जगी पूत जो तयासिया मारी
सहस्र ऐरावताच्या बला आम्हासिया देई
सामर्थ्ये ज्या पराक्रमांचे कृत्य हातूनी होई ||९||
मा नो॒ मर्ता॑ अ॒भि द्रु॑हन्त॒नूना॑मिन्द्र गिर्वणः । ईशा॑नो यवया व॒धम् ॥ १० ॥
रक्ष रक्ष इंद्रा स्तवितो तुज तुझ्या चरणी येउनी
देहाला या अमुच्या पीडा देऊ शके ना कोणी
तव सामर्थ्ये राज्य पसरले तुझे त्रिभूवनी
वधू शके ना आम्हा कोणी ठेव अम्हा राखुनी ||१०||
YouTube Link: https://youtu.be/aeFjHiFyKis
Attachments एरिया
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi
Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi
भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈