डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
शुक्ला यजुर्वेदातील बाविसाव्या अध्यायातील बाविसावा श्लोक हा वैदिक राष्ट्रगीत म्हणून प्रसिद्ध आहे.
या मंत्रात राष्ट्राचे मानचित्र साकारण्यात आले आहे.
☆ संस्कृत श्लोक ☆
आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायतामा राष्ट्रे राजन्य: शूरऽइषव्योऽतिव्याधी महारथो जायतां दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशु: सप्ति: पुरन्धिर्योषा जिष्णू रथेष्ठा: सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु फलवत्यो नऽओषधय: पच्यन्तां योगक्षेमो न: कल्पताम्।।
-यजु० २२/२२
अर्थ समजायला सुलभ जावे म्हणून मी या श्लोकाची खालीलप्रमाणे विभक्त मांडणी केली आहे.
आ ब्रह्यन् ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्
आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति
व्याधी महारथो जायताम्
दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः
पुरंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो
युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां
निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु
फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्
योगक्षेमो नः कल्पताम्
सुलभ अर्थ –
हे ब्रह्मात्म्या , आमच्या देशात समस्त वेदादी ग्रंथांनी देदीप्यमान विद्वान निर्माण होवोत. अत्यंत पराक्रमी, शस्त्रास्त्रनिपुण असे शासक उत्पन्न होवोत. विपुल दुध देणाऱ्या गाई आणि भार वाहणारे बैल, द्रुत गतीने दौडणारे घोडे पैदा होवोत.
तैलबुद्धीच्या स्त्रिया जन्माला येवोत. प्रत्येक नागरिक श्रेष्ठ वक्ता, यशवंत आणि रथगामी असो. या यज्ञकर्त्याच्या गृहात विद्या, यौवन आणि पराक्रमी संतती निर्माण होवो. आमच्या देशावर आमच्या इच्छेनुसार वर्षाव करणारे जलद मेघ विहारोत आणि सर्व वनस्पती फलदायी होवोत.
आमच्या देशातील प्रत्येकाच्या योगक्षेम पूर्तीसाठी त्यांना प्राप्ती होवो.
भावानुवाद :-
☆ वैदिक राष्ट्रगीत ☆
विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो
वेदांत ज्ञानी ऐसे शास्त्रज्ञ जन्म घेवो
अतिबुद्धिमान ललना देशाला गर्व देवो
यशवंत ज्ञानी वक्ता रथगामी मान मिळवो
यौवन-ज्ञानपूर्ण संतती शूर निपजो
विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो
भूभार वाही वृषभ, दुभत्या धेनु निपजो
वेगात पवन ऐशी पैदास अश्व होवे
इच्छेनुसार वर्षा अंबरी जलद विहरो
फळभार लगडूनीया द्रुमकल्प येथ बहरो
विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो
सकलांचे योगक्षेम परिपूर्ण होत जावो
विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो……
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈