सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ हिंदुत्व म्हणजे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा.
एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :
पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”
स्वामीजी : “मोहम्मद पैगंबर”
पत्रकार : “आणि ख्रिस्ती धर्माचा?”
स्वामीजी : “येशु ख्रिस्त.”
पत्रकार : “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”
आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :
” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”
स्वामीजी म्हणाले :
“अगदी बरोबर.!”
” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”
— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही….
आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.
स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”
स्वामीजी :- ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”
स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”
पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”
यावर स्वामीजी बोलले –
“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे. त्याप्रमाणे,
हिंदूधर्मही विज्ञानच आहे—
‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.——
— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे. तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही. मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”
— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.
आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈