डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १८ (ब्रह्मणस्पति सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १८ (ब्रह्मणस्पति सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – आप्री देवतासमूह 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ब्रह्मणस्पति, इंद्र, सोम, दक्षिणा व सदसस्पति अशा विविध देवतांना  आवाहन केलेले आहे. तरीही  हे सूक्त ब्रह्मणस्पति सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

सो॒मानं॒ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते । क॒क्षीव॑न्तं॒ य औ॑शि॒जः ॥ १ ॥

उशिजसूत कुक्षीवानाने सोम तुला अर्पिला

प्रसन्न होई ब्रह्मणस्पते स्वीकारूनी हवीला

कल्याणास्तव त्यांच्या देई आशीर्वच भक्तां

कुक्षीवानासम त्यांना रे देई तेजस्वीता ||१||

यो रे॒वान्यो अ॑मीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्ध॑नः । सः नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः ॥ २ ॥

स्वामी असशी संपत्तीचा व्याधींचा हर्ता

साऱ्या जगताचा तू असशी समर्थ पालनकर्ता

द्रव्य अमाप तुझिया जवळी भक्तांचा तू त्राता

अमुच्या वरती ब्रह्मणस्पते ठेवी आशिषहस्ता ||२||

मा नः॒ शंसो॒ अर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ्‍ मर्त्य॑स्य । रक्षा॑ णो ब्रह्मणस्पते ॥ ३ ॥

कुटिलांची किती दुष्कृत्ये अन् क्षोभक दुर्वचने 

बाधा करण्या आम्हाला ती सदैव दुश्वचने

कवच तुझे दे ब्रह्मणस्पते अभेद्य आम्हाला 

तू असशी रे समर्थ अमुचे संरक्षण करण्याला ||३||

स घा॑ वी॒रो न रि॑ष्यति॒ यमिंद्रो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ । सोमो॑ हि॒नोति॒ मर्त्य॑म् ॥ ४ ॥

ब्रह्मणस्पती, शचीपती अन् सोम श्रेष्ठ असती

समस्त मनुजा राखायाला सदैव सिद्ध असती

ज्यांच्या वरती कृपा तिघांची ते तर भाग्यवंत

अविनाशी ते कधी तयांच्या भाग्या नाही अंत ||४||

त्वं तं ब्र॑ह्मणस्पते॒ सोम॒ इंद्र॑श्च॒ मर्त्य॑म् । दक्षि॑णा पा॒त्वंह॑सः ॥ ५ ॥

रक्ष रक्ष हे ब्रह्मणस्पते इंद्र सोम दक्षिणा

मनुष्य प्राणी मोहांभवती घाली प्रदक्षिणा

कळत असो व नकळत घडती पापे हातूनी 

संरक्षण आम्हासी देउनिया न्यावे तारूनी ||५||

सद॑स॒स्पति॒मद्‍भु॑तं प्रि॒यमिंद्र॑स्य॒ काम्य॑म् । स॒निं मे॒धाम॑यासिषम् ॥ ६ ॥

प्रज्ञारूपी सदसस्पतीची मैत्री इंद्राशी 

अद्भुत आहे शौर्य तयाचे भिववी शत्रूसी

काय वर्णु औदार्य तयाचे प्रसन्न भक्तांशी

भाग्य लाभले सन्निध झालो आहे त्याच्यापाशी ||६||

यस्मा॑दृ॒ते न सिध्य॑ति य॒ज्ञो वि॑प॒श्चित॑श्च॒न । स धी॒नां योग॑मिन्वति ॥ ७ ॥

आम्हा लाभे बुद्धीमत्ता तयाची कृपा ही

आपुलकीने बहु प्रीतीने आम्हा तो पाही

सिद्ध कराया यज्ञायागा ज्ञानिहि समर्थ नाही

असेल त्याचे सहाय्य तर हे सहजी साध्य होई ||७||

आदृ॑ध्नोति ह॒विष्कृ॑तिं॒ प्राञ्चं॑ कृणोत्यध्व॒रम् । होत्रा॑ दे॒वेषु॑ गच्छति ॥ ८ ॥

अर्पण केल्या हविसी देई पूर्ण सफलता तो

यज्ञकार्यीच्या न्यूनालाही सांभाळुनिया घेतो 

अर्पण करुनीया  देवांसी हविर्भाग अमुचा

त्याच्या पायी होत सिद्धता यज्ञाला अमुच्या ||८||

नरा॒शंसं॑ सु॒धृष्ट॑म॒मप॑श्यं स॒प्रथ॑स्तमम् । दि॒वो न सद्म॑मखसम् ॥ ९ ॥

नराशंस हा अती पराक्रमी दिगंत त्याची कीर्ति

द्यूलोकच जणू तेजस्वी किती भव्य तयाची कांती

दर्शन त्याचे मजला घडले धन्य जाहलो मनी

प्रसन्न होउन कृपा करावी हीच प्रार्थना ध्यानी ||९||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. )

https://youtu.be/TDVCUNhPGKM

Attachments area

Preview YouTube video Rugved :: Mandal :: 1 :: 18 |||| ऋग्वेद :: मंडल १ :: सुक्त १८

Rugved :: Mandal :: 1 :: 18 |||| ऋग्वेद :: मंडल १ :: सुक्त १८

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments