प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
इंद्रधनुष्य
☆ नापास… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
१९४२ – महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘ छोडो भारत ‘ चा इशारा दिला होता. वणव्यासारखा हा इशारा सा-या हिंदुस्थानभर पसरला. गणपत शिंदे तेव्हा एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. तालुक्याच्या गावी एका राष्ट्रीय नेत्याची सभा ऐकून, त्याच क्षणी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन, त्याने स्वतःला
स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. घरदार सोडून रात्रंदिवस तो हेच काम करत राहिला. स्वातंत्र्य मिळाले तो दिवस तर त्याच्या दृष्टीने परमोच्च होता. तालुक्याच्या अनेक सरकारी कार्यालयांवरून इंग्रजी ध्वज उतरवून तिरंगा फडकावण्यात त्याला कोण आनंद झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्य करण्याच्या पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्याने खेडोपाड्यात जाऊन निरक्षर प्रौढांना विनामोबदला शिकवण्याचे काम हाती घेतले. त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्याच्याबरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले बरेच लोक सत्तेत सहभागी झाले होते. गणपतने स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपट आणि पेन्शनही स्वीकारली नाही. ” मी स्वातंत्र्य चळवळीत असं काही मिळवायला भाग घेतला नव्हता ” ही त्याची भूमिका होती. आयुष्याच्या अखेरीस तो खूप थकला होता. नोकरी त्याने पूर्वीच सोडली होती. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरही त्याने घराकडे लक्ष दिले नव्हते. गावाकडची शेती त्याच्या धाकट्या भावाने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. त्याच्या फकीरी वृत्तीला कंटाळून त्याची बायकोही माहेरी निघून गेली होती. “तत्व“ म्हणून असं निरलस जीवन जगलेला गणपत व्यवहारात मात्र नापास झाला होता.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈