डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त सूक्त १४ (विश्वेदेव सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १४ (विश्वेदेव सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – विश्वेदेव
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चौदाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी विश्वेदेवाला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त विश्वेदेव सूक्त म्हणून ज्ञात आहे.
मराठी भावानुवाद : –
☆
ऐभि॑रग्ने॒ दुवो॒ गिरो॒ विश्वे॑भिः॒ सोम॑पीतये । दे॒वेभि॑र्याहि॒ यक्षि॑ च ॥ १ ॥
सिद्ध करुनिया सोमरसा ठेविले अग्निदेवा
यज्ञवेदिवर सवे घेउनी यावे समस्त देवा
सोमरसासह स्वीकारुनिया अमुच्या स्तोत्रांना
सफल करोनी अमुच्या यागा सार्थ करा अर्चना ||१||
☆
आ त्वा॒ कण्वा॑ अहूषत गृ॒णन्ति॑ विप्र ते॒ धियः॑ । दे॒वेभि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥
आमंत्रित केले कण्वांनी अग्ने प्रज्ञाशाली
तुझ्या स्तुतीस्तव मनापासुनी स्तोत्रे ही गाईली
प्रसन्न होई अग्नीदेवा अमुच्या स्तवनांनी
झडकरी येई यज्ञाला या सकल देव घेउनी ||२||
☆
इ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पति॑म् मि॒त्राग्निं पू॒षणं॒ भग॑म् । आ॒दि॒त्यान्मारु॑तं ग॒णम् ॥ ३ ॥
इंद्र वायू अन् बृहस्पतींना सवे घेउनी या
सूर्य अग्नि सह पूषालाही सवे घेउनी या
मरुद्गणांना भगास आदित्यासी घेउनी या
सर्व देवता यज्ञासाठी सवे घेउनी या ||३||
☆
प्र वो॑ भ्रियन्त॒ इन्द॑वो मत्स॒रा मा॑दयि॒ष्णवः॑ । द्र॒प्सा मध्व॑श्चमू॒षदः॑ ॥ ४ ॥
सोमरसाचे चमस भरुनिया आम्हि प्रतीक्षेत
विशाल तरीही पात्रे भरली पूर्ण ओतप्रोत
मधूर सोमरसाचे प्राशन सुखदायी होत
याचे करिता सेवन होते उल्हसीत चित्त ||४||
☆
ईळ॑ते॒ त्वाम॑व॒स्यवः॒ कण्वा॑सो वृ॒क्तब॑र्हिषः । ह॒विष्म॑न्तो अर॒ंकृतः॑ ॥ ५ ॥
मुळे काढुनी सोमलतेची चविष्ट हवि बनविला
कण्वऋषींनी तुजसाठी हा सिद्ध सोमरस केला
आर्त होऊनी तुझी प्रार्थना मनापासुनी करिती
रक्षण करी रे तुझ्या आश्रया ऋषीराज येती ||५||
☆
घृ॒तपृ॑ष्ठा मनो॒युजो॒ ये त्वा॒ वह॑न्ति॒ वह्न॑यः । आ दे॒वान्सोम॑पीतये ॥ ६ ॥
तुकतुकीत पृष्ठाने शोभत तुझे अश्व येती
स्वतः येउनी रथा जोडूनी प्रतीक्षा तुझी करिती
तुला आणखी समस्त देवा घेउनि यायाला
भावुक होऊन यजमान तया ठायी कृतार्थ झाला ||६||
☆
तान्यज॑त्राँ ऋता॒वृधोऽ॑ग्ने॒ पत्नी॑वतस्कृधि । मध्वः॑ सुजिह्व पायय ॥ ७ ॥
समस्त विधी संपन्न व्हावया अश्वची हो कारण
त्यांच्या ठायी बहुत साचले कार्य कर्माचे पुण्य
कृतार्थ करी रे त्यांना देवुनि त्यांची अश्विनी
तृप्त करी रे देवा त्यांना सोमरसा देवुनी ||७||
☆
ये यज॑त्रा॒ य ईड्या॒स्ते ते॑ पिबन्तु जि॒ह्वया॑ । मधो॑रग्ने॒ वष॑ट्कृति ॥ ८ ॥
अग्नीदेवा देवतास ज्या यज्ञा अर्पण करणे
ऐकवितो हे स्तोत्र तयांसी करुनी त्यांची स्तवने
जिव्हा होवो त्या सर्वांची सोमरसाने तुष्ट
त्या सकलांना अर्पण करि रे हविर्भाग इष्ट ||८||
☆
आकीं॒ सूर्य॑स्य रोच॒नाद्विश्वा॑न्दे॒वाँ उ॑ष॒र्बुधः॑ । विप्रो॒ होते॒ह व॑क्षति ॥ ९ ॥
जागृत झाल्या सर्व देवता अरुणोदय समयी
प्रकाशित त्या रविलोकातुन सर्वां घेऊन येई
विद्वत्तेने प्रचुर असा हा कर्ता यज्ञाचा
पूजन करुनी त्या सर्वांचे धन्य धन्य व्हायचा ||९||
☆
विश्वे॑भिः सो॒म्यं मध्वग्न॒ इन्द्रे॑ण वा॒युना॑ । पिबा॑ मि॒त्रस्य॒ धाम॑भिः ॥ १० ॥
उजळुन येता वसुंधरा ही प्रभातसूर्य किरणे
वायूसह देवेंद्राला त्या अमुचे पाचारणे
सवे घेउनी उभय देवता आता साक्ष व्हावे
मधुर अशा या सोमरसाला प्राशन करुनी घ्यावे ||१०||
☆
त्वं होता॒ मनु॑र्हि॒तोऽ॑ग्ने य॒ज्ञेषु॑ सीदसि । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ ११ ॥
अर्पण केला हवी स्विकारुनी अपुल्या ज्वालांत
सुपूर्द करिशी देवतांप्रती देऊनी हातात
तू हितकर्ता अमुच्या यज्ञी हो विराजमान
अमुच्या यज्ञा प्रसन्न होउन सिद्ध करी संपन्न ||११||
☆
यु॒क्ष्वा ह्यरु॑षी॒ रथे॑ ह॒रितो॑ देव रो॒हितः॑ । ताभि॑र्दे॒वाँ इ॒हा व॑ह ॥ १२ ॥
अग्नीदेवा सिद्ध करूनी रथा अश्व जोड
प्रसन्न करुनी देवतांसी रे करी त्यात आरूढ
आतुर आम्ही त्यांच्यासाठी येथे तिष्ठत
झणि घेउनि ये सर्व देवतांना या यज्ञात ||१२||
☆
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved 1 14
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈