?इंद्रधनुष्य?
☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित ☆
माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच….
आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो, त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत… वडिलांची आणि सासर्यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले..”बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे” असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.. तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता मी एकटा जाऊ शकतो तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला..हसतील मला सगळे..”
म्हणुन सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो.. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो.. मला कळून चुकलय की त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे कदाचीत थोडासा दुर्लक्षित…
आता मी संध्याकाळी फिरायला जातो.. तेवढाच माझाही वेळ जातो.. रोजचा मार्ग ठरलाय माझा agricultural college च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी.. त्या मार्गावर एक दोन शोरूम आहेत चार-चाकी गाड्यांच्या.. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते.. म्हणुन मग येता जाता त्या शोरूम मधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरूनच..
पण एक दिवस त्या शोरूम मधे एक वेगळीच गाडी दिसली काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवल होत. कुतुहल वाटल म्हणून आत गेलो.. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला.”yes sir कुठली गाडी बघताय” नाही….म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला.. ही एव्हढी जुनी तुमच्या शोरूममधे कशी काय हा विचार करतोय. “सर ही vintage car आहे 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”
का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे या गाडीवर मात्र तो नाही.”सर ही विंटेज कार आहे हिची किंमत ठरवता येत नाही..ज्याला या गाडीच मोल कळेल तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”
मी शोरूम मधून बाहेर पडलो..कसला तरी विचार येत होता मनामधे पण नक्की कळतं नव्हत काय ते..
असेच मध्ये काही दिवस गेले रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.
गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते.. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा..जरा उदासच होतो मी पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.. “आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते रोड वायडिंग मधे ते पाडणार होते.. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं.. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणुन ते महत्वाचं आहे.”
त्या गाड्यांच्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर जस वाटलं होतं तसच काहीसं वाटून गेलं.
सुनबाई म्हणाली “बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची..इतकी वर्षे आई करायच्या म्हणुन वाटत आज तुम्ही करावी..” मी पण तयार झालो..
आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती.. जेवायला तांब्याची ताट काढली.. मुलगा म्हणाला ” अगं आज तो काचेचा सेट काढायचा ना”
“अरे असू दे आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट… त्या सेट मधली आता फक्त ताटचं उरली आहेत म्हणुन मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी आईची आठवण म्हणून.”आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.
अचानक मला त्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला..मौल्यवान या शब्दाचा.. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड काही तरी इशारा करत होते..
आता माझे मला समजले होते मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो..
आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने.. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कार सारखं आहे… एकदम स्पेशल..
सौरभ साठे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈