इंद्रधनुष्य
☆ मानिनी… सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री लीला ताम्हणकर ☆
बोरे शब्द उच्चारताच – वाकलेली, थकलेली, सुरकुतलेली,श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेली, डोळ्यात प्राण आणून प्रतीक्षा करणारी, विस्फारलेल्या पांढऱ्या केसांची, करुण जख्ख म्हातारी शबरी नजरेसमोर येते. …. पण त्या काळात ती मनस्वी मानिनी होती.
तिचे मूळ नाव श्रमणा. तिचा पिता भिल्लांचा सेनानी. पित्याने कन्येचा विवाह ठरवला. सर्व तयारी जय्यत झाली होती. श्रमणाच्या कानावर आले — त्यांच्या जमातीत कन्या-जीवन सुखी व्हावे म्हणून तिच्या विवाहापूर्वी शेकडो पशूंचा बळी देतात. ही प्रथा होती. अत्यंत चतुर, संवेदनशील शबरीला हे असह्य झाले. इतक्या जीवांचा बळी जाणार असेल, तर नकोच तो विवाह !!! ..असा विचार करून ती हळूच पळून गेली. दंडकारण्यात मातंग ऋषींची सेवा करून अनेक विद्या पारंगत केल्या. बळी/हत्या न करता घनघोर जंगलात पशुधन जतन केले. अनेक वनस्पतींचे संशोधन करून पशूंची भाषा -विद्या प्राप्त केली.
श्रीरामांचे पवित्र पदकमल तिच्या झोपडीला लागताच ती अनन्य भाविका हरखून गेली.
काटेरी झुडुपात शिरून बोरे काढून आणली. आणि प्रत्येक बोरात शाबरी विद्या भरून ( शबरी मुखातून श्रीराममुखी) रामरायास उष्टी बोरे दिली हे भासविले.—- प्रत्यक्षात शाबर विद्यामार्फत सुग्रीवाची मदत घ्यायला सांगितले. शबरी ही अत्यंत ज्ञानी व तेजस्वी तपश्री होती. वनवासी जीवनात प्रत्यक्ष विद्या-ज्ञान संपादन करायचे नाही, असा कठोर आदेश श्रीरामांना होता. म्हणून शबरीने चतुराईने प्रत्येक बोरातून शाबरी विद्या रामाला दिली.ती ‘ गुरूणां गुरु: ‘ म्हणजे देवता झाली.—- सुग्रीव वानरांचा सेनापती होता.नर नाही तो वा-नर!!! श्रीरामांनी शाबरीविद्याधारे वा-नरांशी संवाद साधून इप्सित साध्य केले.
——या गोष्टीतून मला जाणवले ते असे —–
बोराचे झाड काटेरी असते. संक्रमण काळात अश्या काटेरी झाडांची टपोरी, बाणेरी बोरे काढणे, वेचणे, म्हणजे धीराने, चतुराईने संकटाशी, येणाऱ्या कडक उन्हाळ्याशी दोन हात करणे. जळाविना रहाणे, अभावातील भाव बघणे. सामना करून यश मिळवणे, अशी धडाडी वृत्ती बाळात येवो या हेतूने बोरन्हाण करतात.
शिक्षणाचा एखादा मार्ग बंद झाला ,तर पर्याय शोधून परिपूर्ण शिक्षण घेणे . शबरी सम स्व -बळ स्थान ओळखणे.एकटीने निर्भिड पणे राहून संशोधक वृत्ती जागृत ठेवून सजग होणे.
अनेक गोष्टी शिकवतात एकेक प्रसंग..
आता विज्ञान युगात परत बेरी स्नान इव्हेंट असतो. पण त्या बोरनहाणा मागील तत्व लक्षात घेऊन चंगळवादास आवर घालुया.
साधेसुधे राहून गोड गोड बोलुया।
लेखिका — सुश्री उन्नती गाडगीळ
संग्रहिका : सुश्री लीला ताम्हणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈