?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… ☆ संग्राहक – मृदुला बेळे☆

मी इटलीमधल्या तुरीन इथे  बौद्धिक संपदा  कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे,  2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून  गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं  होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही,  आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं.  हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि  त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून  परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा,  नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता.  ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं.  या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल  मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच  दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं.  दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल…टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध  माणूस… अब्जाधीश….सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा!  तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता…पाय लटपटत होते…छाती धडधडत होती.

क्रमशः….

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments