सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
इंद्रधनुष्य
” गौरव गाथा श्वानांची.”
( क्रमशः भाग दुसरा )
‘ एकदा साथ द्यायची ती कधीही न सोडणे ‘, हा कुत्र्याचा धर्म ! सेनादलातील चार अधिकाऱ्यांना ,
(जानेवारी ८१ ) एका कुत्र्याच्या छोट्या पिलाने १६ महिने साथ दिलेली घटना. भूतानमधील बोंगयांग या दरीतून जात असताना, तिबेटी ‘ मँस्टिफ’ जातीचे पिल्लू त्यांच्या मागे धावायला लागले .दया येऊन अधिकाऱ्यांनी त्याला बरोबर घेतले. ‘ द्रुग ‘ (घोडेस्वार ) असे त्याचे नामकरण झाले. सिक्कीममध्ये १९५०० मीटर उंचीवरून प्रवास करताना, सगळे सहन करत आनंदाने ‘ द्रुग ‘ प्रवास करत होता .जाताना वाटेत त्याला कसला तरी वास आला. आणि ‘ द्रुग’ वेगळ्याच दिशेला जायला लागला. अधिकाऱ्यांना शंका आली. म्हणून जवळ जाऊन त्यांनी उकरून पाहिले. तो शाल गुंडाळलेले एक प्रेत त्यांना दिसले. दोन महिन्याच्या पिलाच्या आत्मज्ञानाला काय म्हणावे ! कर्तबगारीच्या वर्णनाला, विशेषणांचे शब्दही कमी पडावेत.
एक जुलै. अमरनाथ यात्रेचा पहिला दिवस होता. लेफ्टनंट जनरल ( चिनार कोर कमांडर ) के. जे .एस. धिल्लन, काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या ‘ के 9 योद्धा ‘मेनका,’ या श्वानाला सलामी देत असलेला फोटो पाहिला. पाहून नवल वाटलं . धिल्लन पवित्र अमरनाथ गुहेत जात असताना, ५० मीटरवर ‘मेनका’ श्वान कर्तव्य बजावत होते. कोअर कमांडर तेथे पोहोचताच, श्वानाने– ‘ मेनकेने ‘ त्यांना सलामी दिली. धिल्लन यांनीही सलामीनेच त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या छायाचित्राखाली धिल्लन यांनी लिहिले, ” अनेकांचे प्राण वाचविलेल्या या जिवलग मित्राला सलाम”.
२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात मिरज ठाण्यात ‘ निरो ‘ या श्वानाची नियुक्ती झाली होती . दक्षिणेतून आलेल्या एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा स्टेशनमध्ये फोन आला. निरोने संपूर्ण गाडी तपासून धोका नसल्याचा निर्वाळा देऊन, सर्वांना हायसे केले. पंढरपूर यात्रेसाठी मिरजहून हजारो भाविक जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘ निरो ‘ ने वेळोवेळी संपूर्ण गाड्या तपासून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे काम केले . पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेला श्वान हाच तो
‘निरो’. निरोचा जोडीदार ‘ सोलो ‘ निवृत्त झाला. आणि मग ‘निरो ‘ एकटाच कोल्हापूर — सातारा विभागाची जबाबदारी सांभाळत होता. एक तपाच्या कर्तव्यपूर्तीनंतर तो सन्मानाने निवृत्त झाला. एखाद्या क्लास वन ऑफिसरला निरोप द्यावा , तसाच सन्मानाने त्याला निरोप दिला गेला. ” पीपल फॉर ॲनिमल ” या संस्थेच्या मागणी आणि विनंतीनुसार त्यांच्याकडे तो सन्मानाने राहिला.
विठुरायाच्या दर्शनाचे क्षेत्र पंढरपूर. हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सुरक्षा यंत्रणा राबत असते .या यंत्रणेचा एक भाग म्हणजे, लॅब्रॉडॉर जातीचे ‘ तेजा ‘ हे श्वान. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक दलातील अव्वल श्वान म्हणून ‘ तेजाला ‘ ओळखत होते .विठ्ठल गाभारा आणि मंदिराच्या सुरक्षेचे काम ‘तेजाने ‘ नऊ वर्षे इमाने इतबारे केले. इतके की त्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ‘ ‘तेजाचे ‘ एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, नऊ वर्षे, तो विठ्ठल मंदिरात तपासणीला आल्यानंतर, गाभाऱ्यात कोणत्याही इशाऱ्याशिवाय सर्वप्रथम विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचा. आणि मग तपासणीचे काम सुरू करायचा. देवापुढे नम्र होण्याचे शिक्षण खरंतर त्याला दिले गेले नव्हते. हे शिक्षण त्याला कोठून दिलं गेलं असेल बरं ! त्याच्या आत्मज्ञानाने तर नसेल ! प्रशिक्षणानंतर २००९ साली ‘ तेजा ‘ सेवेत दाखल झाला. अव्वल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजाला २०१५, २०१६, आणि २०१७ असे सलग तीन वर्षे ,उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले . वृद्धापकाळाने तो शेवटी विठ्ठलचरणी लीन झाला .पोलीस दलाने त्याला अखेरची सलामी दिली. सलाम.
सांगलीकरांना अभिमान वाटावा असा आणखी एक हिरो म्हणजे ‘ लॅब्रॉडॉर ‘ जातीचा ‘ ‘मार्शल ‘ हा कुत्रा. सांगली जिल्हा पोलीस पथकात बॉम्बशोधक कार्यासाठी तो कार्यरत होता. त्याने २००९ ते २०१९ असे प्रदीर्घ काळ काम केले. २०१२ मध्ये जत तालुक्यात गोंधळेवाडी या ठिकाणी, शाळेतील मुलांना खेळत असताना एक बाँब सदृश्य वस्तू दिसली .पोलीस दलाला फोन आला. ‘ मार्शल ‘ ला पाचारण केले गेले. त्या ठिकाणी
‘मार्शलने ‘ पुन्हा पुन्हा वास घेऊन, धोकादायक बॉम्ब असल्याचे सूचक विधान केले. पथकाद्वारे पुढील कारवाई केली गेली. आणि शाळेचे टेन्शन संपले. त्याचप्रमाणे कवलापूर येथे विहिरीचा गाळ काढत असताना, लोकांना एक संशयास्पद वस्तू दिसली. मार्शलचे व्यक्तिमत्व सर्वांना ठाऊक होते. म्हणून त्याला बोलावले गेले .मार्शलने आपल्या पथकाला ही वस्तू धोकादायक असल्याचा “शब्देविण संवादू “,असा निर्वाळा दिला. पंढरपूर आणि पुणे येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या काळात, बंदोबस्त, सुरक्षितता आणि तपासणीचे महत्त्वाचे कर्तव्य त्याने बजावले होते. आणि वाहवा मिळवली होती .पंढरपूरच्या प्रत्येक वारीच्या काळात आणि तुळजापूरला नवरात्राच्या काळात तेथील तपासणी आणि बंदोबस्ताचे जबाबदारीचे काम त्याने यशस्वीपणे केले होते. दहा वर्षे निष्ठेने कार्य करून सन्मानाने तो निवृत्त झाला. वयस्क झाला. वृद्धापकाळाने, पाच जून २०२२ या दिवशी तो विठ्ठलाचा आणि तुळजाभवानीचा वरदहस्त घेऊन, ईश्वरचरणी लीन झाला .आज त्याचे उत्तर अधिकारी म्हणून ‘सनी’ नावाचा लाब्राडोर , ‘तेजा ‘ नावाचा डॉबरमॅन, ‘ लिओ’ नावाचा लँब्राडोर , ‘ लुसी’ नावाची जर्मन शेफर्ड हे श्वान निष्ठापूर्वक कर्तव्य बजावत आहेत.
सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना ,कौटुंबिकदृष्ट्या कर्तव्य पार पाडलेल्या श्वानांच्या असंख्य घटना सांगता येतील.
कर्जत गावाजवळ टेकडीखालील वाड्यात आरेकर यांचा ‘काळू ‘ हा लाडका कुत्रा होता. त्याचेही आरेकरांवर खूप प्रेम होते. आरेकर काकांच्या निधनानंतर, ‘ काळू ‘ त्यांच्या भोवती फिरत राहिला. कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देईना. प्रेताला हात लावू देईना. अखेर त्याला घरातल्यांनी साखळीने बांधून घातले. नंतर त्यांचा देह अंत्यसंस्काराला नेला गेला . ‘काळू’ने हिसडे मारून , आरडा ओरडा करून, साखळी तोडून तो स्मशानात आला. मालकाच्या चितेवर बसून राहिला. बाजूला घेण्याचे सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण तो ऐकायला तयार नव्हता. सर्वांनी अखेर एकत्रितपणे ताकत लावून, त्याला उचलून घरी आणले . आणि खोलीत बंद केले. त्याचा आरडाओरडा चालूच होता. नंतर काकांचे अंत्यसंस्कार झाले. आठच दिवसात ‘ काळू ‘ आपल्या मालकाला भेटायला गेला.– स्वर्गात ! या प्रेमाला आणि निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.
दाविद काकडे यांचा दुग्ध व्यवसाय होता. गायीबरोबर जर्मन शेफर्डची जोडीही त्यांनी पाळली होती. रोज पत्नी आशासह ते गाईला चारा आणायला शेतात जात असत. बैलपोळ्याचा दिवस होता. शेतात जाताना एक कुत्रा बरोबर होता. आशा गवत कापत होती. आणि एक फुटावर असलेल्या नागाने फणा काढला. आशाचे लक्ष्य नव्हते. कुत्र्याने नागावर झडप घातली. नागाने कुत्र्याच्या नाकावर डंख मारला. आशाने आरडाओरडा केला . लगेच कुत्र्याला दवाखान्यात नेले. आशाचे आणि कुत्र्याचेही प्राण वाचले .कुत्र्याने मालकिणीवर होणारा दंश स्वतःवर घेतला. आणि मालकिणीचे प्राण वाचविले.
—क्रमशः भाग दुसरा
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈