सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर  ‘ एरडेल  टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा  कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘  धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.

ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि  ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच  सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.

दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण  त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.

‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते.  लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना  जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ  कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.

मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.

सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच  ‘हीरो’,  हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या  ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.

अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान  ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना  बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने  ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.  

२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने  “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने  घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून  त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .

 —क्रमशः भाग पहिला

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments