डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि, मरुत्
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणीसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अग्नी आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निमरुत् सूक्त म्हणून ज्ञात आहे.
मराठी भावानुवाद
☆
प्रति॒ त्यं चारु॑मध्व॒रं गो॑पी॒थाय॒ प्र हू॑यसे । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ १ ॥
चारूगामी अती मनोहर याग मांडिलासे
अग्निदेवा तुम्हा निमंत्रण यज्ञाला यावे
मरुद्गणांना सवे घेउनीया अपुल्या यावे
यथेच्छ करुनी सोमपान यज्ञाला सार्थ करावे ||१||
☆
न॒हि दे॒वो न मर्त्यो॑ म॒हस्तव॒ क्रतुं॑ प॒रः । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥
अती पराक्रमी अती शूर तुम्ही अग्नीदेवा
तुमच्या इतुकी नाही शक्ती देवा वा मानवा
संगे घेउनि मरुतदेवता यज्ञाला यावे
आशिष देउनी होमासंगे आम्हा धन्य करावे ||२||
☆
ये म॒हो रज॑सो वि॒दुर्विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ३ ॥
द्वेषविकारांपासुनी मुक्त दिव्य मरूतदेवता
रजोलोकीचे त्यांना ज्ञान अवगत हो सर्वथा
अशा देवतेला घेउनिया सवे आपुल्या या
अग्निदेवा करा उपकृत ऐकुनि अमुचा धावा ||३||
☆
य उ॒ग्रा अ॒र्कमा॑नृ॒चुरना॑धृष्टास॒ ओज॑सा । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ४ ॥
उग्र स्वरूपी महापराक्रमी मरूत देवांची
तेजधारी अर्चना तयांस असते अर्काची
समस्त विश्व निष्प्रभ होते ऐसे त्यांचे शौर्य
अग्नीदेवा त्यांना घेउनिया यावे सत्वर ||४||
☆
ये शु॒भ्रा घो॒रव॑र्पसः सुक्ष॒त्रासो॑ रि॒शाद॑सः । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ५ ॥
धवलाहुनीही शुभ्र जयांची अतिविशाल काया
दिगंत ज्यांची कीर्ती पसरे शौर्या पाहुनिया
खलनिर्दालन करण्यामध्ये असती चंडसमर्थ
त्यांना आणावे त्रेताग्नी अंतरी आम्ही आर्त ||५||
☆
ये नाक॒स्याधि॑ रोच॒ने दि॒वि दे॒वास॒ आस॑ते । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥
द्यूलोक हे वसतीस्थान स्वर्गाचे सुंदर
तिथेच राहत मरूद देव जे दिव्य आणि थोर
आवाहन अमुच्या यज्ञासत्व वीर मरूद देवा
त्यांना घेउनिया यावे हो गार्ह्यपती देवा ||६||
☆
य ई॒ङ्ख्य॑न्ति॒ पर्व॑तान् ति॒रः स॑मु॒द्रम॑र्ण॒वम् । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ७ ॥
किति वर्णावे बलसामर्थ्य हे मरूद देवते
नगस्वरूपी जलदा नेता पार सागराते
नतमस्तक मरुदांच्या चरणी स्वागत करण्याला
अग्नीदेवा सवे घेउनीया यावे यज्ञाला ||७||
☆
आ ये त॒न्वन्ति॑ र॒श्मिभि॑स्ति॒रः स॑मु॒द्रमोज॑सा । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ८ ॥
चंडप्रतापी मरुद्देवता बलशाली फार
अर्णवास ही आक्रमिती सामर्थ्य तिचे बहुघोर
सवे घेउनिया पवनाशी आवहनीया यावे
हविर्भाग अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला द्यावे ||८||
☆
अ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तये सृ॒जामि॑ सो॒म्यं मधु॑ । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ९ ॥
सोमपान करण्याचा अग्ने अग्रमान हा तुझा
प्रथम करी रे सेवन हाची आग्रह आहे माझा
मरुद्गणांना समस्त घेउनी यज्ञाला यावे
सोमरसाला मधूर प्राशन एकत्रित करावे ||९||
☆
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९
Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈