सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
दिवाळीची धांदल मागे पडते. हैराण करणाऱ्या उकाड्याला मागे सारून थंडीच्या गुलाबी पावलांनी सोलापुरात प्रवेश केलेला असतो….. डिसेंबरच्या धप्प्यानं वर्षभर कपाटात नाहीतर माळ्यावर लपून बसलेले स्वेटर्स, मफलर, कानटोप्या बाहेर पडतात…
…. अन् त्यांच्याबरोबरच हृदयाच्या चोरकप्प्यात लपून राहिलेल्या आठवणींच्या रेशमी लडीही उलगडतात…
या सोनेरी आठवणी असतात धमाल हुरडापार्ट्यांच्या……
…. ” यंदा पाऊस आजिबात झाला नाही ” किंवा ” अति पावसानं ज्वारी आडवी झाली “…असा सोलापुरातल्या शेतकरीदादांनी कितीही आरडाओरडा केला, तरी निसर्ग आपल्या कर्तव्याला चुकत नाही….. सोलापुरातल्या काळ्याशार मातीत ज्वारीचं पीक डौलानं डोलू लागतं नि सोलापूरकरांना हुरडापार्ट्यांची स्वप्नं पडू लागतात…
हुरडा म्हणजे हिरवेगार,कोवळे ज्वारीचे दाणे….. ज्वारीनं मोत्याचं रूप घेण्याआधीची हिरवीकंच बाल्यावस्था म्हणजे हुरडा…..
सहकुटुंब,सहपरिवार हुरड्यासाठी शेतात जाणं, निळ्याशार आकाशाखालील हिरव्यागार शेतात पाखरांसारखं बागडणं, किलबिलाट करत हुरड्यावर ताव मारणं नि ही मंतरलेली आठवण आयुष्यभर काळजात जपून ठेवणं …
… हा सोलापुरकरांसाठी केवळ एक आनंददायी अनुभव नसतो, तर तो असतो एक समारंभ… हिरव्यागार निसर्गाचा उत्सव…
सोलापूरच्या संस्कृतीचा हा आनंदबिंदू…. या आनंदोत्सवाची सुरुवात ” येळ अमावस्या ” या शुभदिनी होते…
मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असतो ” येळ अमावस्येचा ” …. सोलापूरकरांची अन्नदायिनी “ज्वारी”
शेतांतून तरारून आलेली असते…. रसना हुरड्यासाठी आसुसलेली असते….. पण या अन्नदेची पूजा केल्याशिवाय, ,परमतत्त्वाला नैवेद्य दाखवल्याविना एकही दाणा तोंडात घालणं ही त्या शक्तीशी प्रतारणा…. म्हणूनच येळ अमावस्येच्या मुहूर्तावर हा नैवेद्याचा विधी संपन्न होतो..
” येळ अमावस्या ” हा सोलापूरचा सण…. या दिवशी कॉलेजे, शाळा, ऑफिसे ओस पडलेली असतात..
मायबाप सरकारने सुट्टी दिलेली नसली तरी सोलापूरकरांसाठी ती स्वयंघोषित असते…
या दिवशी प्रत्येक सोलापूरवासीयाला स्वत:च्या नाहीतर दुसऱ्याच्या शेतात जायचे असते… हा दिवस हुकला तर सारे वर्ष निष्फळ ठरते.
येळ अमावस्येच्या आदले दिवशीपासूनच कृषक कुटुंबातील गृहिणींची लगबग सुरू होते.. नातेवाईक,स्नेह्यांना आमंत्रणे जातात..
हुरड्यासाठी लागणारे राजा-राणीही बनवले जातात… राजा-राणी म्हणजे काय समजलं नाही नं ?…..
हुरड्याबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या तिखटगोड पदार्थांसाठी ” राजाराणी ” हा प्रेमाचा शब्द..
बारीक केलेला गूळ, ओल्या खोबर्ऱ्याचे तुकडे, साखरखोबरं, खारकांचे तुकडे हे गोड घास नाजूक राणीसाठी नि खोबरं-लसणाची , शेंगादाण्याची, जवस-कारळ्याची चटणी, खारे किंवा मसाल्याचे शेंगदाणे, लसूणपातीचं काळं मीठ हे झणझणीत पदार्थ रांगड्या राजासाठी…!! राजाराणी हे हुरड्याचे सवंगडी…
येळ अमावस्येदिवशी अगदी पहाटे उठून महिलावर्ग कामाला लागतो… शेंगाकूट, लसूण, कोथिंबीर, सोलापुरी काळा मसाला, लवंगपूड, याचं मिश्रण भरून झणझणीत वांग्याची भाजी बनते….
शेंगाकूट, तीळ, गूळ, वेलची यांचं भरपूर सारण भरून केलेल्या खमंग शेंगापोळ्यांची चळत लागते….
तगडावर अतिशय पातळ-पातळ पुरणपोळ्या बनतात….
शेंगापोळ्या नि पुरण यासाठी चुलीवर घरच्या लोण्याचं खमंग तूप कढवलं जातं…..
हळद,मीठ घातलेल्या नि तिळाने सजलेल्या बाजरीच्या पातळ पातळ भाक-या जन्म घेतात…..
…. पण येळ अमावस्येचे मुख्य कलाकार असतात असतात ” बाजरीचे उंडे नि भज्जे किंवा गरगट्टा “…
बाजरीचं पीठ साध्या किंवा उकळत्या पाण्यात घालून त्यात मीठ, हळद ( तीळ, लसूण असा मसालाही घालू शकता..) घालून भाकरीच्या पिठासारखं मळून त्याचे उंडे किंवा मुटके बनवले जातात. ते मोदकासारखे वाफवले जातात..हेच बाजरीचे उंडे….. या उंड्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवला जातो गरगट्टा किंवा भज्जे..
या दिवसांत भाज्या ,फळं, कोवळी पिकं तरारून आलेली असतात..
निसर्गानं दिलेल्या आहेराची निसर्गाला रिटर्न गिफ्ट द्यायला नको का? त्यासाठी हा ” भज्जे ” चा प्रपंच…
ताज्या-ताज्या, कोवळ्या पालक, चुका, मेथी,अंबाडी, हरबरा, चाकवत,चंदनबटवा या पालेभाज्या,
गाजर, घेवडा, वांगी, टोमॅटो, मटार ,ओले हरबरे, घेवड्याच्या बिया, शेंगादाणे या फळभाज्या, नि बोरं,पेरु यासांरखी फळे कुकरमधे उकडून ती एकजीव केली की त्यात तूर, मूग, मसूर, हरबरा अशा डाळी शिजवून घातल्या जातात. त्यावर लसूण, मिरची, जिरे-मोहरीची चरचरीत फोडणी नि मीठ घातलं की जबरदस्त चवीचा नि अतिशय पौष्टिक “गरगट्टा” तयार होतो…. हा गरगट्टा या मोसमात सात-आठवेळा खाल्ला की वर्षभराच्या जीवनसत्त्वांची नि क्षारांची बेगमी होते…
भाकरी म्हटली की ठेचा हवाच…. तोही बनतो..
घरच्या म्हशीच्या दुधाचं घट्ट दही आदले दिवशी विरजलेलं असतं… त्यातलं डब्यात भरलं जातं.
नि उरलेल्या दह्याचं आलं, मिरची ,कोथिंबीर घालून खुमासदार ताक बनतं नि दुधाच्या बरण्यांत जाऊन बसतं …शेताकडे जाण्यासाठी…
हा सारा जामानिमा होईपर्यंत सकाळचे दहा वाजतात…शेताच्या ओढीने आमंत्रित पाहुणे हजर झालेले असतात…
गाड्या शेताकडे निघतात…. शेतातली सुबकशी पायवाट मोठ्या पिंपळ नाहीतर वटवृक्षाच्या पारापाशी नेते..
पारावर सतरंज्या अथरलेल्या असतात..
थोड्याशा विसाव्यानंतर देखण्या शेताचं दर्शन घेतलं जातं.
ताजा ऊस दातांनी सोलून चघळला जातो.
हिरवागार डहाळा म्हणजे ओला हरबरा हिशेब न ठेवता रिचवला जातो.
डायरेक्ट झाडावरून पोटात जाणारे पेरू,बोरं पुन्हा बालपणाची सफर घडवतात.
खोल विहीरीचं पाणी गूढतेचा अनुभव देतं .
निसर्गाच्या प्रत्ययकारी नि विशाल रुपांनी विभ्रमित होऊन वाचा बंद होते..
परत पारावर येईपर्यंत शेतातील भूमीपुत्राने ज्वारीची पाच-सात कणसं ताट्यांसहीत आणून काळ्या भूमातेवर उभी रचून ठेवलेली असतात …. या कणसांच्या रुपानं निसर्गदेवता आज इथे अवतरलेली असते.
एरवी शहरात सलवार कमीज किंवा जीन कुर्तीत वावरणारी शेताची मालकीणबाई आज जरीच्या किंवा इरकली हिरव्या साडीत असते…. शेतातलं हे हिरवं सौंदर्य पाहून शेताचा धनी हरकून गेलेला असतो….. नकळत त्याचे हात परमेश्वराला जोडले जातात..
डोक्यावर पदर घेतलेली लक्ष्मी नि स्वत:च्याच भाग्याचा हेवा करणारा नारायण जोडीनं शेतातील धनाची म्हणजे पिकांची साग्रसंगीत पूजा करतात…. घरात रांधून आणलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो..
” सुजलाम-सुफलाम” असा आशीर्वाद निसर्गाकडून घेऊन अभ्यागतांच्या खातीरदारीची तयारी सुरू होते..
आगट्या पेटतात …आग्रह करकरून आगटीत भाजलेला कोवळा हुरडा खायला घातला जातो. हुरड्यानंतरची तहान मस्त मसाला ताकाने शमवली जाते.
हुरडा महोत्सवाचा हा शुभारंभ असतो. जडावलेलं पोटं डोळ्यांना बंद होण्याचा आदेश देतं.. पारावरच विकेटी पडतात…. ” थोडी भाकरी घ्या खाऊन “… नाजूक आदेश येतो….
भाकरी-भाजी,उंडे,पुरणपोळ्या ,शेंगापोळ्या दुधा -तुपासोबत रिचवल्या जातात…
अन्नदात्याला साहजिकच “सुखी भव ” असा पाहुण्यांकडून आशीर्वाद मिळतो..
पाहुणे समाधानाने आपापल्या घरी परततात..
पुढचे दोन महिने सारं सोलापूर या हुरड्याच्या हिरव्या रंगात रंगून जातं……
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले.
सोलापूर
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈