प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
इंद्रधनुष्य
☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
नुकतंच मी एका वादळाविषयी वाचलंय…
अनेक हिंदी चित्रपटांतून देशातील, विशेषतः विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईतील अंडरवर्ल्ड जगतातील अनेक पैलू दाखवले जातात. अनेक स्मगलर्स ,गॅन्गस्टर्स – त्यांच्या कामाच्या पध्दती, डावपेच दाखवून कुणीतरी हिरो किंवा प्रामाणिक पोलीस ऑफिसर ते कसे उधळून लावतो हे दाखवले जाते.अर्थात यात रंजकतेचा भाग मोठा असतो. यातील कथानक काल्पनिक असते. असे चित्रपट लोकप्रिय झाले. पण मुंबईतील गँगस्टर्स,स्मगलर्स यांना सळो की पळो करून सोडणारा एक खंदा वीर आपल्या देशात होऊन गेला,आणि त्याने एकेकाळी दैदिप्यमान इतिहास निर्माण केला होता. हा वीर आणि त्याने घडवलेला इतिहास आज कुणाला फारसा माहीत नाही.
२०२२ हे या वीराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने व्हाट्सअप वर एक पोस्ट वाचली आणि त्यातून या कर्तृत्वाची माहिती झाली, आणि माझ्या शब्दात ती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते आहे.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या वीराचे नाव आहे- जमादार बापू लक्ष्मण लामखडे. २ जुलै १९२२ रोजी जुन्नर तालुक्यातील (जि.पुणे) मंगरूळ पारगाव इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्लेगच्या साथीत वडिलांचे निधन झाले होते. मोठा भाऊ मुंबईतील गोदीत कामाला होता. गावी आपल्या आईची करडी शिस्त, आणि रानात शेळया चारताना आजूबाजूच्या निसर्ग यांच्या सान्निध्यात बापू लहानाचा मोठा झाला. त्याची शरीरयष्टी मजबूत बनली. पुढे त्याने चरितार्थासाठी मुंबईच्या गोदीत कामाला सुरुवात केली.
१९४४ मध्ये मुंबई कस्टममध्ये शिपाई म्हणून तो रूजू झाला. कसलेले शरीर, धाडसी स्वभाव, तीक्ष्ण नजर या जोरावर बापूने कस्टममध्ये अजोड काम केले. १९६०-७० हे दशक हा मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक स्मगलर्स आणि गॅन्गस्टर्सनी देशात धुमाकूळ घातला होता. सामाजिक अशांतता आणि अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले होते. दारू,मटका, स्मगलिंग, यामधून देशाला वेठीस धरले होते.अशा अनेकांवर बापूंनी वचक बसवला होता. अनेक तस्करांना पकडून त्यांच्याकडून त्यांनी त्यावेळी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. आपले असेच कर्तृत्ववान, धाडसी सहकारी आणि वरिष्ठांच्या सहाय्याने बापूंनी त्याकाळी अनेक गुन्हेगारांवर वचक बसवला होता. त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि धाडसी यशाच्या अनेक कहाण्या मुंबई कस्टमच्या इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत.
बापूंना पुढे जमादार पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाने गौरविण्यात आले. बापू लामखडे यांचे जीवनकार्य हा देशप्रेमाचा धगधगता आविष्कार होता. सततची जागरणं आणि धावपळीचा परिणाम बापूंच्या शारीरिक स्थितीवर होऊन ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. ‘ बापूंनी आपल्या धाडसाने मुंबई कस्टमच्या इतिहासात एका कर्तृत्ववान पाठ कायमचा लिहून ठेवला आहे,’ असा उल्लेख मुंबई कस्टमने केला. त्यांना दुसर्यांदा मरणोत्तर राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. मुंबईतील कस्टम ऑफिसच्या चौकाला, ” जमादार लक्ष्मण बापू चौक ” असे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांचा ब्राॅन्झचा पुतळा उभारण्यात आला आहे.
जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे जीवनकार्य हे साऱ्या भारतीयांसाठी देशाभिमानाचे जाज्वल्य प्रेरणास्रोत आहे.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈